बॉलिवूडमध्ये सर्वात प्रसिद्ध खानदान म्हटलं की सर्वांच्या मुखातून आपसुकच कपूर खानदानाचे नाव घेतले जाते. याच कपूर खानदानाने आपल्या अभिनयाने समस्त प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. यातील एक महत्त्वाचा व्यक्ती म्हणजे पृथ्वीराज कपूर यांचा लहान मुलगा शम्मी कपूर आहे.
शम्मी कपूरचा जन्म २१ ऑक्टोबर १९३१ साली झाला होता. त्यांचे खरे नाव हे शमशेर राज कपूर असे होते. ते आता या जगात नाहीत. परंतु त्यांच्या जीवनाशी जोडलेले काही किस्से असे आहेत, जे आजही चाहत्यांच्या स्मरणात आहेत. त्यांच्या जयंतीला (वाढदिवस) अवघे ५ दिवस राहिले आहेत. यानिमित्ताने त्यांच्याशी निगडीत काही खास किस्से या लेखात जाणून घेऊया.
शिक्षण दिले होते सोडून
शम्मी कपूर यांना आपला भाऊ राज कपूरमुळे शाळा सोडावी लागली होती. पृथ्वी थिएटर्समध्ये शम्मीला शकुंतला नाटकामध्ये भरतचा रोल मिळाला होता. या नाटकात राज कपूरचाही मोठा रोल होता. परंतु रिहर्सल करण्यासाठी राजला शाळेतून सुट्टी मिळत नव्हती. त्यामुळे ते आपल्या मुख्याध्यापकांशी भांडून शाळा सोडून आले होते. त्याच शाळेत शम्मीही शिक्षण घेत होते. अशामध्ये त्यांनाही शाळा सोडून जावे लागले होते.
शम्मींच्या आयुष्यात आणखी एक प्रसंग घडला होता, जेव्हा ते कॉलेज सोडून घरी आले होते. शम्मी यांनी घरी येऊन वडील पृथ्वीराज यांची माफी मागितली होती. वडिलांनीही शम्मीच्या मनातील गोष्ट हेरली आणि म्हटले होते की, “काही हरकत नाही उद्यापासून थिएटर जॉईन कर.” शम्मी यांना थिएटरमध्ये काम करण्यासाठी ५० रुपये पगार मिळत असायचा.
वडिलांच्या थिएटरमध्ये कामगाराप्रमाणे केले काम
शम्मी यांनी एका कामगाराप्रमाणे आपल्या वडिलांच्या थिएटरमध्ये काम केले होते. त्यांच्या वडिलांनीही त्यांना कधीच स्टारकिड असल्याचे जाणवू दिले नव्हते. कारण शम्मी यांची चित्रपट कारकीर्द बाल कलाकार म्हणून सुरू झाली होती. यादरम्यान त्यांना महिन्याला केवळ १५० रुपये मिळत असायचे.
शम्मी यांच्या अनेक मैत्रिणी होत्या आणि याबाबत त्यांच्या घरातील व्यक्तींनाही माहिती होती. एकवेळ अशी होती, जेव्हा त्यांनी परदेशी बेली डान्सरला डेट केले होते. परंतु थोड्या काळानंतर दोघांचेही ब्रेकअप झाले होते.
नूतन होती बालपणीची गर्लफ्रेंड
अभिनेत्री नूतन ही शम्मी कपूर यांची बालपणीची गर्लफ्रेंड होती. दोघांनीही ‘लैला- मजनू (१९५३)’ चित्रपटात एकत्र काम केले होते. शम्मी ६ आणि नूतन ३ वर्षांचे असल्यापासून मित्र होते.
‘राजकुमार’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हत्तीने त्यांचा पाय मोडला होता. खरंतर ते हत्तीवर बसून शूटींग करत होते. अशामध्ये ही घटना घडली आणि त्यांना दुखापत झाली.
गीताला सिंदूरच्या जागी लावली होती लिपस्टिक
१९५५ मध्ये शम्मी यांंनी गीता बालीसोबत लग्न केले होते. गीताही एक अभिनेत्री होती आणि दोघांची भेट ‘कॉफी हाऊस’ च्या सेटवर झाली होती. यादरम्यान त्यांच्यातील जवळीक वाढली होती.
दोघेही लग्न करण्यासाठी मंदिरात गेले होते. परंतु गीताच्या कपाळावर लावण्यासाठी शम्मी यांच्याकडे सिंदूर नव्हता. त्यावेळी गीताने आपल्या बॅगेतून लिपस्टिक काढून शम्मी यांना दिली आणि त्यांनी सिंदूरच्या जागी लिपस्टिक लावली होती. १९६५ मध्ये गीताचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांनी १९६९ मध्ये नीला देवीसोबत लग्न केले होते.
शम्मी कपूर यांनी सच्चाई, ऍन इव्हनिंग इन पॅरिस, कश्मीर की कली, ब्लफ मास्टर यांसारख्या ५० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.