Wednesday, April 30, 2025
Home कॅलेंडर अवघ्या १० वर्षात ५०० सिनेमे केले, तिच्याच आयुष्यावर ‘द डर्टी पिक्चर’ बनवला गेला; साऊथची बोल्ड आणि ब्युटीफुल

अवघ्या १० वर्षात ५०० सिनेमे केले, तिच्याच आयुष्यावर ‘द डर्टी पिक्चर’ बनवला गेला; साऊथची बोल्ड आणि ब्युटीफुल

साऊथ चित्रपट सृष्टीतील ग्लॅमरस आणि विवादित अभिनेत्री म्हणजे सिल्क स्मिता. दिनांक २ डिसेंबर १९६० रोजी स्मिताचा आंध्रप्रदेशातील एल्लुरू गावात जन्म झाला. विजयलक्ष्मी वडलापति हे स्मिताचे खरे नाव होते. मात्र, चित्रपटांसाठी तिने सिल्क स्मिता (Silk Smitha) नाव लावले.

लहानपणापासूनच स्मिताने आर्थिक समस्यांना तोंड दिले. अगदी लहान वयातच तिचे लग्न लावून दिले. सासरच्यांनी स्मितावर अनेक अत्याचार केले. या जाचाला कंटाळून स्मिता घर सोडून चेन्नईला निघून आली.

तिथे तिला पुन्हा एकदा तिचे अभिनयात काम करायचे स्वप्न खुणावायला लागले. सुरुवातीला तिने टच-अप आर्टिस्ट म्हणून काम करायला सुरवात केली. हे करत असताना तिच्या डोळ्यात मात्र मोठ्या पडद्यावर काम करण्याचे स्वप्न अधिकच वाढत गेले.

तिच्यातील अभिनयाची ओढ सर्वप्रथम डायरेक्टर वीनू चक्रवर्ती यांनी बरोबर हेरत त्यांनी तिला ग्रूम करायला सुरु केले. याचा सकारात्मक परिणाम म्हणजे तिला मल्याळम चित्रपट ‘इनाया तेडी’ मध्ये काम करण्याची संधी मिळाली. लगेच ‘वंडी चक्रम’ हा तामिळ चित्रपट तिला मिळाला, आणि तिचे नशीब पालटले. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. या सिनेमातील तिच्या भूमिकेचे नाव सिल्क असल्याने, स्मिताने नंतर तेच नाव तिच्या खऱ्या नावासोबत जोडून घेतले आणि झाली ‘सिल्क स्मिता.’

चित्रपटात असणारे सिल्क स्मिताचे तिचे नृत्य म्हणजे त्या चित्रपटाच्या यशाची किल्ली असायची. त्याकाळी स्मिताला एका गाण्यासाठी तब्बल ५० हजार रुपये दिले जात होते. तिच्या घराबाहेर निर्माते, दिग्दर्शक पैसे घेऊन रांग लावून उभे असायचे. चित्रपटात असलेल्या तिच्या एका गाण्यावर चित्रपटचे डिस्ट्रीब्यूटर चित्रपट घ्यायचे. तिच्या या लोकप्रियतेमुळेच तिने फक्त दहा वर्षाच्या करियर मध्ये ५०० चित्रपटांमध्ये काम केले. तिने साउथचे सुपरस्टार रजनीकांत, कमल हसन आणि चिरंजीवी यांच्यासोबत देखील काम केले होते.

तिच्या या मिळणाऱ्या यशाला एकटेपणाची किनार होती. एवढे यश मिळत असूनही ती एकटी होती. तिच्यावर प्रेम करणारे, तिच्यासोबत असणारे असे कोणीही नव्हते. कदाचित या कारणामुळेच सिल्क स्मिता व्यसनांच्या आधीन झाली. २३ सप्टेंबर १९९६ मध्ये ती तिच्या घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसली. (Truth About Silk Smitha’s Life)

“स्मिताचा मृत्यू का आणि कसा झाला याचे उत्तर आजही कोणाजवळच नाहीये. काही दिवसांनी पोलिसांनी देखील तिच्या मृत्यूला आत्महत्या म्हणून घोषित केले.”

अशा या बोल्ड अँड ब्यूटीफुल अभिनेत्रींच्या आयुष्यावर आधारित विद्या बालन अभिनित ‘द डर्टी पिक्चर’ (The Dirty Picture) हा चित्रपट देखील काढण्यात आला. या चित्रपटाने त्यावर्षी ३ राष्ट्रीय पुरस्कार मिळवले.

हेही वाचणं महत्त्वाचं –

हे देखील वाचा