बॉलिवूडमधील रोमान्सचा किंग शाहरुख खान मंगळवारी (२ नोव्हेंबर ) त्याचा वाढदिवस साजरा करत आहेत. २ नोव्हेंबर १९६५ साली दिल्लीमध्ये जन्मलेल्या शाहरुखला बॉलिवूडमध्ये पदार्पण करून ३० वर्ष पूर्ण झाली आहेत. या दरम्यान त्याने अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. त्याने अनेक लोकप्रिय अभिनेत्रींसोबत चित्रपटात रोमान्स केला आहे. यामध्ये ऐश्वर्या रायपासून ते दीपिका पदुकोणपर्यंत अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे. परंतु ९० च्या दशकात काजोल आणि शाहरुखची जोडी सुपरहिट होती. त्या दोघांचे अनेक चित्रपट सुपरहिट झाले आहेत. वैयक्तिक आयुष्यात देखील शाहरुख आणि काजोल खूप चांगले मित्र आहेत.
काजोल खान कुटुंबाच्या अगदी जवळची आहे. शाहरुख खानची पत्नी गौरी आणि त्यांची मुले सुहाना आणि आर्यन यांना देखील काजोल खूप आवडते. परंतु शाहरुख खानचा छोटा मुलगा अबराम याला काजोल काही खास आवडत नाही. शाहरुख खानने त्याच्या एका मुलाखतीत स्वतः सांगितले होते की, अबरामला काजोलचा खूप राग येतो. (Shahrukh Khan birthday special : his son abram khan jealous of kajol)
यावेळी शाहरुख खानने त्याच्या रागामागील कारण देखील सांगितले होते. त्याने सांगितले की, “एकदा शूटिंगला अबराम आला होता. तेव्हा सीन करताना मला जरा लागले होते. तेव्हा अबरामला वाटले की, काजोलमुळे मला जखम झाली आहे. त्याला खूप वाईट वाटले आणि त्याला काजोलचा खूप राग आला. यानंतर जेव्हा केव्हा मी आणि काजोल एकत्र यायचो तेव्हा त्याला ते अजिबात आवडत नसे.” तेव्हा त्याने ‘बाजीगर’ या चित्रपटात त्याचा काम करण्याचा अनुभव शेअर केला होता. त्याने सांगितले होते की, त्याला देखील काजोलचा राग येत होता.
शाहरुख खानने सांगितले की, “जेव्हा मी काजोलसोबत ‘बाजीगर’मध्ये काम करत होतो, तेव्हा आमिरने मला तिच्याबाबत विचारले होते. खरंतर आमिरला काजोलसोबत काम करायचे होते, त्यावेळी मी त्याला सांगितले की, ती खूप वाईट आहे, कामावर लक्ष देत नाही. तू तिच्यासोबत काम करू शकणार नाही.”
शाहरुखने पुढे सांगितले की, “यानंतर संध्याकाळी मी अचानक थिएटरबाहेर गर्दी पाहिली आणि आमिरला सगळं काही क्लिअर करण्यासाठी फोन केला. मी त्याला सांगितले की, मला माहित नाही हे काय झाले आहे, परंतु स्क्रीनवर ती मॅजिकप्रमाणे दिसत आहे.”
सुरुवातीला त्याला काजोल आवडत नव्हती परंतु आता त्या दोघांमध्ये खूप चांगली मैत्री आहे. एवढंच काय तर शाहरुख खानची अशी इच्छा आहे की, त्याची मुलगी सुहाना हिने अभिनयातील गोष्टी काजोलकडून शिकाव्यात. त्याला काजोल एक ईमानदार अभिनेत्री वाटते.
काजोल आणि शाहरुख हे बॉलिवूडमधील रोमँटिक जोड्यंपैकी एक आहेत. त्यांनी ‘बाजीगर’, ‘करण अर्जुन’, ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘तुला उर्फीचा आजार चढलाय काय?’ विचित्र ड्रेसमुळे काजोल आली ट्रोलर्सच्या निशाण्यावर
-‘कमीत कमी मुलाला तरी सोडा’, म्हणत अबरामच्या मागे लागलेल्या फोटोग्राफर्सवर संतापले चाहते