दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदाना आज दक्षिण चित्रपटसृष्टीमध्ये कमालीचे नाव कमावून अनेक अभिनेत्रींना टक्कर देताना दिसत आहे. केवळ दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये नाही तर बॉलिवूडमध्ये देखील तिचे लाखोंमध्ये चाहते आहेत. तिचा अभिनय आणि हावभाव बघून कुणीही तिच्या प्रेमात पडेल. तिचे सोशल मीडियावर देखील जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे. अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने तिच्या अभिनयाबाबत खुलासा केला आहे.
तिने सांगितले की, “मी अभिनेत्री बनण्याचे कधीच स्वप्न पाहिले नव्हते. परंतु योगायोगाने मी अभिनेत्री झाले. मी कोणत्याच अभिनयाच्या शाळेत जाऊन अभिनयाचे धडे घेतले नाहीत. त्यामुळे मी आता असे चित्रपट निवडते, ज्यातून मला काहीतरी शिकायला मिळेल. 2014 मध्ये मी राष्ट्रीय स्तरावर एक फॅशन स्पर्धा जिंकली होती. त्यावेळी माझे फोटो अनेक वृत्तपत्रात छापून आले होते. तेव्हा ते फोटो माझ्या पहिल्या कन्नड ‘किरिक पार्टी’ या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांनी पाहिले होते. त्यांनतर त्यांनी माझ्याशी संपर्क साधला होता. त्यावेळी त्यांनी माझे ऑडिशन देखील घेतले नाही. चित्रपटाच्या निर्मात्यांनी फक्त मला आणि माझ्या बोलण्याच्या शैलीला पाहून मला चित्रपटात काम दिले होते.”
खरं तर चित्रपटात काम करणे ही काही सोप्पी गोष्ट नाहीये. अनेक ऑडिशन देऊन कुठे कलाकारला एखाद्या चित्रपटात छोटासा रोल मिळतो. परंतु रश्मिका याबाबत खूपच भाग्यशाली होती, असे म्हणावे लागेल. तिने सांगितले की, “माझा पहिला चित्रपट ‘किरिक पार्टी’मधील माझा अभिनय बघून माझा पहिला तेलुगु ‘चलो’ या चित्रपटाचे दिग्दर्शकांनी माझ्याशी संपर्क करून मला चित्रपटाची ऑफर दिली. त्यावेळी मी तो चित्रपट देखील केला होता. यानंतर लगेचच माझा पहिला तमिळ ‘सुलतान’ चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी माझ्याशी संपर्क साधला. मला आजपर्यंत नेहमीच माझ्या अभिनयाच्या जोरावर काम मिळाले आहे. अशाप्रकारे मला काम मिळत गेलं. त्यामुळे मला कधीच कोणत्याच चित्रपटासाठी ऑडिशन देण्याची वेळ आली नाही. बॉलिवूडबद्दल बोलायचे झाल्यास, माझ्या इतर चित्रपटातील काम पाहून मला हिंदीमध्ये ‘मिशन मजनू’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाचे दिग्दर्शक ‘शांतनू बागची’ सरांना माझा अभिनय खूपच आवडला होता.”
रश्मिका लवकरच बॉलिवूडमधील महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘गुड बाय’ चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटाबाबत बोलताना तिने सांगितले की, “मी खूप उत्साहित आहे. जर तुम्हाला अमिताभ बच्चन सरांसोबत काम करण्याची संधी मिळत असेल, तर अजून काय पाहिजे. मला त्यांच्याकडून खूप काही शिकायचे आहे किंबहुना त्यांच्या सोबत अनेक आठवणी बनवायच्या आहेत. या चित्रपटाची शूटिंग सुरू होण्याच्या आधी मी त्यांना कधीच भेटले नाही. एवढ्या मोठ्या कलाकाराला भेटण्यासाठी मी जेवढी उत्साहित आहे तेवढीच नर्व्हस देखील आहे. माझ्या कुटुंबीयांना अजून देखील विश्वास बसत नाहीये की, मी अमिताभ बच्चन सरांसोबत काम करत आहे.”
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-