‘टायटॅनिक’ हा चित्रपट सर्वांनीच पाहिला असेल. त्यातील प्रमुख भूमिकेत असलेली अभिनेत्री केट विन्सलेट आज (५ ऑक्टोबर) आपला ४५ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म १९७५ मध्ये इंग्लंड येथे झाला होता. तिचं पूर्ण नाव एलिझाबेथ विन्सलेट आहे. केटचे आई- वडीलदेखील चित्रपटात काम करायचे. त्यामुळे अभिनयाचं बाळकडू तिला लहानपणापासूनच घरातून मिळालं होतं. तिला २ बहिणी आहेत. बेथ विन्सलेट आणि ऍना विन्सलेट. या दोघीही अभिनेत्री आहेत. लहानपणी केटच्या कुटुंबाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला होता.
वयाच्या ११ व्या वर्षीच केट एका थिएटरशी जोडली गेली. जिथे तिने पहिल्यांदा जाहिरातीमध्ये काम केले. केट जेव्हा १५ वर्षांची होती, तेव्हा ती पहिल्यांदा पडद्यावर ब्रिटीश टेलिव्हिजन सीरिज डार्क सिझन (१९९१) मध्ये दिसली होती. १९९४ मध्ये चित्रपट हेवनली क्रिएचर्समधून केटने चित्रपट जगतात पाऊल ठेवले. अभिनयाव्यतिरिक्त केट एक चांगली गायिकाही आहे. पहिल्याच चित्रपटात तिने गाणे गायले होते.
१९९७मध्ये चित्रपट ‘टायटॅनिक’मध्ये केट विन्सलेट आणि अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रियो हे मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटावर जगभरातून कौतुकांचा वर्षाव झाला. या चित्रपटाला ११ अकादमी पुरस्कार मिळाले. २००९ मध्ये आयोजित गोल्डन ग्लोब्स पुरस्कारामध्ये केटने लिओनार्डोवर सर्वांसमोर आपले प्रेम व्यक्त केले होते.
केटने आतापर्यंत ३ लग्न केले आहेत. १९९८मध्ये केटने सहाय्यक संचालक जिम थ्रिलनेटनसोबत लग्न केले होते. त्यानंतर या जोडप्याला एक अपत्य झाले. तिचे नाव मिया आहे. २००१ मध्ये केटने जिमकडून घटस्फोट घेतला. घटस्फोटाच्या २ वर्षांनंतर २००३ मध्ये तिने सॅम मॅनडेससोबत लग्न केले. हे लग्नही खूप काळ टिकले नाही आणि २०११ मध्ये त्यांचाही घटस्फोट झाला. सॅम आणि केट यांना एक मुलगा आहे. त्याचं नाव जो आहे.
२०१२ मध्ये केटने आपले तिसरे लग्न नेड रॉकएनरोलसोबत न्यूयॉर्कमध्ये कोणालाही न सांगता केले. २०१३ मध्ये या दोघांनाही एक पुत्ररत्न प्राप्त झाले. त्याचे नाव बियर आहे.
एका मुलाखतीत केटने म्हटले होते की, आपल्या मुलांसोबत अधिकाधिक वेळ घालवण्याचा ती प्रयत्न करते.
‘पीपल मॅगझिन’ च्या सर्व्हेनुसार केट विन्सलेटने ५० सर्वात सुंदर व्यक्तींमध्ये आपले स्थान मिळवले आहे. केट ही शाकाहारी आहे.
केटने आतापर्यंत इटरर्नल सनशाईन ऑफ द स्पॉटलेस माईंड (२००४), लिटल चिल्ड्रन (२००६), द हॉलिडे (२००६), द रिडर (२००८), रिव्होल्यूशनरी रोड (२००८), द माऊंटेन बिटवीन अस (२०१७) यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.