Wednesday, July 3, 2024

Valimai Trailer | सुपरस्टार अजितचा दमदार लूक बघून चाहत्यांची उत्सुकता शिगेला, पाहा ‘वलीमई’चा जबरदस्त ट्रेलर

दाक्षिणात्य सुपरस्टार अजित कुमार (Ajith Kumar) आपल्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. त्याचे अनेक चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरले असून यामधील त्याच्या दमदार अभिनयाची सर्वत्र चर्चा झाली होती. प्रचंड मोठा चाहता वर्ग असलेल्या अजित कुमारचा बहुचर्चित ‘वलीमई’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, सध्या सर्वत्र त्याचीच चर्चा सुरू आहे.

दाक्षिणात्य अभिनेता अजित कुमारचा ‘वलीमई’ चित्रपट बर्‍याच दिवसांपासुन चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप निश्चित झाली नाही. कारण चित्रपट सिनेमागृहात यायला सज्ज झाला असला, तरी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तारीख निश्चित केली जात नव्हती. हा चित्रपट ओटीटी फ्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या, मात्र आता या चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे.

अभिनेता अजय देवगणने (Ajay Devgan) या ‘वलीमई’ चित्रपटाचा ट्रेलर आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून प्रदर्शित केला आहे. त्या आधी काही काळापूर्वी अभिनेत्री हुमा कुरेशीने (Huma Qureshi) याबाबत माहिती दिली होती. “तुम्ही तुमचा गजर ६:३० वाजता लावून ठेवा, अजय देवगण वलीमई चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करत आहे.” असे कॅप्शन तिने आपल्या या पोस्टमध्ये लिहले होते.

काही दिवसांपूर्वी या चित्रपटाला ओटीटी फ्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यासाठी ३०० कोटींची ऑफर देण्यात आली होती. मात्र निर्माते बोनी कपूर (Boney Kapoor) यांनी याला नकार दिला होता. या चित्रपटाचे निर्माते बोनी कपूर यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत सोशल मीडियावरुन माहिती दिली होती. यामध्ये त्यांनी म्हटले होते, “प्रेक्षकांना आनंद देणे हेच आमचे उद्दिष्ट असून आमच्या कठीण काळात त्यांच्या पाठिंब्यामुळेच आम्हाला प्रोत्साहन मिळते. चित्रपटगृहात आमचा प्रेक्षक आनंदी राहील यासाठीच आम्ही प्रयत्नशील असतो. आम्ही त्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी म्हणूनच हा निर्णय घेतो.”

या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार अजित कुमार आणि हुमा कुरेशी प्रमुख भूमिकेत असून, त्यांच्या चाहत्यांना चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता लागली आहे. एच. विनोथ यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

हेही वाचा-

हेही पाहा-

हे देखील वाचा