Wednesday, July 3, 2024

अभिनेता नाही, तर ‘डॉक्टर स्ट्रेंज’ला बनायचे होते वकील, ‘या’ कारणामुळे भारतात घालवले एक वर्ष

एखादा कलाकाराचा सिनेमा, नाटक, गाणे जेव्हा प्रसिद्ध होते, तेव्हा त्या कलाकाराला त्याच्या पात्रावरून ओळखले जाते. जेव्हा प्रेक्षक कलाकाराला त्याच्या खऱ्या नावाने नाही, तर त्याच्या पात्राच्या नावावरून ओळखतात, तेव्हा या गोष्टीला त्या कलाकाराचे यश म्हणतात. असाच एक अभिनेता आहे, ज्याला त्याच्या नावाने कमी आणि त्याच्या सिनेमातील पात्रांच्या नावावरून जास्त ओळखले जाते. तो अभिनेता इतर कुणी नसून प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता आणि सिने निर्माता बेनेडिक्ट कम्बरबॅच आहे. बेनेडिक्ट याला ‘शेरलॉक होम्स’ आणि मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्समधील ‘डॉक्टर स्ट्रेंज’ या पात्रांमुळे अधिक लोकप्रियता मिळाली आहे. हाच अभिनेता मंगळवारी (दि. १९ जुलै) त्याचा ४६वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आयुष्यातील काही खास किस्स्यांवर एक नजर टाकूया…

अभिनयक्षेत्रातील कामामुळे जगभरात आपला डंका वाजवणारा अभिनेता बेनेडिक्ट कम्बरबॅच (Benedict Cumberbatch) हा प्रतिभेची खाण आहे. पडद्यावर त्याने जेवढ्या भूमिका साकारल्या आहेत, कदाचित तेवढी विविधता त्यांच्या खऱ्या आयुष्यातही पाहायला मिळते. बेनेडिक्टच्या वाढदिवसानिमित्त (Benedict Cumberbatch) याच्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात, चला तर त्याच्याबाबत काही रंजक किस्से जाणून घेऊया.

अभिनेता नाही, तर बनायचे होते वकील
अभिनेता बेनेडिक्ट कम्बरबॅच याचा जन्म १९ जुलै, १९७६ रोजी लंडन येथे झाला होता. विशेष म्हणजे, बेनेडिक्टला अभिनयाचे बाळकडू हे त्याच्या बालपणीच मिळाले होते. कारण, तो कलाकारांच्या कुटुंबात जन्मला होता. मात्र, त्यानेही सुरुवातीला असा विचार केला नव्हता की, त्याला पुढे जाऊन कॅमेऱ्याचा सामना करावा लागणार आहे. खरं तर, त्याने अभिनयात यावे असे त्याच्या आई-वडिलांचीही इच्छा नव्हती. बेनेडिक्ट यानेही वकील बनण्याचे स्वप्न पाहिले होते. सन २०१५मध्ये एका चर्चेदरम्यान बेनेडिक्ट यानेच सांगितले होते की, “अभिनय ही खूप विचित्र गोष्ट आहे. माझ्या आई-वडिलांनी मला चांगले शिक्षण दिले. अशात माझ्याकडे दुसऱ्या कोणत्याही क्षेत्रात नशीब आजमावण्याची संधी माझ्याकडे होती.”

त्याने म्हटले होते की, “मला वकील बनायचे होते. मला फौजदारी कायद्यामध्ये (Criminal Law) रस होता. माझा असा विश्वास होता की, त्यांचे आयुष्य खूप चांगले असते. मला कोर्टाशी संबंधित पात्र साकारायला आवडतात.”

भारतात घालवले एक वर्ष
भारताचे आकर्षण आख्ख्या जगाला आहे, अभिनेता बेनेडिक्टला कसे नसेल ना? बेनेडिक्ट हा जवळपास एक वर्ष भारतात राहिला आहे. यादरम्यान त्याने समाजसेवा करण्याचा विचार केला आणि भारताच्या दार्जिलिंग येथे एका तिबेट मठात लोकांना इंग्रजीचे धडे देण्यास सुरुवात केली. माध्यमांशी बोलताना तो म्हणाला होता की, “ध्यान करण्याची कल्पना मला नेहमीच आकर्षित करते. मी एका बौद्ध भिक्षूसोबत भारतात आलो होतो. यादरम्यान अनेक भिक्षूही होते. तो अविश्वसनीय अनुभव होता.” त्याने असेही सांगितले की, या ध्यानसाधनेमुळे त्याला अभिनयात खूप मदत झाली. त्याचा असा विश्वास आहे की, शांती आणि स्थिरता अभिनयाचा एक अविभाज्य घटक आहे.

दक्षिण आफ्रिकेत झाले होते अपहरण
सन २००५मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘टू द एंड्स ऑफ द अर्थ’ या छोट्या सीरिजची शूटिंग करताना बेनेडिक्टला भलत्याच गोष्टींचा सामना करावा लागला होता. त्याचे आयुष्य संपण्याच्या मार्गावर होते. झाले असे होते की, बेनेडिक्ट आणि त्याच्या २ सहकलाकारांनी मोझाम्बिकजवळ स्कूबा डाईव्ह शिकण्यासाठी एका दिवसाची सुटी घेतली होती. रस्त्यामध्येच त्यांना सहा लोकांनी घेरले होते. बेनेडिक्ट सांगतो की, “माझी त्यांच्याशी बाचाबाची झाली. आयुष्य संपण्याच्या मार्गावर होते, पण देवाचे धन्यवाद कसातरी जीव वाचला.” त्याने पुढे सांगितले की, या घटनेने त्याला शिकवले की, आयुष्य नेहमी एका सामान्य पद्धतीने जगले पाहिजे.

बदलतो बेनेडिक्टच्या डोळ्यांचा रंग
बेनेडिक्ट याच्या डोळ्यांचा रंग नेहमी बदलत असतो. खरं तर, हे खूपच दुर्मीळ आहे. याचे नाव हेटरोक्रोमिया असे आहे. हे धोकादायक नाहीये. त्यामुळे अभिनेत्याच्या डोळ्यांचा रंग कधी निळा, तर कधी हिरवा दिसतो.

अभिनयाव्यतिरिक्त बेनेडिक्टकडे आहेत बऱ्याच प्रतिभा
ज्याप्रकारे एका व्यक्तीकडे विविध कौशल्य असतात, असेच काहीसे बेनेडिक्टबाबतही आहे. बेनेडिक्ट हा अभिनेत्यासोबतच एक आर्टिस्टही आहे. मजेशीर बाब अशी की, त्याला एका आर्टमध्ये शिष्यवृत्तीही मिळाली आहे. यादरम्यान तो हॅरो शाळेत गेला आणि तिथे त्याने एक महाकाय तेल चित्र बनवले. तसेच, काही सेल्फ पोर्ट्रेटही तयार केले. यामधील काही गोष्टी त्याने चॅरिटीला दाण केले. बेनेडिक्ट कम्बरबॅचमध्ये प्रतिभेची काहीच कमतरता नाहीये. त्याला चित्रांव्यतिरिक्त संगीतातही रस आहे. त्याला व्हायोलिनही वाजवता येते.

बेनेडिक्ट कम्बरबॅचचे सिनेमे
‘डॉक्टर स्ट्रेंज’, ‘शेरलॉक’, ‘द पॉवर ऑफ द डॉग’, ‘द इमिटेशन गेम’, ‘द कुरिअर’, ‘पॅट्रिक मेलरोज’, ‘ऍव्हेंजर्स एंडगेम’ यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

घरगुती हिंसाचारानंतर आता सुरभी तिवारीला पतीपासून घ्यायचाय घटस्फोट, तीन वर्षांपूर्वीच झालं होतं लग्न

Laal Singh Chadha | ‘कहानी’ गाण्याचा व्हिडिओ रिलीझ, आमिर खानचा निरागसपणा पाहून व्हाल दंग

‘माझ्यासाठी सोप्पं नाहीये…’ ‘पुष्पा’चा अल्लू अर्जुन हिंदी चित्रपटात काम करण्याबद्दल असं का म्हणाला?

हे देखील वाचा