विशाखा सुभेदार(Vishakha subhedar) हे मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक आघाडीचे नाव आहे. आपल्या खास शैलीत आणि अफलातून कॉमेडीने तिने संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या नावाची खास ओळख निर्माण केली आहे. विशाखा सुभेदारच्या अभिनयाची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत असते. (23 मार्च) अभिनेत्री विशाखा सुभेदारचा वाढदिवस. या निमित्ताने तिच्यावर सगळ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला. मात्र विशाखा सुभेदारच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या अभिनेता समीर चौगुले (Samir Choughule) यांच्या पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. काय आहे ती पोस्ट चला जाणून घेऊ.
महाराष्ट्राची हास्ययात्रा या कार्यक्रमात गाजलेली जोडी म्हणून विशाखा सुभेदार आणि समीर चौगुले यांचे नाव आघाडीवर आहे. दोघांनीही आपल्या कसदार अभिनयाने घराघरात प्रसिद्धी मिळवली आहे. त्यांच्या अभिनयाचे आणि कॉमेडीचे असंख्य चाहते आपल्याला पाहायला मिळतात. दोघांनीही या कार्यक्रमात तुफान कॉमेडी करत प्रेक्षकांचे अनेक वर्ष मनोरंजन केले आहे. अभिनेता समीर चौगुले आपल्या अभिनयाइतकाच सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतो. सध्या अभिनेत्री विशाखा सुभेदारच्या वाढदिवसानिमित्त केलेली एक खास पोस्ट सगळीकडे चर्चेत आली आहे. समीर चौगुले यांच्या या व्हायरल पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
या पोस्टमध्ये ते म्हणतात की, “Vishakha Subhedar विशु, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, विलक्षण आणि विस्मयकारक ताकदीची कलावंत, अफाट आणि अचाट टायमिंग गाठीशी ठेऊन रंगमंचावर धुमाकूळ घालणारी अभिनेत्री….विनोदाची उत्तम समज आणि क्षणार्धात कमालीचे भाव चेहऱ्यावर आणून प्रेक्षकांना अचंबित करणारी आमची विशु. माझं भाग्य की ही अतरंगी बहुगुणी माझी जोडीदार आहे आणि माझी सखी मैत्रीण आहे. ‘सम्या विशु’ या जोडीच्या यशात बहुतांशी वाटा विशुचा आहे, आतून प्रेमळ माऊली असलेल्या आमच्या विशुत कुशल कठोर नेतृत्वगुण ही दडलेले आहेत आणि याच गुणांमुळे ती आज उत्कृष्ट नाट्यनिर्माती म्हणून घट्ट पाय रोवतेय…..विशु तुझं माझ्या बरोबर असणं भाग्याचं आणि आनंदाचं आहे. जे मनात आहे ते सगळं तुला मिळो ही गणराया चरणी प्रार्थना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.” थोडक्यात, समीर चौगुले आणि विशाखा सुभेदार यांच्यातील पडद्यामागे असलेली घट्ट मैत्रीचं या पोस्टमध्ये दिसून येत आहे. या पोस्टचे सगळीकडून कौतुक होत आहे. समीर चौगुले यांनी या व्हायरल पोस्टसोबत एक फोटोही शेअर केला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा