बॉलिवूडवर खऱ्या अर्थाने कुणी राज्य करत असेल तर ते नाव म्हणजे शाहरुख खान! किंग खान, बादशाह इत्यादी बिरुदावली मिरवणाऱ्या शाहरुखवर लाखो तरुणी आजही घायाळ होतात. विशेष म्हणजे शाहरुख ने बॉलिवूडमधील त्याचं आत्ताच हे स्थान स्वकष्टाने मिळवलं आहे. त्याची तीच दृढ इच्छाशक्ती त्याला आज इथपर्यंत घेऊन आली.
आज शाहरुखची कारकीर्द जवळपास तीस वर्षांची झाली आहे. या तीस वर्षांमध्ये शाहरुख ने शंभरीच्या आसपास सिनेमे केले असतील. या तीस वर्षांमध्ये त्याच्या अनेक सिनेमांमध्ये अनेक अभिनेत्रींनी स्क्रीन शेअर केली आहे. कुणी त्याची प्रेयसी झाली तर कुणी त्याची पत्नी, कुणी आईची भूमिका बजावली तर कुणी आजीची!
अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी शाहरुख सोबत काम केलं आहे परंतु त्या आज आपल्यामध्ये नाहीत. काही वर्षांपूर्वीच त्यांचा देहांत झाला आहे. अशा अभिनेत्रींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
दिव्या भारती
शाहरुख खान सोबत दिव्या तिच्या दिवाना या पहिल्याच चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. विशेष म्हणजे या चित्रपटाद्वारे शाहरुखपेक्षा दिव्या लोकांच्या मनावर आपली छाप पाडण्यास यशस्वी ठरली होती. दिव्या त्याकाळातली बॉलिवूडमधील सर्वात सुंदर आणि टॉपची अभिनेत्री होती. परंतु वयाच्या केवळ २२ व्या वर्षी दिव्याचं निधन झालं. एके दिवशी अचानक दिव्या तिच्या घराच्या खिडकीतून खाली पडली आणि तत्क्षणी तिचा मृत्यू झाला. दिव्याचा मृत्यू आजही एक रहस्य बनून राहिलं आहे. काहीजण म्हणतात की तिची हत्या झाली आहे, तर कहींनी तिने आत्महत्या केली असल्याचं मत व्यक्त केलं आहे, तर काहीजण असंही म्हणतात की दिव्याची हत्या ही तिचे पती साजिद नाडियाडवाला यांनी केली आहे. असो या सगळ्या लोकांच्या अफवा आहेत. कारण आजपर्यंत कोणालाही सत्य घटना नेमकी काय आहे हे आजही माहीत नाही.
श्री देवी
या यादीत दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचंही नाव आहे. श्री देवी यांच्या बद्दल काय बोलावं! त्या तर बॉलिवूडच्या पहिल्या महिला सुपरस्टार अभिनेत्री होत्या. ज्यांच्या नुसत्या नावावर तिकिट बारीवर गर्दी व्हायची. त्यामुळे त्यावेळी प्रत्येक जण श्रीदेवी यांना आपल्या चित्रपटामध्ये कास्ट करू इच्छित असे. किंग खान शाहरुख खानला श्रीदेवी यांच्यासोबत दोन चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. शाहरुख खानने १९९६ साली आलेला चित्रपट आर्मीमध्ये श्रीदेवी यांच्या पतीची भूमिका साकारली होती. मात्र, शाहरुखची ही भूमिका या चित्रपटात पाहुण्या कलाकाराचीच भूमिका ठरली होती. यानंतर श्रीदेवी शाहरुखच्या २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झिरो’ या चित्रपटात दिसल्या होत्या. या चित्रपटात मात्र श्री देवी या पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसल्या होत्या. दुर्दैवाने हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच श्रीदेवी यांनी जगाचा निरोप घेतला होता.
रीमा लागू
बॉलिवूड चित्रपटांमध्ये जेव्हा जेव्हा सर्वोत्कृष्ट आईच्या भूमिकेबद्दल बोललं जातं तेव्हा प्रत्येकाच्या ओठांवर पहिलं नाव हे रीमा लागू याचंच येतं. मराठी रंगभूमी गाजवल्यानंतर रीमा यांनी राजश्री प्रोडक्शनच्या सिनेमांमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. रीमा लागू यांनी आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर चित्रपटांमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. रीमा यांनी शाहरुखबरोबर बर्याच चित्रपटात आईची भूमिका केली होती. २०१७ मध्ये टिव्ही मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान रीमा यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्या आपल्या सर्वांना कायमच्या सोडून गेल्या. रीमा यांनी शाहरुखबरोबर ‘कुछ कुछ होता है’, ‘येस बॉस’ आणि ‘कल हो ना हो’ या चित्रपटांमध्ये स्क्रीन शेअर केली होती.
सुधा शिवपुरी
अभिनेत्री सुधा शिवपुरी यांनी ‘क्योंकि सास भी कभी बहुत थी’ या टीव्ही मालिकेत बा नावाची व्यक्तिरेखा साकारून भूमिका घरा घरात आपली ओळख निर्माण केली. त्यांनी शाहरुख खानसोबत ‘माया मेमसाब’ चित्रपटात काम केलं होतं. २०१५ मध्ये ७७ व्या वर्षी सुधा शिवपुरी यांनी वृद्धापकाळाने जगाचा निरोप घेतला.
जोहरा सेहगल
जोहरा सहगल हे चित्रपटसृष्टीतलं एक सुप्रसिद्ध नाव! कभी खुशी कभी गम, दिल से, कल हो ना हो या चित्रपटात त्याने शाहरुख खानबरोबर काम केले. या चित्रपटांमध्ये जोहरा यांनी शाहरुख च्या आजीची भूमिका साकारली होती. २०१४मध्ये दिवंगत अभिनेत्री जोहरा सहगल यांचं वृद्धापकाळाने निधन झालं.