कैलाश खेर यांच्या आवाजाची जादू गेल्या सतरा वर्षांपासून सर्व वर्गातील रसिकांवर कायम आहे. कैलाश खेर यांचा पहाडी आवाज आणि त्यांची सुफी गायकी ही मनाला सुखावल्याशिवाय राहत नाही. ही जादू फार कमी गायकांच्या आवाजात असते आणि त्यापैकी एक कैलाश खेर आहेत. कैलास खेर त्यांच्या गाण्याच्या वेगळ्या शैलीसाठी ओळखले जातात. संगीत जगतातील दिग्गजही त्यांच्या आवाजाचे चाहते झाले आहेत. मेरठमध्ये जन्मलेल्या कैलाश खेर यांनी त्यांच्या आयुष्यात खूप संघर्ष केला. कैलाश खेर यांचे वडील काश्मिरी पंडित होते आणि त्यांना लोकगीतांमध्ये खूप रस होता. यामुळे कैलाश खेर यांनाही लहानपणापासूनच संगीताची आवड निर्माण झाली होती.
१९७३ साली मेरठ, उत्तरप्रदेश येथे कैलाश खेर यांचा जन्म झाला होता. कैलाश खेर यांनी वयाच्या चौथ्या वर्षापासून गायला सुरूवात केली होती. त्यांनी बालवयातच आपल्या आवाजाने सर्वांना मोहित केलं होतं. कैलाश खेर यांचे वडील कार्यक्रमात पारंपारिक गाणी गात असत. परंतु त्यांना फिल्मी गाणी अजिबात आवडली नाहीत, तर कैलाश यांना मात्र बॉलिवूड गाण्यांची आवड होती. जेव्हा कैलाश यांनी गायनाला आपलं करियर बनवायचं ठरवलं तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना विरोध केला, परंतु कैलाशही हार मानणारे नव्हते. फक्त १४ वर्षांचे असताना त्यांनी गायकीसाठी स्वतःच राहतं घर सोडलं. पंडित भीमसेन जोशी, पंडित कुमार गंधर्व, पंडित हृदयनाथ मंगेशकर, नुसरत फतेह अली खान, भारतरत्न लता मंगेशकर यांना कैलाश खेर यांनी आदर्श मानलं होतं.
गायनासाठी घर सोडल्यानंतर कैलाश हे दिल्लीला गेले होते. येथे त्यांनी संगीताचे शिक्षण घेणं सुरू केलं. दिल्लीला कैलाश आले तर खरं पण खिशात एक पैसादेखील नव्हता. त्यांनी स्वतःचा खर्च आणि घरखर्च भागवण्यासाठी मुलांना संगीताची शिकवणी सुरू केली. ते प्रत्येक मुलाकडून १५० रुपये फी आकारत असत आणि घरखर्च त्यातून काढून घेत असत. कैलाश खेर यांच्यासाठी सारं काही सुरळीत नव्हतं. असा एक काळ होता जेव्हा त्यांना अजिबात आशेचा किरण दिसत नव्हता. साल १९९९ मध्ये त्यांनी उदरनिर्वाहासाठी आपल्या मित्राबरोबर हँडक्राफ्टस निर्यात व्यवसाय सुरू केला. कैलाश व त्यांच्या मित्राला यात फार मोठा तोटा सहन करावा लागला. या सततच्या अपयशांमुळे कैलाशने यांनी आत्महत्येचा प्रयत्न देखील केला होता.
जेव्हा कैलाश यांना काहीच मार्ग सापडला नाही तेव्हा ते हृषीकेश येथे गेले. तिथे ते संतांमध्ये राहून भजन गात असत. येथूनच त्यांचा आत्मविश्वास जागृत झाला आणि ते मुंबईत पोहोचले. २००१ मध्ये, कैलास मुंबईत आले. खिशात पैसे नव्हते त्यामुळे इथे उदरनिर्वाह चालवण्यासाठी गाण्याच्या ज्या काही ऑफर्स यायच्या त्या ते स्वीकारू लागले. एके दिवशी संगीतकार राम संपत यांच्याशी कैलाश यांची भेट झाली तेव्हा त्यांना आयुष्यातील आशेचा किरण दिसला. संपत यांनी कैलाश यांना जाहिरातींमध्ये जिंगल्स गाण्याची संधी दिली. पेप्सी ते कोका कोला यासारख्या मोठ्या ब्रँडसाठी त्यांनी जिंगल्स गायल्या.
२००३ मध्ये कैलाश यांचं बॉलिवूड मध्ये पदार्पण झालं. त्यांनी अंदाज या सिनेमातील रब्बा ईश्क ना होवे हे गाणं गाऊन आपल्या बॉलिवूड कारकिर्दीची सुरुवात केली. यानंतर लगेचच त्यांना वैसा भी होता है पार्ट २ या सिनेमाची ऑफर आली. या सिनेमातील अल्लाह के बंदे या गाण्याने त्यांना बॉलिवूडमध्ये खरी ओळख मिळवून दिली. त्यांनी पुढे अनेक गाण्याचे अल्बम काढले आणि त्यातही त्यांनी भरपूर गाणी गायली जी खूप प्रसिद्ध झाली. तेरी दिवानी हे अल्बम सॉंग अजूनही प्रत्येकाच्या तोंडी गुणगुणताना आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर २०१५ आणि २०१७ मध्ये आलेल्या बाहुबली सिरीजमध्ये त्यांना गाणं गायची संधी मिळाली. बाहुबली चित्रपटाबद्दल जास्त काही सांगण्याची आवश्यकता नाहीच. याच चित्रपटातील जल रही है चिता आणि जय जय कारा ही दोन गाणी त्यांनी गायली जी खूप प्रसिद्ध झाली. कैलाश यांना दोन वेळा फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट गायक हा पुरस्कार मिळाला आहे तर २०१७ मध्ये त्यांना भारताचे दिवंगत राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
कैलाश खेर यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. पत्नी शीतलबद्दल बोलताना कैलाश म्हणतात की, ‘आम्ही दोघेही वेगवेगळ्या जगातील प्राणी आहोत. मी एक संकुचित वृत्तीचा माणूस आहे, तर ती मॉडर्न विचारांच्या मुंबईत मोठी झाली आहे. आम्ही दोघेही एका कॉमन मित्राच्या माध्यमातून भेटलो. आम्हा दोघांमध्येही एकच सामान्य गोष्ट आहे ती म्हणजे संगीत!’ २००९ मध्ये कैलाश खेर यांनी शीतल यांच्याशी लग्न केलं. शीतल या त्यांच्यापेक्षा ११ वर्षांनी लहान आहेत. या दोघांनाही एक कबीर नावाचा मुलगा आहे. कैलाश खेर आज ज्या उंचीवर पोहोचले आहेत ते त्यांच्या मेहनतीने पोहोचले आहेत. त्यामुळे तेच त्यांच्या यशाचे खरे हकदार आहेत.










