Wednesday, February 5, 2025
Home बॉलीवूड मोठी बातमी! विशाल दादलानीच्या वडिलांचे निधन, या कठीण प्रसंगी आईसाठी भावुक झाला गायक

मोठी बातमी! विशाल दादलानीच्या वडिलांचे निधन, या कठीण प्रसंगी आईसाठी भावुक झाला गायक

हिंदी सिनेसृष्टीतून दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध संगीतकार आणि गायक विशाल दादलानीचे वडील मोती दादलानी यांचे शनिवारी (०८ जानेवारी) निधन झाले आहे. याची माहिती स्वत: विशालने सोशल मीडियाद्वारे दिली आहे. स्वत: कोरोनाविरुद्ध झुंज देत असताना विशालसाठी हा खूपच मोठा धक्का आहे. त्याने आपल्या वडिलांचा जुना फोटो शेअर करत एक भावुक पोस्ट लिहिली आहे. यावेळी त्याने कोरोनामुळे आपण किती असहाय्य आहोत, हेही सांगितले आहे.

विशाल दादलानीची वडिलांसाठी भावुक पोस्ट
आपल्या वडिलांचा फोटो शेअर करत विशालने लिहिले की, “काल रात्री मी माझा सर्वात चांगला मित्र आणि या पृथ्वीवरील सर्वोत्तम आणि दयाळू व्यक्तीला गमावले. मला आयुष्यात त्यांच्यापेक्षा चांगला पिता, चांगला शिक्षक किंवा चांगला माणूस सापडला नसता. माझ्यामध्ये जे काही चांगले आहे, ते त्यांचेच प्रतिबिंब आहे.”

“गेले ३/४ दिवस ते आयसीयूमध्ये होते, पण मला कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे कालपासून मी त्यांची भेट घेऊ शकलो नाही. मी माझ्या आईला तिच्या कठीण प्रसंगात सावरण्यासाठीही जाऊ शकत नाही. हे अजिबात योग्य नाही. त्यांच्याशिवाय जगात कसे जगायचे हे मला माहित नाही. मी पूर्णपणे खचलो आहे,” असेही त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले.

विशाल दादलानीने (Vishal Dadlani) शुक्रवारीच (०७ जानेवारी) त्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. त्याने इंस्टाग्राम मार्फत सांगितले होते की, त्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यासोबतच त्याने संपर्कात आलेल्या सर्व लोकांना त्यांच्या चाचण्या करून घेण्याचे आवाहनही केले होते.

त्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले होते की, “हे त्यांच्यासाठी आहे, जे गेल्या आठवड्यात किंवा १० दिवसात माझ्या संपर्कात आले असतील. माझी लक्षणे तुलनेने सौम्य आहेत, परंतु तरीही खूप त्रासदायक आहेत. कृपया सावध व्हा.”

कोरोना व्हायरसच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर आता तिसरी लाट देशात थैमान घालत आहे. मनोरंजन विश्वातूनही अनेक कलाकारांना या व्हायरसची लागण झाल्याच्या बातम्या रोज येत आहेत. नुकतेच छोट्या पडद्यावरील ‘पांड्या स्टोअर’ या मालिकेतील ४ कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे शूटिंगही थांबवण्यात आली आहे.

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा