Friday, April 19, 2024

पत्रिका वाटप होऊनही लग्नापर्यंत गेले नाही सलमान-संगीताचे नाते; नंतर ‘या’ क्रिकेटपटूशी थाटला तिने संसार

नव्वदच्या दशकात हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने ओळख निर्माण करणारी आणि वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी मिस इंडियाचा ताज मिळवणारी अभिनेत्री म्हणजे संगीता बिजलानी. या इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी त्यांच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा अधिक प्रसिद्धी वैयक्तिक आयुष्यामुळे मिळवली. संगीता याच अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री आहे. एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही मागे टाकतील इतक्या चढ उतारांनी संगीताचे आयुष्य भरले होते. रविवारी संगीता तिचा 63 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया तिच्या आयुष्यातील काही महत्वाच्या बाबी.

संगीताचा जन्म 9 जुलै 1960 ला मुंबई येथे एका सिंधी कुटुंबात झाला. तिच्या वडिलांचे नाव मोतिलाल होते. संगीताला बालपणापासून ग्लॅमर जगाचे खूप आकर्षण होते. वयाच्या अवघ्या 16 वर्षी तिने मॉडेलिंग करायला सुरुवात केली. तिने पॉंड्स आणि निरमा या दोन जाहिरातीमध्ये काम केले आणि 1980 साली वयाच्या अवघ्या 20 वर्षी तिने मिस इंडियाचा किताब जिंकला.

मिस इंडिया झाल्यानंतर तिने मॉडेलिंग करायला सुरुवात केली. त्यानंतर 1988 साली ती ‘कातिल’ सिनेमातून पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकली. मात्र या चित्रपटाला अपेक्षित यश मिळाले नाही. पण पुढच्याच वर्षी म्हणजे 1989 मध्ये जे पी दत्ता यांचा ‘हथियार’ हा सिनेमा तिच्या पदरी यश घेऊन आला. या सिनेमानंतर संगीताने कधीही मागे वळून पहिले नाही. ‘त्रिवेदी’, ‘जुर्म’, ‘इज्जत’, ‘युगांधर’, ‘योध्दा’, ‘खून का कर्ज’, ‘लक्ष्मण रेखा’, ‘निर्भय’ यांसारख्या सिनेमांमध्ये ती झळकली. इतकेच नाही, तर तिने मोठ्या पडद्यासह छोट्या पडद्यावरील ‘रंगोली’ या शोसाठी काम केले. सोबतच ‘चांदनी’ या मालिकेत देखील काम केले.

चित्रपटांमध्ये यशस्वी होत असताना संगीता तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील भरपूर प्रकाशझोतात आली. संगीता करियरमध्ये पुढे जात असताना, मॉडेलिंगच्या दिवसात ती आणि सलमान खान एकमेकांच्या जवळ आले आणि 1986 उजडेपर्यंत त्यांनी डेट करायला सुरुवात केली होती. त्यानंतर मीडिया आणि इंडस्ट्रीमध्ये फक्त आणि फक्त सलमान- संगीताच्याच चर्चा सुरु झाल्या. काही वर्षांनी यांच्या लग्नाच्या बातम्या यायला सुरुवात झाली. 10वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर यां दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

सलमानच्या घरचे आधीच या नात्यासाठी तयार होते, मात्र संगीताच्या घरी तिच्या आईवडिलांना थोडी धाकधूक होती. मात्र ते देखील तयार झाले. 27 मे 1994ला या दोघांचे लग्न ठरले. लग्नाच्या पत्रिकांचे देखील वाटप झाले आणि अचानक सलमानने लग्नासाठी नकार दिला. या नाकारामुळे यांचे ठरलेले लग्न मोडले.

जासिम खान यांचे पुस्तक ‘बिंग सलमान’मध्ये असे सांगण्यात आले आहे, की संगीताने एक मुलाखतीमध्ये त्यांचे लग्न ठरल्याचे सांगितले होते. खुद्द सलमाननेही मान्य केले होते की, संगीतासोबत लग्नाच्या त्यांच्या पत्रिका देखील छापल्या गेल्या होत्या. 27 मे 1994 ला ते लग्न करणार होते, सलमानने करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ मध्ये हे मान्य केले होते. मात्र मधेच माशी शिंकली आणि हे लग्न मोडले.

त्यांचे लग्न मोडल्यानंतर अशा बातम्या आल्या की, सलमानच्या आयुष्यात अभिनेत्री सोमी अलीने एन्ट्री केली आणि या दोघांमध्ये खूप जवळीक निर्माण झाली होती. जेव्हा संगीताला हे समजले, तेव्हा तिने या लग्नासाठी नकार दिला. पुढे 1996मध्ये तिने क्रिकेटर मो. अजहरुद्दीनसोबत लग्न केले.

अझरुद्दीन आधीपासूनच विवाहित होते, सोबतच त्यांना दोन मुलं देखील होती. मात्र त्यांनी संगीतासाठी त्यांच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला आणि संगीतासोबत लग्न केले. या लग्नासाठी संगीताने इस्लाम धर्म स्वीकारून स्वतःचे नाव आयेशा ठेवले आणि लग्न केले. मात्र हे लग्न देखील टिकले नाही. लग्नानंतर 14 वर्षांनी हे दोघे वेगळे झाले. या घटस्फोटानंतर संगीताने अद्याप दुसरे लग्न केले नाही.

संगीता आणि अझरुद्दीन यांची भेट ही एका जाहिरातीच्या शुटिंग दरम्यान झाली होती. पहिल्या भेटीत अजहर संगीताच्या प्रेमात पडले होते. त्यानंतर दोघांच्या भेटीगाठी वाढल्या आणि त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. असं सांगितले जाते, की अझरुद्दीन यांनी त्यांच्या पहिल्या पत्नी नौरीनला घटस्फोट देण्यासाठी एक कोटी रुपये दिले होते. त्या काळातील ही सर्वात मोठी रक्कम होती.

सलमान आणि संगीता आजही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहे. संगीता सलमानच्या घरी अनेक कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसते.

अधिक वाचा- 
आलियाचा ‘तो’ फोटो घालतोय सोशल मीडियावर राडा, अभिनेत्रीच्या हॉट लूकवर एक नजर टाकाच
स्वत:च्याच लग्नात ऋषी कपूर-नीतू सिंग यांना आलेली चक्कर

हे देखील वाचा