Monday, December 9, 2024
Home बॉलीवूड शिक्षणासाठी इरफान यांना पैसे मिळणे झाले होते बंद, पण कधीच मानली नाही हार; वाचा त्यांची संघर्षमय कहाणी

शिक्षणासाठी इरफान यांना पैसे मिळणे झाले होते बंद, पण कधीच मानली नाही हार; वाचा त्यांची संघर्षमय कहाणी

इरफान खान हे बॉलिवूडमधले असे नाव आहे, ज्यांच्या उत्त्तम कामगिरीला कधीच कोणी विसरू शकत नाही. त्यांनी केवळ बॉलिवूड नाही, तर हॉलिवूडमध्येही आपल्या नावाचा डंका वाजवला होता. त्यामुळे त्यांचे चाहते भारतातच नाही, तर संपूर्ण जगभर आहेत. इरफान खान यांचा आवाज, आणि डोळे या गोष्टींमुळे त्यांची भूमिका करायची शैली  खूपच वेगळी होती. त्यांच्या अभिनयाने त्यांनी प्रत्येक वर्गातल्या प्रेक्षकांना प्रभावित केले आहे. ०७ जानेवारी इरफान खान यांची जयंती साजरी केली जात आहे. या निमित्याने एक नजर टाकूयात त्यांच्या जीवन प्रवासावर…

इरफान खान (Irrfan Khan) यांचा जन्म ७ जानेवारी, १९६७ रोजी राजस्थानच्या टोंक येथे मुस्लिम पठाण कुटुंबात झाला होता. इरफान खान हे आपल्या घरात सगळ्यांपेक्षा खूपच वेगळे होते. त्यांचा जन्म एका पठाण कुटुंबात झालेला असला, तरीपण ते शाकाहारीच होते. त्यांना मुक्या प्राण्यांची हत्त्या केलेली बालपणापासून कधीच पटली नव्हती. एक किस्सा सांगायचा झाला, तर इरफान खान हे फक्त आणि फक्त शाकाहारीच आहार घेत असल्याने त्यांचे वडील त्यांना ‘पठाण कुटुंबात ब्राह्मण जन्माला आला आहे,’ असे सतत म्हणत असत.

त्यांच्या जीवनातील संघर्ष आणि कामगिरीकडे एक नजर टाकण्याआधी जाणून घेऊयात त्यांच्या खासगी आयुष्याविषयी…

इरफान यांनी लेखिका सुतापा सिकंदर यांच्याशी २३ फेब्रुवारी, १९९५ रोजी लग्न केले होते. सुतापा त्या एनएसडी (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा) पदवीधर देखील आहे. इरफान यांना बाबिल आणि अयान खान ही दोन मुले आहेत. बाबिल हा वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

जीवनातील संघर्ष ते उत्तम कामगिरी
चित्रपटात पाऊल ठेवण्याआधी इरफान खान यांनी आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. त्यांनी एनएसडीमध्ये प्रवेश घेतल्यावर त्यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते, याच कारणामुळे पुढील शिक्षणासाठी इरफान यांना घरातून पैसे मिळणं बंद झाले होते, पण त्यांनी कधीच हार मानली नाही. एनएसडीकडून फेलोशिपद्वारे (शिष्यवृत्ती) त्यांनी आपला अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांनी एनएसडीमधून अभिनयाचे शिक्षण घेतले होते.

सन १९८७ मध्ये पदवी मिळवल्यानंतर ते कामाच्या शोधात मुंबईत आले. इरफान खान यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात टीव्ही मालिकांमधून केली होती. दूरदर्शनच्या ‘श्रीकांत’ या मालिकेतून त्यांनी पदार्पण केले होते. त्यांनी ‘चाणक्य’, ‘सारा जहां हमारा’, ‘बनेगी अपनी बात’, ‘चंद्रकांत’, स्पर्श असे अनेक टीव्ही कार्यक्रम केले.

आयुष्यात बऱ्याच गोष्टींचा संघर्ष करून शेवटी त्यांनी त्यांचे ध्येय गाठलेच. त्यांना ‘सलाम बॉम्बे’ नावाचा एक चित्रपट मिळाला, ज्यामध्ये त्यांची अगदी छोटी भूमिका होती. पण म्हणतात ना कधी कधी छोटे कामच माणसाला खूप पुढे घेऊन जाते, तसेच काही इरफान यांच्या बाबतीत घडले. आपल्या छोट्याश्या पात्राने लोकांचे लक्ष वेधून घेणार्‍या इरफान खान यांना नंतर एवढे चित्रपट मिळाले की, यानंतर त्यांनी परत कधीच मागे वळून पाहिले नाही.

‘मकबूल’, ‘हासिल’, ‘पान सिंग तोमर’, ‘तलवार’, ‘मुंबई मेरी जान’, ‘गँगस्टर रिटर्न्स’, ‘हिंदी मीडियम’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम करून इरफान यांनी प्रेक्षकांच्या हृदयात आणि इंडस्ट्रीत एक खास स्थान निर्माण केले आहे.

इरफान खान हे बॉलिवूडमध्ये ज्या प्रकारे कमालीचा अभिनय करत खूप पुढे जात होते, तेव्हा त्यांनी हिंदी चित्रपटासोबत इंग्रजी चित्रपटात देखील काम करायला मोठ्या प्रमाणात सुरुवात केली होती. त्यांनी ‘स्पायडर-मॅन’, ‘जुरासिक वर्ल्ड’ आणि ”इन्फर्नो यांसारख्या चित्रपटात काम केलं. हॉलिवूड अभिनेते टॉम हँक्स यांनी एकदा बोलताना त्याचं कौतुक केलं होतं की, इरफानच्या डोळ्यांतून त्यांचा अभिनय दिसतो. अशी उत्तम पोचपावती त्यांना मिळाली होती.

सन २०१३ मध्ये ‘पान सिंग तोमर’ चित्रपटासाठी इरफान खान यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. इरफान अखेर ‘इंग्लिश मीडियम’ या चित्रपटात दिसले होते. ‘हासिल’ साठी सर्वोत्कृष्ट खलनायकाचा फिल्मफेअर पुरस्कारही त्यांनी जिंकला आहे. २००७ मध्ये आलेला इरफान यांचा ‘लाइफ इन ए मेट्रो’ हा चित्रपट हिट ठरला होता. ‘द नेमसेक’ हा चित्रपट परदेशात हिट ठरला होता, आणि तब्बूबरोबरच्या त्यांच्या कामाचे कौतुक केले होते.

दिनांक १६ मार्च, २०१८ रोजी इरफान यांनी सांगितले होते की, ते न्यूरोएन्डोक्राइन कर्करोगाशी झुंज देत आहे, आणि उपचारासाठी परदेशात जाणार आहेत. इरफान हे कर्करोगाशी लढून परत आले होते, आणि त्यांनी ‘इंग्लिश मीडियम’ हा चित्रपट पूर्ण केला होता. मात्र, त्यांन पुन्हा त्रास होऊ लागला आणि त्यांचे वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झाले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

Dipika Chikhalia B’day: सीता मातेच्या भूमिकेनंतर दीपिका चिखलियाला मिळाली संसदेत जागा, निवडणुकीत बंपर विजय

‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाच्या प्रदर्शना बरोबरच केदार शिंदेच्या “बाईपण भारी देवा” चित्रपटाचा टीझर रिलिज – व्हिडिओ

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा