सोनू सूदला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, महापालिकेची कारवाई योग्य असल्याचे सांगत याचिका फेटाळली


जुहू येथे ‘शक्ती सागर’ या निवासी इमारतीत बेकायदेशीरपणे हॉटेल सुरू केल्याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेने सोनू सूदला नोटीस बजावली होती. मुंबई महानगरपालिकेने नोटीस बजावल्यानंतर सोनू सूदने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र आज उच्च न्यायालयाने सोनूची याचिका फेटाळली आहे. सुनावणीमध्ये मुंबई महानगरपालिकेने केलेली कारवाई योग्य असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे.

सोनू सूदने जुहू येथील एका निवासी इमारतीममध्ये व्यावसायिक वापरासाठी बदल केले होते. पालिकेच्या ‘के पश्चिम’ विभाग कार्यालयाकडे या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार २४ ऑक्टोबर २०२० ला पालिकेच्या पथकाकडून त्या इमारतीची पाहणीही करण्यात आली होती. त्यावेळी तिथे मंजूर झालेल्या आराखड्यानुसार जागेचा वापर करण्यात आला नसून इमारत बांधकामात अनधिकृतपणे काही बदल केले असल्याचा आरोप सोनू सूदवर ठेवण्यात आला.

याप्रकरणी पालिकेने सोनू सूदला नोटीस देखील पाठवली होती. त्यावर आता एमआरटीपी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यासाठी सोनू सूदवर गुन्हा दाखल करा, अशी तक्रार ४ जानेवारी रोजी महापालिकेने जुहू पोलीस ठाण्यात दिली.
महानगरपालिकेच्या या नोटीस विरोधात सोनूने दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली होती. आपण कोणतेही अनधिकृत आणि बेकायदेशीर बांधकाम केले नसून आपल्याकडे पालिकेची परवानगी आहे. महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडून मंजुरीने बदल करण्यात आले असल्याचा दावाही सोनूने या याचिकेतून केला आहे. त्यामुळे पालिकेने बजावलेली नोटीस रद्द करण्यात यावी आणि कारवाईला स्थगिती देण्यात यावी असे आदेश देत आपल्याविरोधात कोणतीही कठोर कारवाई न करता अंतरिम दिलासा देण्यात द्यावा, अशी विनंतीही या याचिकेतून करण्यात आली.

मुंबई उच्च न्यायालयात बीएमसीच्या नोटीस विरोधात अभिनेता सोनू सूदच्या याचिकेवर आज सुनावणी झाली आहे. मात्र यावेळी सोनूला न्यायालयाकडून दणका बसला आहे. महापालिकेने केलेली कारवाई योग्य असल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने सोनू सूदची याचिका फेटाळून लावली आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.