आता तर खूपच प्रकर्षाने वाटत आहे की, यावर्षी संगीतसृष्टीवर मोठी संक्रांत आली आहे. लता मंगेशकर, बप्पी दा आदी दिग्गज कलाकारांनी या जगाचा निरोप घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा संगीत विश्वाला हादरून टाकणारी बातमी समोर आली आहे. अतिशय लोकप्रिय गायक म्हणून ओळखला जाणाऱ्या केके चे वयाच्या ५३ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. केके च्या अशा अचानक जाण्यामुळे संगीत विश्वासह त्याच्या फॅन्सला मोठा धक्का बसला आहे. बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट गायकांपैकी एक गायक म्हणून केके ओळखला जायचा.
प्रत्येक गाण्यांमधून केकेने त्याचे वेगळेपण सिद्ध केले. केके चे खरे नाव कृष्णकुमार कुन्नत असे होते. ३१ मे रोजी रात्री जेव्हा केकेच्या मृत्यूची बातमी आली तेव्हा कोणाचाच यावर विश्वास बसेना. सर्वच लोकं ही बातमी देखील इतर बातम्यांप्रमाणे अफवा असावी अशी प्रार्थना करत होते. मात्र असे काहीच झाले नाही आणि दुर्दैवाने ही बातमी खरी निघाली. केकेचे निधन हे बॉलिवूडची मोठे नुकसान असले तरी प्रत्येक संगीत प्रेमीसाठी वैयक्तिक नुकसान आहे. केकेच्या निधनावर बॉलिवूडसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शोक व्यक्त केला आहे.
केके कोलकात्यातील एका कॉन्सर्टमध्ये परफॉर्मन्स देत असताना त्याचे निधन झाले. या कॉन्सर्टदरम्यानच त्याची तब्येत बिघडली आणि तो अचानक खाली कोसळला. त्याला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मात्र अजूनही केके च्या मृत्यूचे खरे कारण समोर आले नसले तरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचे निधन झाल्याचे प्राथमिक तपासात सांगितले जात आहे. कोलकात्यामध्ये कॉन्सर्टदरम्यान त्याला स्ट्रोक आला. लगेच त्याला कोलकाता मेडिकल रिसर्च इंस्टिट्यूटमध्ये नेले गेले. मात्र तोपर्यंत वेळ झाला होता. डॉक्टरनी लगेच त्याला मृत घोषित केले. डॉक्टरांनी अजून केकेच्या मृत्यूवर भाष्य केले नसले तर केकेच्या पोस्टमार्टम रेपोर्टनंतर नक्कीच मृत्यूचे कारण समोर येईल.
केकेला ३१ मे रोजी रात्री १०.३० वाजता हॉस्पिटलमध्ये नेले गेले. तो दक्षिण कोलकात्याच्या Nazrul Mancha नावाच्या ऑडिटोरियममध्ये परफॉर्म करत होता. तिथेच तो अचानक बेशुद्ध होऊन खाली कोसळला. केके दोन दिवस कोलकात्यामध्ये परफॉर्मन्ससाठी गेला होता. त्याचा सोमवारी ३० मेला एक कॉन्सर्ट झाला होता. केकेने त्याच्या लाईव्ह परफॉर्मन्सचे काही फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते. तेव्हा कोणालाच वाटले नाही की पुढच्या काही तासात काय होणार आहे.
केकेने त्याच्या करिअरची सुरुवात १९९६ साली आलेल्या ‘माचीस’ सिनेमातील ‘छोड आई हम वो गलिया’ या गाण्याने केली. त्यानंतर त्याने ‘तड़प तड़पके’, ‘बर्दाश्त नहीं कर सकता’, ‘दस बहाने’, ‘आंखों में तेरी’, ‘तू ही मेरी शब है’, ‘खुदा जाने’, ‘जिंदगी दो पल की’ आदी असंख्य हिट गाणी गायली. आतापर्यंत त्याने २०० हून अधिक सुपरहिट गाणी गायली आहेत. प्रत्येक भावनेचे गाणे केके अगदी लीलया गायचा. किशोर कुमार यांच्या आवाजाने प्रेरित असलेल्या केकेने कधीच गाण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले नाही. ९० च्या दशकात प्रसिद्ध झालेल्या ‘यारो’ या गाण्याने त्याला तुफान प्रसिद्धी मिळवून दिली.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा