Friday, December 13, 2024
[aioseo_breadcrumbs]

आठवण ‘लक्ष्या’ची : सर्वांना पोट धरून हसवणाऱ्या लक्ष्याची ‘ही’ संघर्षमय कुटुंबकहाणी एकदा वाचायला हवी

आपल्याला हमाल दे धमाल सिनेमा आठवतोय. त्यातलं सुप्रसिद्ध गाणंदेखील आठवतच असेल. ‘मी आलो… मी पाहिलं… मी लढलो… मी जिंकून घेतलं सारं’ गाण्याच्या या ओळींप्रमाणेच लक्ष्याचं आयुष्य देखील होतं.

आज त्याची आठवण येण्याचं कारण म्हणजे आजच्याच दिवशी (१६ डिसेंबर २००४) १६ वर्षांपूर्वी हा फिल्मस्टार झालेला राजा आपल्या सर्वांना सोडून गेला. मराठी सिनेसृष्टीचं एक मानाचं पान त्या दिवशी अखेरचं फडफडलं.

Lakshmikant Berde
Lakshmikant Berde

लक्ष्याच्या सिनेसृष्टीतील गोष्टींबाबत आपण आज बोलणार नाही आहोत. त्या जवळ जवळ सगळ्यांनाच ते तोंडपाठ झालं आहे. एक चतुरस्त्र अभिनेता म्हणून तर तो प्रसिद्ध होताच, परंतु आपल्या सर्वांचा लाडका लक्ष्या हा माणूस म्हणून देखील खूप ख्यातनाम होता. आणि म्हणूनच आज आपण त्याच्या वैयक्तिक आयुष्यबद्दल आणि सुरुवातीच्या संघर्षाबद्दल जाणून घेणार आहोत.

आपण अगदी सुरुवातीपासून सुरुवात करूयात! १९५४ ला मुंबईत लक्ष्याचा जन्म झाला. त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा काळ होता त्यामुळे लक्ष्याचं बालपण कसं गेलं असेल, याचा आपण विचार करूच शकता. जसजसा हा मुलगा मोठा होऊ लागला त्याला नाटकाची आवड निर्माण झाली. ही आपली हौस तो गणेशोत्सवात होणाऱ्या नाटकांमध्ये भाग घेऊन भागवू लागला.

Lakshmikant Berde in Film
Lakshmikant Berde in Film

गिरणगावात जन्मलेल्या लक्षासाठी साहित्य संघ काही दूर नव्हतं. साहित्य संघात हा नाटकवेडा नाटकं पाहायला जाऊ लागला. परंतु रोज रोज नाटकासाठी पैसे येणार कुठून? घराची परिस्थिती हलाखीची… मग आपल्या लक्ष्यानं एक शक्कल लढवली. साहित्य संघात पडदा देण्याची नोकरी मिळवली. जेणेकरून विंगेतून का होईना नाटकं पाहता येतील.

यानंतर अशाच एका नाटकात काम करताना त्याची ओळख ही अभिनेत्री रुही बेर्डे(पहिली पत्नी) यांच्याशी झाली. रुही त्यावेळी नाटकाचे दौरे महाराष्ट्र भर करत होत्या. सोबतच रूही यांनी बॉलिवूडमध्ये १९७३ सालीच ‘आ गले लग जा’ या सिनेमातून पदार्पण केलं होतं.

Laxmikant Berde
Laxmikant Berde

सन १९८३साली त्यांनी जॅकी श्रॉफ यांच्यासोबत हिरो या सिनेमात देखील महत्त्वाची भूमिका बजावली होती. परंतू, लक्ष्याचं मात्र प्रायोगिक नाटकांमधून तसच व्यावसायिक नाटकांमधून, एकांकिकांमधून छोट्या मोठ्या भूमिका करणं सुरूच होतं.

याच काळात रुही आणि लक्ष्याची एक नाटकात ओळख झाली. त्या नाटकाचे बरेचसे दौरे त्यांनी एकत्र केले आणि कधी हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले हे त्यांना देखील कळालं नाही. ते नाटक खूप चाललं. त्यानंतर टूर टूर हे तर तुफान सुरूच होतं. अशात १९८५ साली रुही आणि लक्ष्या यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला सर्वसंमतीने लग्न केलं.

लग्नानंतर लक्ष्याला रुपेरी पडद्यावरचा पहिलाच मोठा ब्रेक हा ‘लेक चालली सासरला’ या सिनेमातुन मिळाला. आणि मग लागोपाठ लक्ष्याचे एकावर एक हिट सिनेमे येऊ लागले.

Ashi hi banava banavi
Ashi hi banava banavi

यानंतर त्याचे धूमधडाका, दे दणादण सिनेमे हिट गेले. याकाळात लक्ष्याचं नाव हे महाराष्ट्रात पसरू लागलं होतं. आणि लक्ष्याला करियर मध्ये पुढे जाता यावं, यासाठी रुही यांनी स्वतःच्या करियर वर पाणी सोडलं. त्या प्रत्येक ठिकाणी लक्ष्याच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असायच्या. मात्र, रुही बेर्डे यांचे १९९८ साली दुःखद निधन झालं आणि लक्ष्या एकटा पडला.

लक्ष्या एक दोस्त म्हणून कायम खरा होता. याची प्रचिती दिग्दर्शक, अभिनेते महेश कोठारे यांना एकदा नव्हे तर दोनदा आली. पहिल्यांदा हे दोघेही एका नाटकाच्या प्रयोगाला भेटले होते. म्हणजे झालं असं, महेश कोठारे यांच्या आई वडिलांचं नाटक होतं ‘झोपी गेलेला जागा झाला’ आणि त्याच नाटकात लक्ष्या एक लहानशी भूमिका साकारत होता.

महेश कोठारे यांनी जेव्हा तो संपूर्ण प्रयोग पाहिला आणि ते लक्ष्याच्या अक्षरशः प्रेमातच पडले. त्यावेळी त्यांच्याकडे पैसे नव्हते. परंतु खिशात असलेल्या १ रुपया देऊन त्यांनी लक्ष्याला धुमधडाका या सिनेमासाठी साइन केलं होतं. यावर लक्ष्यानेही क्षणाचाही विलंब न लावता होकार दिला. या प्रसंगाने हे दोन मित्र जे एकत्र आले ते लक्ष्याच्या जाण्यापर्यंत एकत्रच होते. ती मैत्री अबाधित होती.

Lakshmikant Berde Hit Movies
Lakshmikant Berde Hit Movies

दुसरा किस्सा असा की महेश कोठारे यांच्या एक सिनेमाचं शूटिंग कोल्हापुरात सुरू होतं. आणि एक दिवस अचानक तिथे लाईट्स गेल्या.लाईट्स नाहीत म्हणून सगळे क्रिकेट खेळत होते, परंतु महेश कोठारे मात्र चिंतेत होते. लक्ष्याने जाऊन त्यांना विचारलं तेव्हा कळालं की लक्ष्याची दुसऱ्या दिवशी राजश्री सोबत मिटोंग होती आणि तिथे ‘मैने प्यार किया’चं शूट सुरू होणार होतं.

लक्ष्याचा ‘मैने प्यार किया’ हा पहिलाच हिंदी चित्रपट होता. त्यामुळे आपल्यामुळे त्याची ही हिंदीतली संधी जाते की काय असा प्रश्न त्यांना पडला होता. पण अशा वेळी लक्ष्याने राजश्री प्रोडक्शनमध्ये फोन लावून त्याची तारीख पुढे ढकलायला सांगितली आणि महेश कोठारेना दिलासा दिला, यावेळी आपल्याला दोघांच्याही घट्ट मैत्रीचं दर्शन होतं.

रुही यांच्या निधनांनंतर लक्ष्याने त्याची सहकलाकार प्रिया अरुण यांच्याशी १९९८ साली दुसरा विवाह केला. लक्ष्या आणि प्रिया यांचा हा संसार अगदी सुखाचा चालला होता. त्यांना अभिनय आणि स्वानंदी अशी दोन मुलं देखील झाली.

सगळं काही व्यवस्थित सुरू असताना अचानक २००४ साली लक्ष्याला मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रासलं आणि या आजारातून लक्ष्या काही सावरू शकलाच नाही.  यातून दिनांक १६ डिसेंबर २००४ साली वयाच्या अवघ्या पन्नाशीत लक्ष्या आपल्या सगळ्यांना सोडून गेला.

Laxmikant Berde File Photo
Laxmikant Berde File Photo

आयुष्यभर लक्ष्याने महाराष्ट्राला पोट धरून हसवलं, परंतु तो ज्या वेळी गेला त्यावेळी महाराष्ट्राच्या प्रत्येक सिनेप्रेमीच्या डोळ्यांमध्ये अश्रू देऊन गेला. चिमणी पाखरं हा सिनेमा लक्ष्याच्या कारकिर्दीतील अखेरचा सिनेमा ठरला.

आजही लक्ष्या त्याच्या सिनेमांमधून आपल्याला रोज भेटत असतो, आपल्याला हसवत असतो. लक्ष्याची मुलं देखील आता मोठी झाली आहेत. अभिनयने तर त्याच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात देखील केली आहे. ती सध्या काय करते?, रंपाट, अशी ही आशिकी अशा सिनेमांमधून त्याने त्याच्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे. तर, लहान मुलगी स्वानंदी ही सध्या शिक्षण घेत असून पत्नी प्रिया बेर्डे या अनेक मराठी सिनेमांमधून आपल्या भेटीस येत असतात.

हे देखील वाचा