नव्या युगात कोणालाही क्रिएटिव्ह होणे जितके कठीण आहे, त्याहूनही अधिक आपल्या क्रिएशनला जगासमोर ठेवणे अवघड आहे. कारण, आजकाल कोणाला कशाचे वाईट वाटेल, हे कोणीच सांगू शकत नाही. वेगवेगळ्या ब्रँडसाठी हे दिवस कठीण जात आहेत, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना केल्यानंतर फॅब इंडिया ते डाबरपर्यंत त्यांनी आपल्या जाहिराती मागे घेतल्या आहेत. आता या यादीत प्रसिद्ध डिझायनर सब्यासाची मुखर्जीचेही नाव जोडले गेले आहे.
फॅशन डिझायनर सब्यासाची मुखर्जी गेल्या काही दिवसांपासून मंगळसूत्र ज्वेलरी कलेक्शनवरून वादात सापडला आहे. त्याने आपल्या लेबलची जाहिरात मागे घेतली असून, या जाहिरातीमुळे समाजातील एक घटक दुखावला गेल्याची खंत त्याने व्यक्त केली आहे. मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्या इशाऱ्यानंतर सब्यासाचीने हे वक्तव्य केले आहे. नरोत्तम मिश्रा यांनी त्याला ही जाहिरात काढून टाकण्यासाठी २४ तासांचा अल्टिमेटम देऊन त्याच्या अटकेसाठी पोलीस पाठवण्याची धमकी दिली होती.
सब्यासाचीने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक निवेदन जारी केले आहे. त्याने लिहिले की, “वारसा आणि संस्कृतीला गतिशील संभाषण बनवण्याच्या संदर्भात, मंगळसूत्र अभियानाचा उद्देश सर्वसमावेशकता आणि सशक्तीकरण याविषयी बोलण्याचा होता. या अभियानाचा उद्देश एक सण म्हणून होता आणि त्यामुळे आपल्या समाजातील एक वर्ग दुखावला गेला आहे, याचे आम्हाला खूप दुःख आहे. त्यामुळेच आम्ही ‘सब्यासांची’ने अभियान मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.”

सब्यासाची त्याच्या नवीन मंगळसूत्र कलेक्शनमुळे लोकांच्या निशाण्यावर आला होता. लग्नाच्या पवित्र बंधनाचे प्रतिक आणि लग्नाचे प्रतिक मानल्या जाणाऱ्या मंगळसूत्राचे नवे कलेक्शन लाँच करण्यासाठी त्याने ज्या प्रकारच्या जाहिरातीचा अवलंब केला आहे, त्यामुळे तो ट्रोल होत आहे. फॅशन डिझायनरच्या मॉडेलने डेनिम आणि ब्रा घालून फोटो सेशन केले, जे सोशल मीडिया युजर्सना आवडले नाही.
जाहिरातीत एका महिलेने ब्रा आणि मंगळसूत्र घातले आहे, तर पुरुष मॉडेलही शर्टलेस आहे. मंगळसूत्र हा एक पवित्र दागिना मानला जातो, जो हिंदू स्त्रिया लग्नानंतर घालतात. लग्नाच्या वेळी वर आपल्या वधूच्या गळ्यात मंगळसूत्र घालून आपला जीवनसाथी बनवतो. पवित्र नात्याला नजर लागू नये म्हणून काळे मोतीही घालतात. मात्र, सब्यासाचीने ज्याप्रकारे सादरीकरण केले, त्यामुळे तो सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागला.
सब्यासाचीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नवीनतम डिझाइन मंगळसूत्राचा फोटो शेअर केला आहे. मंगळसूत्राची किंमत १ लाख ६५ हजार रुपयांपासून सुरू आहे. मंगळसूत्राच्या प्रमोशनसाठी सब्यासाचीने त्याचे फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-चाहत्यांसाठी खुशखबर! रजनीकांत यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, फोटो केले शेअर
-दारूच्या ब्रँडची ऍड केल्यामुळे, काजल अग्रवालवर भडकले नेटकरी; ‘या’ शब्दांत केलं तिला ट्रोल