Wednesday, July 3, 2024

दिव्य कुटुंबाची भेट घडवणारा ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’, 2 ऑगस्टला होणार संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित

विरक्ती, ज्ञान, भक्ती आणि मुक्ती यांचे मूर्तिमंत स्वरूप घेऊन निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ता जन्माला आली. साक्षात दिव्यत्वाची ही चार रूपे रुक्मिणी अन विठ्ठलपंतांचे मातृ-पितृत्व धन्य करणारी !
शिव तो निवृत्ती । विष्णू ज्ञानदेव पाही । सोपान तो ब्रह्मा । मूळ माया मुक्ताई ।।

असे या भावंडांचे वर्णन संत कान्होपात्रांनी केलंय. या भावंडांच्या संतपणाची महती सांगत मुक्ताईच्या दृष्टीकोनातून संत ज्ञानेश्वरांच्या दिव्य कुटुंबाची भेट घडवणारा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा भव्य आध्यात्मिक मराठी चित्रपट २ ऑगस्टला आपल्या भेटीला येतोय. दिव्य अनुभवाची प्रचिती देणाऱ्या या चित्रपटाची पहिली झलक नुकतीच प्रदर्शित झाली आहे. चित्रपटात बालपणीच्या संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत मानस बेडेकर, मुक्ताईच्या भूमिकेत ईश्मिता जोशी तर निवृत्तीच्या भूमिकेत साहिल धर्माधिकारी आणि सोपानच्या भूमिकेत अभीर गोरे आहे.

महिला संतमालिकेत मुक्ताबाई यांचा जीवनसंघर्ष आणि त्या संघर्षातून आलेली ज्ञानदृष्टी अलौकिक आहे. त्यांच्या श्रेष्ठत्वाचा गौरव सर्वच संतांनी केलेला आहे. हे श्रेष्ठत्व सहज मिळालेले नव्हते, तर त्यासाठी त्यांच्या कुटुंबियांना मोठ्या दिव्यातून जावे लागले. त्यात सर्वांत लहान असलेल्या मुक्ताबाईला खूप मोठी जबाबदारी स्वतःवर घ्यावी लागली. ‘देहरूपाने संपले तरी कार्यरूपाने संजीवन असणाऱ्या मुक्ताबाईंच्या कार्य व विचारांचे सार ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटातून मांडण्यात आले आहे. या चित्रपटाची प्रस्तुती ए.ए.फिल्म्स ही नामांकित वितरण संस्था करीत आहे. रेश्मा कुंदन थडानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

संगीताची जबाबदारी अवधूत गांधी, देवदत्त बाजी यांनी सांभाळली आहे. छायांकन संदीप शिंदे तर संकलन सागर शिंदे, विनय शिंदे यांचे आहे. कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज तर ड्रोन आणि स्थिर छायाचित्रे प्रथमेश अवसरे यांचे आहेत. रंगभूषेची जबाबदारी अतुल मस्के तर वेशभूषेची जबाबदारी सौरभ कांबळे यांनी सांभाळली आहे. नृत्यदिग्दर्शन किरण बोरकर तर ध्वनीसंयोजन निखिल लांजेकर यांचे आहे. पार्श्वसंगीत शंतनू पांडे यांनी दिले आहे. साहसदृश्ये बब्बू खन्ना यांची आहेत. सहनिर्माते सनी बक्षी आहेत. केतकी गद्रे अभ्यंकर कार्यकारी निर्मात्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरीच्या आरोपाखाली पोलिसांनी दोघांना केली अटक, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
सुशांत सिंह राजपूतची आठवण करून सारा झाली भावूक; म्हणाली, ‘केदारनाथसाठी मला जेवढे प्रेम मिळाले…’

हे देखील वाचा