Monday, July 1, 2024

कॅप्टन विक्रम बत्रा यांची शौर्यगाथा सांगणाऱ्या ‘शेरशाह’ची तारिख ठरली; ‘या’ दिवशी होणार सिनेमा रिलीझ

चित्रपटगृह बंद असले, तरी ओटीटी प्लॅटफॉर्मचा पर्याय उपलब्ध झाल्याने, अनेक प्रदर्शनाअभावी रखडलेले सिनेमे प्रदर्शित होण्यास सुरुवात झाली आहे. यात अजय देवगणचा भुज, फरहान अख्तरचा तुफान हे सिनेमे लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटांसोबत अजून एक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो सिनेमा आहे सिद्धार्थ मल्होत्राचा ‘शेरशाह.’ मागील बऱ्याच दिवसांपासून या सिनेमाची चर्चा होती, अखेर हा सिनेमा स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे.

सिद्धार्थ मल्होत्राचा ‘शेरशाह’ हा सिनेमा भारतासह जगभरातील २४० हून अधिक देशांमधील लोकांना १२ ऑगस्ट पासून ऍमेझॉन प्राईम व्हिडिओवर पाहायला मिळणार आहे. गुरुवारी (१५ जुलै) ऍमेझॉन ओरिजिनल चित्रपट ‘शेरशाह’ या चित्रपटाच्या प्रीमिअरची घोषणा करण्यात आली आहे. कारगिलमध्ये पराक्रम केलेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनपटावर आधारित हा सिनेमा असणार आहे. या सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रा कॅप्टन विक्रम बत्रा यांची मुख्य भूमिका साकारणार आहे. शेरशहा ही शौर्य, प्रेम आणि त्यागाची कहाणी आहे.

सिद्धार्थने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टला आतापर्यंत १ लाखापेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.

या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्या विक्रम बत्रा यांच्या पराक्रमाची गाथा उलगडण्यात आली आहे. १९९९ साली कारगिलच्या युद्धात त्यांनी जे बलिदान दिले, त्याच बलिदानाला कृतज्ञतापूर्वक दिलेली मानवंदना आहे. विक्रम बत्रा यांना ‘शेरशाह’ या नावाने ओळखले जायचे. त्यांनी कारगिल युद्धात त्यांचे हे नाव सार्थ केले. कॅप्टन बत्रा यांनी या युद्धात दिलेला साहसी लढा आणि त्यांच्या बलिदानाचा भारताच्या विजयामध्ये मोठा वाटा होता.

‘शेरशाह’ या सिनेमाचे दिग्दर्शन विष्णू वर्धन यांनी केले असून, धर्मा प्रोडक्शन्स व काश एन्टरटेन्मेंट यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘शेरशाह’ हा बॉलिवूडचा या वर्षातील सर्वात मोठा युद्धावर आधारित असणारा चित्रपट ठरणार आहे.

या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि किआरा आडवाणी यांच्या मुख्य भूमिका असून, शिव पंडित, राज अर्जुन, प्रणय पचौरी, हिमांशू अशोक मल्होत्रा, निकितिन धीर, अंकिता गोराया, अनिल चरणजीत, साहिल वैद, शताफ फिगर आणि पवन चोप्रा हे देखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा