Wednesday, July 3, 2024

पुणेकर स्मिता पाटीलच्या ‘या’ 3 इच्छा राहिल्या अपूर्ण, वाचा कोणत्या आहेत ‘त्या’ इच्छा

‘सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या… तुझेच मी गीत गात आहे…’ हे गाणं ऐकल्यानंतर आपल्या डोळ्यापुढं येते ती सदाबहार अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. पुण्यात जन्मलेली मराठी मुलगी स्मिता पुढं जाऊन आपल्या अस्सल अभिनयानं आख्खं बॉलिवूड गाजवते म्हणजे लईच भारी. नाटक असो, दूरचित्रवाणी असो किंवा चित्रपट तिनं प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला होता. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन आणि पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांसारख्या कलाकारांच्या खांद्याला खांदा लावून या अभिनेत्रीनं आपल्या अभिनयाची दखल सर्वांना घ्यायला भाग पाडली होती. बॉलिवूडच्या प्रतिभावान अभिनेत्रींमध्ये स्मिताचं नाव घेतलं जातं. जरी तिनं नकळतपणे अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं असलं, तरी तिनं या क्षेत्रात स्वत:ला पूर्णपणे झोकून दिलं होतं. याची झलक आपल्याला तिच्या चित्रपटात पाहायला मिळतेच. अवघ्या 31 वर्षांचं तिचं आयुष्य होतं. यामध्ये तिनं पाहिलेली काही स्वप्न अपूर्णच राहिली.कोणती होती ती स्वप्ने, जाणून घेऊया या लेखातून…

स्मिता (smita patil) यांच्या स्वप्नांकडे वळण्यापूर्वी तिच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊ. जिच्या अभिनयावर भले-भले फिदा व्हायचे, अशा स्मिताचा जन्म  17 ऑक्टोबर, 1955 रोजी पुण्यात झाला. तिचे वडील शिवाजीराव गिरीधर पाटील मंत्री, तर आई विद्याताई पाटील समाजसेविका होती. स्मितानं पुण्याच्या रेणुका मेमोरियल माध्यमिक शाळेतून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलेलं. तेही मराठी माध्यमातून. स्मितानं पुढं सिनेसृष्टीत जाण्यासाठी पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडियामध्ये प्रवेश घेतला. पण तिने पहिल्यांदा वृत्त निवेदिका म्हणूनच कॅमेऱ्याचा सामना केला. यावेळी एका फोटोग्राफरने काढलेले तिचे फोटो त्याच्या पत्नीला दाखवले होते. योगायोगानं तिथं दुरदर्शनचे मुख्य असलेले श्रीकृष्ण मूर्तींनी स्मिताचे ते फोटो पाहिले. तिला मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं. तिथं तिला गाण्यासाठीही सांगितलं. पण तिनं धमालच केली. तिनं बंगाली भाषेत बांगलादेशचं राष्ट्रगीत गायलं. यामुळं तिला दूरदर्शनवर हिंदी वृत्त निवेदिका म्हणून निवडलं गेलं. याचवेळी तिच्यावर नजर पडली, ती प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांची. त्यांनीच स्मिताला सिनेसृष्टीत आणलं आणि तिनंही या संधीचं सोनं करत पुढं बॉलिवूड गाजवलं, तर वळूया आपल्या विषयाकडं.

स्मिताची आई विद्याताई पाटील यांची लग्नानंतर फारच फरफट झाली होती. त्या हालाखीचे दिवस जगत होत्या. जेव्हा स्मिताचा जन्म झाला, तेव्हा त्यांना नाईलाजानं हॉस्पिटलमध्ये नर्सचं कामही करावं लागलेलं. स्मिता लहानपणी आईला इतकी मेहनत करताना पाहायची. त्यावेळी ती म्हणायची की, “जेव्हा मी मोठी होईल, तेव्हा मी तुला खूप सारे पैसे कमवून देईल.’ इतकंच नाही तर आई विद्याताईंना वृक्षलागवडीची फार आवड असल्याने स्मिता तिच्या आईसाठी एक गार्डन असणारा बंगलाच गिफ्ट करणार होत्या, पण काळानं घाला घातला आणि ती खूप कमी वयात हे जग सोडून गेल्यानं तिची ही इच्छा अपूर्ण राहिली.

थोर दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्यासोबत स्मितानं आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. स्मिताच्या अभिनय कौशल्याची स्तुती करताना बेनेगल साहेबांना कधीच शब्द अपुरे पडत नसत. परंतु ते स्मिताच्या आणखी एका गुप्त कौशल्याबद्दल देखील बोलायचे. ते नेहमी म्हणायचे की, “स्मिताचा अभिनयात तर हातखंडा आहेच, परंतु तिच्याकडं दिग्दर्शकाची पारखी नजर देखील आहे. तिला दिग्दर्शन प्रक्रियेची उत्तम जाण आहे.”

स्मिताची देखील हीच इच्छा होती, परंतु पुढील काही वर्षे ती अभिनयात इतकी रमून गेली की, तिला दिग्दर्शनासाठी वेळच नाही मिळाला. तिला मुलगा प्रतीक बब्बरच्या जन्मानंतर पती राज बब्बर यांच्यासोबत एक सिनेमा करायचा होता. या सिनेमाचं दिग्दर्शनही ती स्वत:च करणार होती. पण म्हणतात ना, ‘आले देवाजीच्या मना तेथे कुणाचे काय चालेना!’ अशाप्रकारे त्यांची हीदेखील इच्छा अपूर्णच राहिली.

स्मिताला लहान मुलं फार आवडायची. त्यामुळेच तर तिच्या गरोदरपणात ती मित्र- मैत्रिणींना सर्वांना सांगायची की, “मी एका मुलावर थांबणार नाहीये.” तिला मुलांची टोळी हवी होती. परंतु प्रतीक बब्बरचा जन्म झाला अन् काही दिवसांनी स्मितानं या जगाचा अचानक निरोप घेतला. स्मिताची ही देखील इच्छा अपूर्णच राहिली. (smita patil unfulfilled wishes)

हेही वाचा-
Manisha Rani New Car: ‘बिग बॉस’फेम ‘ही’ अभिनेत्री बनली आलिशान कारची मालकीण, स्वत:च्या हिंमतीवर खरेदी केली महागडी कार
…आणि म्हणून सुपरस्टार भरत जाधवच्या करोडों रुपयांच्या महागड्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये आहे टॅक्सीचा फोटो

हे देखील वाचा