Tuesday, June 24, 2025
Home बॉलीवूड ‘पठाण’, ‘डंकी’ नंतर नयनतारासोबत ‘या’ दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार किंग खान

‘पठाण’, ‘डंकी’ नंतर नयनतारासोबत ‘या’ दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार किंग खान

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान (Shahrukh Khan) बराच काळ मोठ्या पडद्यापासून दुर आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना शाहरुख खानच्या नव्या चित्रपटाची चांगलीच उत्सुकता लागली आहे. शाहरुख खान लवकरच ‘डंकी’ आणि ‘पठाण’ या चित्रपटांमध्ये झळकणार असल्याच्या बातम्या याआधीच समोर आल्या आहेत. परंतु या चित्रपटांसोबतच शाहरुख दाक्षिणात्य दिग्दर्शक एटलीसोबतही काम करताना दिसणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना शाहरुख खानचे तीन धमाकेदार चित्रपट पाहायला मिळणार आहेत. 

किंग खानच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बऱ्याच दिवसांपासून पडद्यावरुन लांब असलेला शाहरुख खान एकापाठोपाठ एक सुपरहीट चित्रपटांमध्ये दिसणार आहे. त्याने पडद्यावरील पुनरागमनाची पूर्ण तयारी केली आहे. ‘डंकी’ आणि ‘पठाण’ या चित्रपटांव्यतिरिक्त शाहरुखने दक्षिणेतील सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते एटलीसोबतही काम केल्याचे वृत्त आहे. पुढील वर्षी शाहरुखचे तीन मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यातील एक एटली यांचा चित्रपटही आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एटलीसोबतच्या शाहरुखच्या पुढच्या चित्रपटाचे नाव ‘जवान’ असेल. लवकरच त्याची अधिकृत घोषणा झाल्याचीही बातमी समोर येत आहे. चित्रपटाच्या नावाचा खुलासा करण्यासाठी एक छोटा टीझर रिलीज करण्याची तयारी सुरू आहे. समोर आलेल्या बातम्यांनुसार शाहरुख ‘जवान’मध्ये दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटात अभिनेत्री नयनतारा तपास अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे, तर सान्या मल्होत्राही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, स्क्रिप्टमध्ये काही बदल करण्याची मागणीही शाहरुखने एटलीकडे केली होती, ती अमलातही आणण्यात आल्याचेही वृत्त आहे.

किंग खानकडून सल्ला मिळाल्यानंतर एटली खूप खूश झाल्याचे सांगण्यात येत आहे. ‘जवान’ व्यतिरिक्त शाहरुख सिद्धार्थ आनंदच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोणसारखे कलाकारही त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. दुसरीकडे, शाहरुखही तापसी पन्नूसोबत राजकुमार हिरानीच्या ‘डंकी’मध्ये दिसणार आहे.

हे देखील वाचा