Tuesday, June 18, 2024

श्रीदेवींनी अवघ्या ४ वर्षांच्या वयात ठेवले होते फिल्मी दुनियेत पाऊल; बॉलिवूडमध्ये घ्यायच्या अभिनेत्यांपेक्षाही अधिक फी

या बॉलिवूडच्या जगात असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी त्यांच्या अभिनयाने, त्यांच्या पडद्यावरील वावरामुळे, त्यांच्या नृत्यामुळे एकंदरीत त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. अशाच काही कलाकारांची नावे फक्त उच्चारल्यानंतर डोळ्या समोरून सर्रकन त्यांच्या चित्रपटांची नावे, त्यांच्या दमदार भूमिका जातात. या कलाकारांनी बॉलिवूडमध्ये असे नाव कमावले जे या चित्रपट इंडस्ट्रीच्या इतिहासात अजरामर झाले आहे. असेच एक नाव म्हणजे अभिनेत्री श्रीदेवी. श्रीदेवी यांनी त्याच्या अभिनयाने, नृत्याने आणि चूलबुलेपणामुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. याच बॉलिवूडच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची शुक्रवारी (२४ फेब्रुवारी) पुण्यतिथी आहे. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे कलाविश्वातीलच काय संपूर्ण जगातील लोकांना मोठा धक्का बसला होता. वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज श्रीदेवी यांच्या जयंतीच्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याबद्दल अधिक माहिती…

 

View this post on Instagram

 

A post shared by Sridevi Kapoor (@sridevi.kapoor)

श्रीदेवी यांचा जन्म १३ ऑगस्ट, १९६३ रोजी झाला होता. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी दक्षिणेत तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्ल्याळम चित्रपटांमध्ये अभिनय केला. १९६७ साली वयाच्या चौथ्या वर्षी ‘थुनैवन’ या तमिळ चित्रपटातून श्रीदेवी यांनी बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. १९७५ साली वयाच्या १२ व्या वर्षी त्यांनी ‘ज्युली’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये बालकलाकार म्हणून पदार्पण केले. त्यानंतर १९७८ साली वयाच्या १५ व्या वर्षी त्या ‘सोलवा सावन’ या पहिल्या बॉलिवूड सिनेमात मुख्य भूमिकेत दिसल्या. मात्र, त्यांच्या करिअरला खरी कलाटणी देणारा सिनेमा ठरला १९८३ साली आलेला ‘हिम्मतवाला.’ या सिनेमानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही आणि एकापेक्षा एक सरस चित्रपट त्यांनी केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sridevi Kapoor (@sridevi.kapoor)

श्रीदेवी यांनी जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, तेव्हा या क्षेत्रावर पुरुष कलाकारांची पकड होती. अभिनेत्यांच्या नावावरच सिनेमे चालायचे, त्यामुळे साहजिकच अभिनेत्री थोड्या मागे होत्या. मात्र, श्रीदेवी यांची एन्ट्री झाली आणि ही समीकरणं हळूहळू बदलायला लागली. त्यांनी त्यांच्या मेहनतीने आणि प्रभावी अभिनयाने सिनेसृष्टीमधे ती जागा बनवली, जिच्याबद्दल सर्व अभिनेत्री स्वप्न तर बघतात पण ते स्वप्न सत्यात उतरवू शकत नाहीत. त्यांच्या लोकप्रियतेमुळेच त्यांना अभिनेत्यांपेक्षा जास्त फी दिली जायची. ‘नगिना’ या सिनेमासाठी त्यांनी ऋषी कपूर यांच्यापेक्षा अधिक फी घेतल्याचे सांगितले जाते.

श्रीदेवी यांची अजून एक खासियत म्हणजे त्यांचा डान्स. त्यांनी जेवढे अभिनयाच्या जोरावर लोकांच्या मनात स्थान मिळवले, तेवढेच त्यांनी डान्सच्या जोरावर देखील नाव कमावले. श्रीदेवी यांना जर कोणी कमर्शियल अभिनेत्री म्हणून ओळखत असतील, तर त्यांनी श्रीदेवी यांचे ‘सदमा’, ‘इंग्लिश विंग्लिश’, ‘मॉम’, ‘लम्हे’ आदी सिनेमे पाहावे. तेव्हाच त्यांच्या लक्षात येईल की, त्या किती ताकदीच्या अभिनेत्री होत्या. सोबतच त्या केवळ १३ वर्षाच्या असतानाच त्यांनी ‘मूंदरू मुदित’ या सिनेमात सुपरस्टार रजनीकांत यांच्या आईची भूमिका साकारली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sridevi Kapoor (@sridevi.kapoor)

केवळ बॉलिवूडचं नाही, तर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही त्यांनी त्यांचे साम्राज्य उभे केले. त्यांनी ’16 वयथीनिलए’, ‘मंदरु मुदिचु’, ‘सिगप्पू रोजकाल’, ‘कल्याणरमन’, ‘जोनी’, ‘मीनदुम कोकिला’ आदी अनेक तामिळ चित्रपटांमध्ये काम केले. या दाक्षिणात्य सिनेसृष्टीनेच त्यांना एक अभिनेत्री म्हणून समोर आणले होते. सुरुवातीला श्रीदेवी यांना हिंदी बोलायला खूप अडचण यायची. त्यांचे आधीचे काही सिनेमे इतर अभिनेत्रींच्या आवाजात डब केले जायचे. मात्र, हळूहळू त्यांनी हिंदी भाषा आत्मसात केली आणि या भाषेवरही प्रभुत्व मिळवले. ‘चांदणी’ हा पहिला सिनेमा होता जो त्यांनी स्वतःच्या आवाजात डब केला.

श्रीदेवी यांनी त्यावेळच्या सर्वच टॉपच्या अभिनेत्यांसोबत काम केले. त्यात अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, जितेंद्र, ऋषी कपूर, विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, राजेश खन्ना, अनिल कपूर, संजय दत्त, जॅकी श्रॉफ यासोबतच सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार आदी जवळपास सर्वच दशकातील हिट अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sridevi Kapoor (@sridevi.kapoor)

श्रीदेवी यांनी ३०० सिनेमे केले. २०१७ साली प्रदर्शित झालेला ‘मॉम’ हा सिनेमा त्यांचा ३०० वा सिनेमा होता. या चित्रपटांसोबतच श्रीदेवी यांनी ‘कामयाब’, ‘होशियार’, ‘खुदगर्ज’, ‘विजय’, ‘अभिमन्यू’,’अजूबा’, ‘लेकिन’, ‘बेटा’, ‘डर’, ‘आइना’, ‘बाजीगर’, ‘मोहरा’, ‘अंजाम’, ‘दिल तो पागल है’, ‘युगपुरुष’, ‘कारोबार’, ‘यादें’, ‘शक्ति: द पावर’, ‘बागबान’ आदी अनेक सुपरहिट सिनेमे नाकारले होते.

श्रीदेवी या त्यांच्या व्यावसायिक आयुष्यात शिखरावर असतानाच त्यांच्या आणि निर्माता, दिग्दर्शक बोनी कपूर यांच्या नात्याबद्दल अनेक बातम्या येऊ लागल्या होत्या. बोनी कपूर तर श्रीजी यांना पाहताचक्षणी त्यांच्या प्रेमात पडले होते. मात्र, त्यांना प्रपोज करण्यासाठी किंवा त्यांचा मनात जागा निर्माण करण्यासाठी बोनी कपूर यांना १२ वर्षांहून अधिक काळ लागला. बोनी कपूर यांना त्यांच्या प्रयत्नात यश आले आणि त्यांनी २ जून, १९९६ रोजी लग्न केले. बोनी कपूर यांचे हे दुसरे लग्न होते, त्यांनी मोना कपूर यांच्याशी पहिले लग्न केले, यात त्यांना अर्जुन आणि अंशुला अशी दोन मुलं होती. पण पुढे त्यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट देत श्रीदेवी यांच्याशी लग्न केले. असे सांगितले जाते की, श्रीदेवी या लग्नाआधीच प्रेग्नंट होत्या. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांना जान्हवी आणि खुशी या दोन मुली आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sridevi Kapoor (@sridevi.kapoor)

लग्नानंतर काही दिवसांनी श्रीदेवी यांनी चित्रपटांमधून मोठा ब्रेक घेतला, आणि २०१२ साली त्यांनी गौरी शिंदेच्या ‘इंग्लिश विंग्लिश’ चित्रपटामधून धमाकेदार पुनरागमन केले. हा सिनेमा अतिशय सुंदर आणि लक्षवेधी ठरला. त्यात श्रीदेवी यांच्या लाजवाब अभिनयाने सिनेमाला चार चाँद लावले होते.

श्रीदेवी यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक पुरस्करांवर नाव कोरले. यात फिल्मफेअरसोबतच अनेक दाक्षिणात्य पुरस्कारांचा देखील समावेश होता. त्यांना २०१३ साली भारताच्या सर्वोच्च अशा पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित केले गेले. अशा या महान अभिनेत्रीचा २४ फेब्रुवारी, २०१८ ला दुर्दैवी अंत झाला आणि बॉलिवूडमधील एका युगाचा देखील अस्त झाला.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
स्वराच्या लग्नावर महंत राजू दास यांचे वादग्रस्त विधान; म्हणाले, ‘ज्या समाजात संबंध प्रस्थापित…’
नवाजुद्दीन सिद्धीकीच्या नोकरणीने साक्ष बदलवताच भावाने साधला निशाणा म्हणाला, ‘अजून कितींना विकत घेणार?’

हे देखील वाचा