Friday, July 5, 2024

आता फक्त दिवस मोजा; ऐतिहासिक ‘सरसेनापती हंबीरराव मोहिते’ चित्रपटाची रिलीझ डेट जाहीर

सध्या मराठी चित्रपट क्षेत्रात अनेक ऐतिहासिक चित्रपट तयार होत आहेत. नुकताच प्रदर्शित झालेला ‘पावनखिंड’ चित्रपट सगळीकडे प्रचंड गाजला. या चित्रपटाने कमाईचे अनेक नवनवे विक्रम प्रस्थापित केले. ‘पावनखिंड’ चित्रपटाच्या यशाने पुन्हा एकदा मराठी चित्रपट क्षेत्राने सर्वत्र प्रचंड वाहवा मिळवली. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध दिग्दर्शक प्रविण तरडे (Pravin Tarde)  यांचा बहुचर्चित ‘सरसेनापती हंबीरराव‘ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सोमवार ( १३,मार्च) ला चित्रपट प्रदर्शनाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे आता पून्हा एक ऐतिहासिक शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाचे प्रसिद्ध दिग्दर्शक प्रविण तरडे यांच्या ‘सरसेनापती हंंबीरराव’ या चित्रपटाची अनेक महिने चर्चा सुरू होती. चित्रपटाचा टिझर याआधीच प्रदर्शित झाला असून त्यामध्ये प्रविण तरडे यांनी साकारलेल्या प्रमुख भूमिकेमधील त्यांचा लूक खूपच दमदार दिसत आहे. तेव्हापासून या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची प्रेक्षक वाट पाहत होते. आता त्यांची ही प्रतिक्षा संपली असून दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन चित्रपट २७ मे २०२२ ला  प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती दिली आहे.

“काय म्हणाले प्रविण तरडे”

दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी सोमवार (१४ मार्च) आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी “आता आपण फक्त दिवस मोजायचे, ७५ दिवस राहिलेत. २७ मे ला सर्वत्र प्रदर्शित,” अशी माहिती देत चित्रपटाचा एक दमदार पोस्टर शेअर केला आहे. ज्यामध्ये सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या भूमिकेत प्रविण तरडे यांंचा जबरदस्त लूक पाहायला मिळत आहे. या पोस्टरवरुनच चित्रपटात प्रविण तरडे यांच्या रांगड्या आणि कसदार अभिनयाची झलक पाहायला मिळणार असल्याचे समजत आहे. त्यामुळे या चित्रपटाची आता प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

‘कोण होते हंबीरराव मोहिते’

हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी राजे भोसले आणि संभाजी राजे भोसले या दोन्ही छत्रपतींच्या काळात सरसेनापती हा बहुमान मिळवलेले एकमेव शुरसेनानी होते. त्याचबरोबर ते महाराणी सोयराराणी साहेब यांचे बंधु होते. हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या लढ्यात जिद्दिने लढा देणाऱ्या आणि आपले अतुलनीय शौर्य दाखवणारे सेनापती म्हणून हंबीरराव मोहिते यांचे नाव घेतले जाते. चित्रपटात प्रविण तरडे यांनी ही मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची आता जगभरातील शिवप्रेमींना उत्सुकता लागली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा