Thursday, June 13, 2024

सैन्यात असतानाच अर्नाल्डने भोगली तुरुंगवासाची शिक्षा, घरात काम करणाऱ्या महिलेशी होते संबंध, मुलाला ८ वर्षे…

आजकालची लहान मुलं बॉलिवूड अभिनेत्यांकडे पाहून त्यांच्यासारखीच बॉडी बनवायची स्वप्न बघत असतात. मात्र, हॉलिवूडमध्ये असा एक अभिनेता आहे, ज्याच्या फिटनेसचे फक्त भारतातच नाहीत, तर जगभरात चाहते आहेत. कदाचित बॉलिवूड कलाकारांचाही तो प्रेरणास्थान आहे. आपण ज्या अभिनेत्याबाबत बोलत आहोत, तो इतर कुणी नसून दिग्गज अर्नाल्ड श्वार्झनेगर हे आहेत. श्वार्झनेगर यांनी त्यांच्या आयुष्यात अभिनेता, चित्रपट निर्माता, व्यावसायिक, लेखक आणि राजकारणी अशा विविध भूमिका साकारल्या आहेत. जगभरात ज्या बॉडी बिल्डिंगची क्रेझ आपण पाहतो, त्यामध्ये अर्नाल्ड यांचे अनन्यसाधारण योगदान राहिले आहे. अर्नाल्ड शनिवारी (दि. ३० जुलै) त्यांचा ७५वा वाढदिवस साजरा करत आहेत. चला तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्या आयुष्याशी निगडीत हटके गोष्टी…

समलिंगी समजून मारायचे वडील
दिग्गज अभिनेते अर्नाल्ड श्वार्झनेगर (Arnold Schwarzenegger) यांचा जन्म ३० जुलै, १९४७ रोजी ऑस्ट्रियातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. त्यांच्या वडिलांचं नाव गुस्ताव, तर आईचं नाव ऑरेलिया असं आहे. अर्नाल्ड यांनी एकदा सांगितलं होतं की, त्यांच्या लहानपणी घरात फ्रीज आणल्याचा दिवस त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण होता. त्यांचे वडील त्यांच्या शहरातील पोलीस प्रमुख होते. तसेच, दुसऱ्या महायुद्धामध्येही त्यांनी भाग घेतला होता. अर्नाल्ड यांचे वडील त्यांना समलिंगी समजायचे. त्यामुळे ते त्यांच्याशी कठोरतेने वागायचे आणि मार-मार मारायचे.

यामुळेच अर्नाल्ड यांच्या आईच्या शेवटच्या काळापर्यंत ते त्यांच्यासोबतच होते. मात्र, त्यांच्या भावाच्या आणि वडिलांच्या अंत्यसंस्कारात ते सामील झाले नव्हते. त्यांच्या भावाचा मृत्यू नशेमुळे एका कार अपघातात झाला होता.

लहानपणापासूनच घडवायची होती बॉडी बिल्डिंगमध्ये कारकीर्द
त्यांनी वयाच्या १३व्या वर्षी पहिल्यांदा डंबल्स उचलले होते. तेव्हापासूनच त्यांना बॉडी बिल्डिंगचे वेध लागले होते. त्यानंतर अर्नाल्ड यांनी यामध्येच आपली कारकीर्द घडवण्याचा निर्णय घेतला. बॉडी बिल्डिंगबद्दल त्यांच्यात इतकी उत्कटता होती की, जिम बंद झाल्यानंतरही ते जिम स्वत:साठी उघडत व्यायाम करायचे.

ऑस्ट्रियन सैन्यात काम केले आणि तुरुंगवासही भोगला
अर्नाल्ड यांनी बॉडी बिल्डिंगची ट्रेनिंग घेण्यासाठी ऑस्ट्रियन सैन्यात राष्ट्रीय स्तरावर काम करताना सुट्टी घेतल्याशिवाय बाहेर गेले होते. यामुळे त्यांना एक आठवडा सैन्यातील तुरुंगात काढावा लागला होता.

पुरस्कारच पुरस्कार
अर्नाल्ड वयाच्या २०व्या वर्षी सर्वात कमी वयात ‘मिस्टर युनिव्हर्स’चा किताबही जिंकले होते. विशेष म्हणजे, पुढे जाऊन त्यांनी तब्बल ५ वेळा हा पुरस्कार जिंकला होता. यासोबतच त्यांनी फक्त २३ वर्षांच्या वयात १९७०मध्ये ‘मिस्टर ऑलिंपिया’ किताबही जिंकला होता. यामुळे ते सर्वात कमी वयात मिस्टर ऑलिंपियाही बनले होते. हा किताबदेखील त्यांनी तब्बल ७ वेळा जिंकला होता.

‘द टर्मिनेटर’मधून नायक म्हणून मिळाली ओळख
अर्नाल्ड पहिल्यांदा १९७०मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हरक्युलस’ सिनेमात झळकले होते. मात्र, ‘कॉनन द बर्बरियन’ आणि ‘द टर्मिनेटर’ यांसारख्या सिनेमातील भूमिकांमुळे अर्नाल्ड यांना हॉलिवूडमध्ये ऍक्शन हिरो म्हणून ओळख मिळाली. १९७५मध्ये ‘पंपिंग आयरन’ ही डॉक्यूमेंट्री प्रदर्शित झाली होती. ही डॉक्यूमेंट्री अर्नाल्ड आणि मिस्टर ऑलिंपिया स्पर्धेतील इतर स्पर्धकांवर आधारित होती. यामधून अर्नाल्ड यांना खूप लोकप्रियता मिळाली होती. ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात हिट डॉक्यूमेंट्री होती.

एक यशस्वी व्यावसायिक
अर्नाल्ड यांनी सिनेमात काम करण्याव्यतिरिक्त दिग्दर्शनातही आपला हात आजमावला. मात्र, त्यांची ही कारकीर्द खूपच छोटी राहिली. अर्नाल्ड एक यशस्वी व्यावसायिकही होते. त्यांनी बॉडी बिल्डर फ्रँको कोलंबूसोबत विटा बनवण्याचा व्यवसाय सुरू केला होता. यामुळे त्यांना खूप फायदा झाला होता. त्यांनी आपल्या बॉडी बिल्डिंगची कमाई कॅलिफोर्निया येथील रियल इस्टेट बाजारात गुंतवली होती.

आपल्या मुलाची ओळख तब्बल ८ वर्षे ठेवलेली लपवून
सन १९८६मध्ये अर्नाल्ड यांनी पीबॉडी पुरस्कार विजेती पत्रकार मारिया श्रायवरशी लग्न केले होते. त्यांना ४ मुले होती. त्यानंतर लग्नाच्या २५ वर्षांनंतर दोघांनीही २०११मध्ये घटस्फोट घेतला होता. वृत्तांनुसार, अर्नाल्ड यांचे अफेअर त्यांच्या घरात काम करणाऱ्या महिलेशी होते. तसेच, ती त्यावेळी गरोदर होती, जेव्हा अर्नाल्ड यांच्या पत्नी मारियाच्या पोटात चौथे मूल होते. मात्र, त्या महिलेचा मुलगा ८ वर्षे होईपर्यंत त्याची ओळख लपवून ठेवली होती.

राजकारणातही आजमावला हात
एक रिपब्लिकन म्हणून अर्नाल्ड यांनी ७ ऑक्टोबर, २००३ रोजी अमेरिकेच्या कॅलिफोर्निया प्रांताचे ३८वे गव्हर्नर म्हणून शपथ घेतली होती. यानंतर ७ नोव्हेंबर, २००६ रोजी ते पुन्हा निवडून आले आणि दुसऱ्यांदा कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर बनले होते. ते या पदावर २०११पर्यंत राहिले होते.

सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार
मे २००४ आणि २०००७ मध्ये टाईम मॅगझिनने जगातील १०० शक्तिशाली लोकांमध्ये त्यांच्या नावाचा समावेश केला होता. अर्नाल्ड यांची एकूण संपत्ती ३५०० कोटींहून अधिक आहे. अर्नाल्ड हे त्यांच्या काळातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक होते. विशेष म्हणजे, ते त्यांच्या सिनेमांसाठी तब्बल २३७ कोटी रुपये मानधन घ्यायचे.

अधिक वाचा- 
अय्यो! एवढ्या महागड्या गाड्यांसोबत सोनू निगमाला आहे ‘या’ गोष्टींचा छंद
‘प्रेक्षक 300 रुपयात चित्रपट का पाहतील?’, ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याने केले खळबळजक वक्तव्य

हे देखील वाचा