नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात एक दमदार, मोठी आणि ऐतिहासिक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही मालिका म्हणजे ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’. २०२० मध्ये कोरोनामुळे अनेक चालू असणाऱ्या मालिका बंद कराव्या लागल्या होत्या. अनेक महिने मालिका आणि त्यांचे शूटिंग बंद केले गेले होते. मात्र या नवीन वर्षात नवीन ऊर्जा, नवीन उत्साह, नवीन दर्जेदार विषय घेऊन अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यापैकी ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ या मालिकेने नवीन वर्षाचा धमाकेदार श्री गणेशा केला आहे.
‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ या मालिकेतून प्रेक्षकांना १८ व्या दशकातील अहिल्याबाई यांची जीवन कहाणी पाहायला मिळणार आहे. या ऐतिहासिक मालिकेतून पहिल्यांदाच अहिल्या बाई यांचा अहिल्या ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असा प्रवास प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
या मालिकेमध्ये अदिती जलतरे ही मराठमोळी बालकलाकार ‘अहिल्या’ ही मुख्य भूमिका साकारत आहे. अदिती या मालिकेत अहिल्याबाईंच्या बालपणीची भूमिका साकारणार आहे. अदितीसोबतच राजेश श्रृंगारपुरे, क्रिश चौहान, स्नेहलता वसईकर यांच्या देखील महत्वाच्या भूमिका असणार आहे.
अहिल्याबाई होळकर ह्या अखंड भारताच्या माळवा साम्राज्याच्या सम्राज्ञी होत्या. अहिल्याबाई होळकर यांचा जन्म १७ व्या दशकातील ३१ मे रोजी महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यातील छोडी या लहान गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मंकोजी राव शिंदे असे होते. ते त्यांच्या गावाचे पाटील होते. त्या काळात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता तरीही त्यांच्या वडिलांनी त्यांना शिकवले.
अहिल्या ह्या सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या सुनबाई तर खंडेराव याच्या पत्नी होत्या. लग्नानंतर अहिल्याबाई होळकर यांना त्यांच्या सासऱ्यांनी पितृसत्ताक नियमांच्या विरोधात जाण्यासाठी पाठिंबा दिला. त्यामुळेच त्यांनी त्याकाळातील महिलांच्या समस्यांविरोधात आवाज उठवला.
असं म्हंटले जाते की इंदोर शहराचे निर्माण अहिल्याबाई होळकर यांनी केले. माळवापासून दुर्ग पर्यंतच्या रस्त्यांवर अहिल्याबाई होळकर यांनी अनेक विकासकामे केली. अहिल्याबाई ह्या नेहमी लोकांच्या समस्या सोडवण्यात आणि त्यांच्या कल्याणासाठी कामं करत होत्या. अहिल्याबाई यांनी अनेक मंदिरे आणि धर्मशाळा देखील बांधल्या.










