Saturday, June 29, 2024

स्कायडायविंग करत 13,000 हजार फूटावरुन ‘योद्धा’ चे पोस्टर लॉन्च; सिनेसृष्टीत पहिल्यांदाच…

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth malhotra) सध्या सिनेसृष्टीत चांगलाच चर्चेत आहे. सिद्धार्थचा योद्धा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल चाहत्यांमधील उत्सुकता शिगेला पोहचली आहे. दरम्यान, या चित्रपटाचं नवं पोस्टर हटके पद्धतीने लॉन्च करण्यात आलं.

सिद्धार्थ मल्होत्राने त्याचा व्हिडीओ शेअर केला असून सिनेसृष्टीत पहिल्यांदाच स्कायडायविंग करत एखाद्या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च केले असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून सिद्धार्थच्या या चित्रपटाची चर्चा सुरु होती. १५ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे तर १९ फेब्रुवारीला याचा टीझर रीलिज होणार आहे. या पूर्वी स्कायडायविंग करत 13,000 हजार फूटावरुन या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च करण्यात आलं. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

त्याच्या या व्हिडीओवर कमेंट्स अन् लाईक्सचा वर्षाव होत आहे. अनोख्या पद्धतीने पोस्टर लॉन्च केल्याने चाहत्यांमध्ये चित्रपट पाहण्याची आतुरता आणखी वाढल्याची दिसून येत आहे.

‘योद्धा’ या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासह दिशा पटानी आणि राशी खन्ना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. करण जोहर, शशांक खेतान, अपूर्व मेहता यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तसेच पुष्कर ओझा आणि सागर आंब्रे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अॅक्शन आणि रोमांचचा या चित्रपटात धमाका असल्याचं यापूर्वी सिद्धार्थने सांगितलं होतं. त्याच पद्धतीने आता योद्धाचं पोस्टर लॉन्च करण्यात आलं आहे.

हा चित्रपट विमान हायजॅक अन् दहशतवाद्यांशी लढणाऱ्या तसेच विमानात उपस्थित असलेल्या सर्व प्रवाशांना सुखरूप परत आणणाऱ्या एका योद्ध्याची कथा दाखवण्यात आली आहे. या योद्ध्याच्या भूमिकेत सिद्धार्थ मल्होत्रा ​​दिसणार आहे. या चित्रपटापूर्वी सिद्धार्थने ‘शेरशाह’मध्ये सैनिकाची भूमिका साकारली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

जॉनी लिव्हरने किंग खानचे केले तोंडभरुन कौतुक तर सलमानला म्हणाला…
ना विक्की ना सासर अंकिताने आजी अन् आईसोबत साजरा केला व्हॅलेंटाईन डे; घटस्फोटाच्या चर्चेला उधाण

हे देखील वाचा