Monday, July 1, 2024

‘जय भीम’ सिनेमाच्या शिरपेचात अजून एक मनाचा तुरा, ऑस्करकडून मिळाला ‘हा’ मोठा गौरव

मागच्या वर्षी प्रदर्शित झालेला दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्याचा ‘जय भीम’ हा सिनेमा तुफान गाजला. भारतात मोठ्या प्रमाणावर असणारी जातीय विषमता आणि या विषमतेमुळे तळागाळातील आदिवासी समुहांना सहन कराव्या लागणाऱ्या वेदना, त्रास आणि त्यातून त्यांच्या वाट्याला आलेले गुन्हेगारांचे जीवन याचे विदारक आणि सत्य चित्रण सिनेमात दाखवण्यात आले आहे. या सिनेमातील सूर्याच्या अभिनयाचे तुफान कौतुक करण्यात आले. चित्रपटाची कथा आणि कलाकारांचा प्रभावी, जिवंत अभिनय यांमुळे हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनावर कोरला गेला. प्रदर्शनाच्या एवढ्या दिवसानंतर पुन्हा एकदा ‘जय भीम’ सिनेमा चर्चेत आला आहे.

या सिनेमाला मोठा सन्मान प्राप्त झाल्यामुळे चित्रपटाची आणि पर्यायाने भारताची मान मनोरंजनाच्या विश्वात उंचावली आहे. या सिनेमाच्या नावावर एक रेकॉर्ड तयार झाले आहे, ज्यामुळे सूर्याचे, आणि चित्रपटाचे फॅन खूपच आनंदी झाले आहे. या ‘जय भीम’ सिनेमाने ऑस्करच्या यूट्यूब चॅनेलवर जागा निर्माण केली आहे. या चित्रपटाला ऍकेडमिक पुरस्कारांच्या यूट्यूब चॅनेलवर दाखवला जाणार आहे.

या सन्मानामुळे ‘जय भीम’ हा पहिला असा तामिळ सिनेमा बनला आहे ज्याला असा गौरव प्राप्त झाला आहे. याआधी या चित्रपटाला गोल्डन ग्लोबस २०२२ मध्ये बेस्ट नॉन इंग्लिश चित्रपटांच्या विभागात अधिकृत पद्धतीने प्रवेश देण्यात आला आहे. याशिवाय या सिनेमाने आईएमडीबीवर ९.६ रेटिंग सोबत अजून एक रेकॉर्ड तयार केले आहे.

या सिनेमाला हा गौरव मिळाल्याने सर्वच प्रेक्षकांना आनंद झाला असून, सिनेमाचे स्क्रीनशॉट शेअर करत सोशल मीडियावर त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोबतच सिनेमाचे आणि कलाकारांचे अभिनंदन देखील केले आहे. या सिनेमात सूर्याने चंद्रू वकिलाची भूमिका तर लिजोमोल जोसने सेनगानीची दमदार भूमिका साकारत सिनेमाला एका उंचीवर नेऊन ठेवले आहे. दिग्दर्शक टी जे ज्ञानवेल यांनी या कोर्टरूम सिनेमाचे उत्तम पद्धतीने दिग्दर्शन केले असून, मणिकंदन, राजीशा विजयन, प्रकाश राज आणि राव रमेश आदी अनेक कलाकार महत्वाच्या भूमिकेत आहेत. हा सिनेमा १९९३ साली झालेल्या एका खऱ्या घटनेवर आधारित होता.

हेही वाचा-

हे देखील वाचा