Saturday, July 6, 2024

‘हे शक्य नाही’, ड्रग्ज प्रकरणात मुलाचे नाव समोर आल्यानंतर शक्ती कपूर यांना बसला धक्का

अभिनेता शक्ती कपूरचा (shakti kapoor) मुलगा सिद्धांत कपूर (siddhant kapoor) याला बेंगळुरू येथील रेव्ह पार्टीवर छापा टाकल्यानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. बेंगळुरू पोलिसांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले की, श्रद्धा कपूरच्या भावाचे नाव ड्रग्ज सेवन करणाऱ्या ६ लोकांमध्ये आहे. ३७ वर्षीय अभिनेत्याने ‘शूटआउट अॅट वडाळा’, ‘हसीना पारकर’, ‘जज्बा’ आणि क्राइम-थ्रिलर वेब सीरिज ‘भौकाल’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

जेव्हा मीडियाने ड्रग्ज प्रकरणी अभिनेत्याच्या प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला तेव्हा शक्ती कपूरने उत्तर दिले, “मी फक्त एक गोष्ट सांगू शकतो – ते शक्य नाही”. माध्यमांशी बोलताना शक्ती कपूर यांनी आपला मुलगा ड्रग्ज घेत असल्याचं नाकारलं आहे. अभिनेता म्हणाला, “मी मुंबईत आहे आणि मला काय घडत आहे हे माहित नाही. मला फक्त वृत्तवाहिन्यांवरून कळले. आतापर्यंत मला एवढेच माहीत आहे की कोणालाही अटक करण्यात आलेली नाही आणि सिद्धांतला फक्त ताब्यात घेण्यात आले आहे.”

जेव्हा शक्ती कपूरला विचारण्यात आले की सिद्धांत कामासाठी बेंगळुरूला गेला होता, तेव्हा अभिनेता म्हणाला, “होय, तो एक डीजे (डिस्को जॉकी) आहे आणि तो त्याच्या कामासाठी पार्ट्यांमध्ये जात असतो, आणि म्हणूनच तो बंगळुरूला जातो. या सर्व बातम्या कुठून येत आहेत हे मला माहीत नाही. मी माझ्या मुलाशी लवकरच बोलेन. मला एवढेच माहीत आहे की ते खरे असू शकत नाही.”

मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, सिद्धांत रविवारी मुंबईहून बेंगळुरू रेव्ह पार्टीला गेला होता. कपूर कुटुंबीयांना याबाबत कोणतीही माहिती नव्हती. मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरू पोलिसांनी रविवारी एमजी रोडवर असलेल्या हॉटेलवर छापा टाकला तेव्हा सिद्धांत आणि इतर अनेक जण ड्रग टेस्ट पॉझिटिव्ह आढळले. या गुंतलेल्या लोकांनी आधीच ड्रग्सचे सेवन केले होते आणि पार्टीला हजेरी लावली होती किंवा त्यांनी हॉटेलमध्ये प्रतिबंधित पदार्थांचे सेवन केले होते की नाही याची पुष्टी अद्याप पोलिसांनी केलेली नाही.

२०२० मध्ये, सुशांत सिंग राजपूतच्या (sushant singh rajput) मृत्यूच्या तपासादरम्यान समोर आलेल्या ड्रग्जच्या प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने श्रद्धा कपूरला चौकशीसाठी बोलावले होते. अभिनेत्रीने त्याच्या पवना गेस्टहाऊसवर सुशांतच्या ‘छिछोरे’ च्या सक्सेस पार्टीला हजेरी लावल्याचे कबूल केले होते, परंतु कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज वापरण्यास नकार दिला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा