Friday, July 5, 2024

अंतिम अरदासच्या वेळी भावूक झाले सिद्धू मूसेवालाचे वडिल; म्हणाले, ‘त्याला कशाची शिक्षा मिळालीय?’

पंजाबचा दिवंगत गायक सिद्धू मूसेवाला (Sidhu Moosewala) याच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी आज (८ जून) अखेरची प्रार्थना (अंतिम अरदास) ठेवण्यात आली. यादरम्यान आपल्या आवडत्या गायकासाठी अखेरची प्रार्थना करण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमली होती. यादरम्यान सिद्धूचे वडील बलकौर सिद्धू यांचे आपल्या मुलाची आठवणीत डोळे पाणावले. गुरु ग्रंथ साहिबच्या पठणानंतर भावूक झालेल्या वडिलांनी सिद्धूशी संबंधित अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर केल्या. यासोबतच आपल्या नावाबाबत सुरू असलेल्या वादांमुळे ते किती नाराज होते, हेही सांगितले.

सिद्धूचे वडील म्हणाले, “माझ्या मुलाला कधीही कोणाचे वाईट करावे वाटत नव्हते आणि त्याने कधीही कोणाचे केले नाही. एकदा मला मिठी मारून तो खूप रडला. तो म्हणाला, ‘बापू मैं तो किसे दे नाल माड़ा नी कित्ता फेर सारे विवाद मेरे नाम दे नाल ही क्यों जुड़ जांदे ने.'” इतकंच नाही, तर आपल्या मुलाला कोणत्या गोष्टीची शिक्षा मिळाली, हे आजपर्यंत कळत नसल्याचं दुःखी वडिलांनी व्यक्त केलं. (sidhu moose wala antim ardas father could not stop tears)

इतकंच नाही, तर त्यांचा मुलगा सिद्धू मुसेवालाला पुढच्या १०-१५ वर्षांपर्यंत जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही बलकौर सिद्धू म्हणाले. ते पुढे म्हणाले, “मला सिद्धूला त्याच्या गाण्यांद्वारे, त्याच्या आठवणींद्वारे १०-१५ वर्षे जिवंत ठेवायचे आहे.” सिद्धूच्या यशाबद्दल ते म्हणाले की, त्याने जे काही बनवले ते स्वत: बनवले. बलकौर सिंग म्हणाले की, “आमची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. मी त्याला खर्चायला पैसेही देऊ शकत नव्हतो. त्याने मेहनतीने बारावी केली. त्याने कधीच मला पैशांसाठी त्रास दिला नाही. जेव्हा जेव्हा त्याला पैशांची गरज भासली, तेव्हा तो आपली गाणी विकून पैसे गोळा करत असे. यशाची उंची गाठल्यानंतरही त्याने कधीही खिशात पर्स ठेवली नाही. त्याला पैशांची गरज पडली, की तो माझ्याकडे मागायचा. घरातून बाहेर पडताना तो नेहमी माझ्या पाया पडून जात असे. तो नेहमी आईला मिठी मारून घराबाहेर पडत असे.”

२९ मे रोजी पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याची काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्याच्या हत्येप्रकरणी गँगस्टर कुलदीप बिश्नोईच्या टोळीचे नाव समोर येत आहे. मूसेवालाच्या सर्व मारेकऱ्यांचा पोलिस शोध घेत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा