Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड वृत्तपत्राची एडिटर ते एक नावाजलेली अभिनेत्री, ‘असा’ आहे सोनाली कुलकर्णीचा अभिनयप्रवास

वृत्तपत्राची एडिटर ते एक नावाजलेली अभिनेत्री, ‘असा’ आहे सोनाली कुलकर्णीचा अभिनयप्रवास

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अशा खूप कमी अभिनेत्री आहेत, ज्यांनी मराठीसोबत इतर अनेक भाषांमध्ये त्यांच्या अभिनयाचा डंका मिरवला आहे. अगदी हिंदीपासून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत त्यांनी त्यांची ओळख निर्माण केली आहे. यातीलच एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी होय. सोनाली कुलकर्णी ही चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावान अभिनेत्री आहे. अभिनयाच्या आणि डान्सच्या जोरावर तिने केवळ तिचे नावलौकिक मिळवले नाही, तर लाखो प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे. आपल्या साध्या आणि सालस रूपाने समोरच्याचे मन जिंकण्यात ती कधीही कमी पडत नाही. त्यात तिचे संवाद कौशल्य तर वाखडण्याजोगे आहे. अशी ही संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी नायिका शुक्रवारी (03 नोव्हेंबर) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर जाणून घेऊया तिच्याबाबत काही खास गोष्टी…

सोनाली कुलकर्णीचा जन्म 3 नोव्हेंबर, 1974 मध्ये पुणे येथे झाला होता. मूळची पुण्यातील असल्याने पुण्यातील रांगडेपणा तिच्या वागण्या-बोलण्यातून नेहमीच जाणवत असतो. तिचे वडील इंजिनीयर होते. तसेच घरात दोन भाऊ होते. संदीप आणि संदेश ही तिच्या भावांची नावे. तिने तिचे शालेय शिक्षण पुण्यातील अभिनव महाविद्यालयातून पूर्ण केले, तर उच्च शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयातून पूर्ण केले. कॉलेजमध्ये असताना राज्यशास्त्र या विषयात तिचा विशेष हातखंड होता. तसेच तिला मराठी साहित्यामध्ये स्कॉलरशिप देखील मिळाली होती. कॉलेजमध्ये शिकत असतानाच सोनालीला अभिनयात रस होता. त्यावेळी तिने सत्यजित दुबे यांच्या अभिनयाच्या वर्कशॉपमध्ये सहभाग घेतला होता. (Sonali Kulkarni celebrate her birthday, let’s know about her life)

सोनालीच्या कितीतरी चाहत्यांना ही गोष्ट माहिती नसेल की, तिने अभिनय क्षेत्रात मराठी चित्रपटसृष्टीतून नव्हे, तर कन्नडमधून प्रवेश केला होता. तिने1992 साली ‘चुलेवी’ या कन्नड चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर तिने 1994 मध्ये ‘गुलाबरी’ या हिंदी मालिकेत काम केले. यानंतर तिने ‘बदलते रिश्ते’, ‘क्या यही प्यार है’, ‘काटा रूते कोणाला’ यांसारख्या मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले.

यानंतर सोनालीला मराठी आणि हिंदी चित्रपटांमधून अनेक ऑफर येऊ लागल्या. तिने ‘कैरी’, ‘मिशन काश्मीर’, ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर’, ‘सायलेन्स प्लीज द ड्रेसिंग रूम’, ‘लव्ह इज ब्लाइंड’, ‘सखी सिर्फ’, ‘गंध’, ‘मोहनदास’, ‘लव्ह खिचडी’, ‘सिंघम’, ‘देऊळ’, ‘डॉक्टर प्रकाश बाबा आमटे’, ‘अगं बाई अरेच्चा 2’, ‘कच्चा लिंबू’, ‘गुलाबजाम’ ‘आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकर’, ‘भारत’, ‘तुफान’ यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे.

यासोबतच ती ‘लोकसत्ता’ या वृत्तपत्राच्या एका पुरवणीची एडिटर होती. जून 2005 ते मे 2007पर्यंत तिने हे काम केले होते. यात दर साप्ताहिकात ‘सो कुल’ नावाची पुरवणी पब्लिश होत होती. एकदा नाना पाटेकर यांनी देखील तिच्या लिखाणाबद्दल सकारात्मक प्रतिसाद दिला होता.

सोनालीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास, तिने चंद्रकांत कुलकर्णी यांच्याशी पहिला विवाह केला होता, परंतु काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तिने 24 मे, 2010 साली नचिकेत पंतवैद्य यांच्याशी दुसरा विवाह केला. ते सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचे प्रमुख आहेत. त्यांना कावेरी नावाची एक गोड मुलगी आहे.

हेही नक्की वाचा-
आज 6000 कोटींचा मालक असणाऱ्या शाहरुख खानच्या कुटुंबाला एकेकाळी दोन वेळची भाकरी मिळणे होते कठीण!
शाहरुख खानने होळीच्या मुहूर्तावर केले होते दिव्या भारतीला प्रपोज, वाचा तो किस्सा

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा