Saturday, June 29, 2024

सलमानसोबत काम करणाऱ्या ‘या’ अभिनेत्री बॉलिवूडमधून का झाल्या गायब

सुपरस्टार सलमान खानसोबत (salman khan)काम करणं म्हणजे अनेकांसाठी ही जगातली भारी गोष्ट. त्यातही तरुणी तर सलमानसोबत काम करण्यासाठी रांगेतच उभ्या असतात. हे तर सोडाच ओ भल्या भल्या बॉलिवूड अभिनेत्रींनाही सलमानसोबत एका तरी सिनेमात काम करायची इच्छा असतेच असते. कारण, सलमान स्वत:च आहे एक ब्रँड. त्यामुळे त्याच्यासोबत सिनेमा म्हणल्यावर हिट होणार हे जवळपास नक्कीच. त्यामुळे नव्वदच्या दशकात आणि आताच्या काळात जितक्या काही नायिका झाल्या आणि आहेत त्यातल्या प्रत्येकीला सलमानसोबत काम हे करावंसं वाटतंच. उलट सलमानने स्वतःच अनेक कलाकारांना सिनेमात संधी देऊन त्यांच्या करियरला एक वेगळीच कलाटणी दिलीये. सलमानच्या नव्वदीच्या दशकातील सिनेमांकडे पाहिलं, तर त्याच्यासोबत ज्या- ज्या नायिका झळकल्या त्यातील बऱ्याचश्या आज बॉलिवूडपासून कोसो दूर आहेत. चला तर आजच्या या लेखातून जाणून घेऊया त्या अभिनेत्रींबद्दल.

चांदनी
१९९१ साली रिलीझ झालेल्या ‘सनम बेवफा’ या सिनेमात अभिनेत्री चांदनी सलमानसोबत दिसली होती. चांदनीचं खरं नाव आहे नवोदिता शर्मा. हा सिनेमा प्रेक्षकांना आवडला, पण चांदनीच्या करिअरला त्याचा काहीच फायदा झाला नाही. आज ती बॉलिवूडपासून दूर आहे. असं म्हणतात की, चांदनी आता परदेशात असून तिथल्या मुलांना डान्सचे धडे देते.

कांचन
सलमानच्या ‘सनम बेवफा’ या सिनेमात चांदनीसोबत अभिनेत्री कांचनही दिसली होती. कांचनने अनेक दाक्षिणात्य सिनेमात देखील काम केलंय. यासह तिने नव्वदच्या दशकात अक्षय कुमार आणि गोविंदासोबतही स्क्रीन शेअर केलीये. बड्या अभिनेत्यांसोबत रुपेरी पडद्यावर झळकणारी कांचन आज असं आयुष्य जगतेय, ज्याबद्दल कुणालाच काही माहिती नाही.

रंभा
सलमानची जोडी ज्या अभिनेत्रींसोबत हिट ठरली, त्यामध्ये नाव येतं ते रंभाचं. सलमान खानबरोबर रंभाची जोडीनं धमाल केली होती. १९९७ साली रिलीझ झालेल्या ‘जुडवा’ या सिनेमात सलमान आणि रंभा यांच्या जोडील प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं. ‘जुडवा’शिवाय ती बॉलिवूडच्या आणखीन काही सिनेमात दिसली. रंभा अनेक दक्षिण भारतीय सिनेमातही आपला हात आजमावताना दिसली. सध्या रंभा सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असून तिचे फोटो शेअर करते, परंतु तरी देखील ती लाईमलाईटपासून दूर राहणंच पसंत करते.

रेणू आर्या
‘बिवी हो तो ऐसी’ हा सलमानचा पहिला वहिला सिनेमा. १९८८ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमात रेणू आर्या ही सलमानची अभिनेत्री होती. रेणू फक्त एक-दोन चित्रपटांत दिसली, त्यानंतर तिने बॉलिवूडला कायमचा राम राम ठोकला. अचानक गायब झालेली रेणू पुन्हा कधी दिसलीच नाही. नुकतंच काही वर्षांपूर्वी
अशी बातमी आली होती की, ती नोएडामध्ये तिच्या कुटुंबासोबत राहतेय.

पूजा डडवाल
पूजा डडवाल काही काळापूर्वी आजारपणामुळे चर्चेत आली होती. तिने सलमानबरोबर १९९५ साली आलेल्या ‘वीरगती’ सिनेमात काम केलं होतं. पूजाने सलमानकडे तिच्या उपचारासाठी मदत मागितली होती. जेव्हा सलमानला तिच्या आजारपणाबद्दल समजलं, तेव्हा तो स्वतः तिच्या मदतीसाठी पुढे धावून आला होता. आपला घरखर्च भागवण्यासाठी आता हीच अभिनेत्री टिफीन सर्व्हिस चालवते.

नगमा
१९९० साली आलेल्या ‘बागी’ या सिनेमातून अभिनेत्री नगमाने अभिनय करिअरला सुरुवात केली. या सिनेमात तिने सलमानसोबत स्क्रीन शेअर केली होती. या सिनेमानंतर नगमाने अनेक हिट सिनेमात आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला. पण इतर अभिनेत्रींसारखंच नगमानंही स्वत:ला सिनेमापासून दूर केलं. पण नगमाने सिनेमाचं मैदान जरी सोडलं असलं, तरीही ती राजकारणाच्या मैदानात मात्र चांगलीच सक्रिय आहे. नगमा ही राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची सदस्य आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

करिअर पिकवर असताना ‘या’ भारतीय कलाकारांनी केली आत्महत्या, वाचा संपूर्ण यादी

रश्मिका मंदान्नाच्या हाती लागला बॉलिवूडचा आणखी एक मोठा चित्रपट, ‘या’ अभिनेत्याची हिरोईन बनणार नॅशनल क्रश

जेव्हा ‘रिक्षावाला हिरो व्हायला आलाय’ म्हणत अभिनेता धनुषचा केला होता अपमान, वाचा रंजक किस्सा

हे देखील वाचा