Tuesday, June 6, 2023

दुसऱ्यांदा अंमली पदार्थ प्रकरणात अडकलाय श्रध्दा कपूरचा भाऊ, २००८ मध्येही समोर आले होते नाव

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरशी (Shraddha Kapoor) संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीच्या भावाला पोलिसांनी बेंगळुरूमधून ताब्यात घेतले आहे. सिद्धांत कपूरवर (Siddhant Kapoor) अंमली पदार्थ घेतल्याचा आरोप आहे. छापा टाकल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर उठलेले अंमली पदार्थांचे प्रकरण रोजच चर्चेत असते. या प्रकरणात आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींची नावे समोर आली आहेत. 

समोर आलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ प्रकरणात अडकलेला शक्ती कपूर (Shakti Kapoor) यांचा मुलगा सिद्धांत कपूर याला पोलिसांनी बेंगळुरूमधून ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे श्रद्धा कपूरच्या भावासह एकूण सहा जण अंमली पदार्थ टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळले आहेत. हे सर्व लोक बंगळुरूच्या एमजी रोडवरील हॉटेलमध्ये पार्टी करत होते. यावेळी पोलिसांनी छापा टाकून तत्काळ कारवाई केली. (shraddha kapoor s brother siddhanth kapoor detained by bengaluru police)

विशेष म्हणजे सिद्धांत अंमली पदार्थ प्रकरणात अडकण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २००८ मध्येही मुंबईत एका रेव्ह पार्टीदरम्यान त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलिसांनी छापे टाकल्यानंतर ताब्यात घेतलेल्या २४० जणांमध्ये सिद्धांतचाही समावेश होता.

एका गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी एमजी रोडवरील एका हॉटेलवर छापा टाकला, जिथे पार्टी आयोजित केली होती. यादरम्यान पोलिसांनी अमली पदार्थाच्या सेवनाचा संशय असलेल्या लोकांचे नमुने पाठवले. तपासणीत पॉझिटिव्ह आढळलेल्या सहा जणांमध्ये श्रद्धा कपूरच्या भावाच्या नमुन्याचाही समावेश होता.

साल २०२० मध्ये अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू झाल्यापासून, अनेक बड्या बॉलिवूड कलाकारांची नावे अंमली पदार्थ प्रकरणात सातत्याने समोर येत होती. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने चौकशी केलेल्यांमध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूर देखील होती. मात्र, या काळात काहीही सिद्ध झाले नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा