Friday, March 29, 2024

बच्चन यांना वेळीच उपचार मिळावेत म्हणून बाळासाहेबांनी भर पावसात लढवली होती ‘ही’ शक्कल

महाराष्ट्राच्या राजकारणातील हुकमी एक्का समजल्या जाणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. २३ जानेवारी १९२६ साली बाळासाहेबांचा जन्म झाला. ते एक हुशार राजकारणी आणि व्यंगचित्रकारतर होतेच. ते अतिशय प्रखर वक्ता आणि लेखकही होते. बाळासाहेबांकडे वक्तृत्वाची दैवी देणगी होती. बाळासाहेबांचा ‘शाई’ सोबतचा खूपच जवळचा संबंध होता. एक शाई वापरून ते बोलके व्यंगचित्र काढत, तर दुसऱ्या शाईने ते आपल्या प्रखर लेखणीतून भल्याभल्याचा समाचार घेत. मराठी भाषा, मराठी माणूस, भगवा आणि शिवाजी महाराज या गोष्टी बाळासाहेबांसाठी नेहमीच महत्वाच्या राहिल्या. त्यांनी ‘शिवसेना’ पक्षाची स्थापना केली, व्यंगचित्रांवर आधारित पहिल्या मराठी ‘मार्मिक’ मासिकाची सुरुवात केली, ‘सामना’ वृत्तपत्राची सुरुवात केली. हा सगळा खटाटोप होता फक्त आणि फक्त मराठी माणसाच्या भल्यासाठीच.

बाळासाहेबांचे राजकारणासोबतच मराठी आणि हिंदी दोन्ही चित्रपटसृष्टींसोबत जवळचे नाते होते. त्याच्या या नात्याचे दर्शन अनेकदा लोकांना घडले. आज बाळासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण बाळासाहेब आणि त्यांचे चित्रपटसृष्टीशी असणारे हेच खास नाते नक्की होते तरी कसे हे पाहणार आहोत.

आजच्या आणि उद्याच्या पिढीला बाळासाहेब समजण्यासाठी त्यांच्यावर २०१९ मध्ये ‘ठाकरे’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दकी याने बाळासाहेबांची तर अमृता राव हिने त्यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजित पेंडसे यांनी केले होते तर निर्मिती आणि लेखन संजय राऊत यांचे होते.

१९८२ साली बेंगलोर शहरात ‘कूली’ सिनेमाच्या चित्रिकरणादरम्यान अमिताभ बच्चन यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांना तातडीने मुंबईत आणण्यात आले होते. मात्र त्या दिवशी इतका पाऊस होता की, अमिताभ यांना घेऊन येणारी रुग्णवाहिका देखील पावसात अडकली होती. तेव्हा बाळासाहेबांनी त्वरित अमिताभ यांच्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली होती.

अमिताभ बच्चन आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नाते अतिशय जवळचे होते. त्याचमुळे बाळासाहेब जया बच्चन यांना त्यांची सून समजायचे. बाळासाहेबांनी जया यांना हा सन्मान आयुष्यभर दिला.

असे म्हटले जाते की, रामगोपाल वर्मा दिग्दर्शित ‘सरकार’ आणि ‘सरकार राज’ हे दोन्ही चित्रपट बाळासाहेबांच्या आयुष्याशी मिळते जुळते आहेत. अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका निभावली असून, त्यांची भूमिका देखील बाळासाहेबांवरच प्रेरित आहे.

जेव्हा मुंबई बॉम्ब ब्लास्ट केसमध्ये संजय दत्तचे नाव आले तेव्हा संजयला सोडवण्यासाठी सुनील दत्त यांनी अनेक प्रयत्न केले होते. तेव्हा सुनील दत्त काँग्रेसमध्ये होते. मात्र त्यांना पक्षातून कोणीच मदत केली नाही. तेव्हा ते बाळासाहेबांकडे पोहचले, बाळासाहेबांनी देखील ‘मला तुमचा अभिनय आवडतो म्हणून मी फक्त तुमच्यासाठी संजयला मदत करेल’ असे सांगितले होते.

बाळासाहेबांसोबतच त्यांची सून स्मिता देखील सिनेसृष्टीजवळ आहेत. स्मिता यांनी अनेक चित्रपटाची निर्मिती केली असून त्या बाळासाहेबांचे मोठे पुत्र जयदीप ठाकरेंच्या पत्नी होत्या. आता मात्र ते दोघे वेगळे झाले आहेत.

शाहरुख खानने आईपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना खेळण्यास मिळावे असे विधान केल्यानंतर बाळासाहेब ठाकरे खूप नाराज झाले होते. तेव्हाच शाहरुखचा ‘माय नेम इज खान’ सिनेमा प्रदर्शित होणार होता. शाहरुखच्या त्या विधानामुळे चित्रपट प्रदर्शनाला अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या, मात्र अनेक प्रयत्नांनी बाळासाहेब चित्रपट प्रदर्शनासाठी तयार झाले होते.

बाळासाहेब ठाकरे आणि दिलीप कुमार यांच्यात खूप चांगली मैत्री होती. अनेकदा बाळासाहेब आणि दिलीप कुमार एकत्र गप्पा मारताना दिसायचे. बाळासाहेबांना दिलीप कुमारांचा अभिनय खूप आवडायचा.

हे देखील वाचा