Tuesday, April 16, 2024

तरुणांना स्वप्न बघण्याची प्रेरणा देणारा सुशांत सिंग राजपूत,वाचा बॉलिवूडने गमावलेल्या हरहुन्नरी कलाकाराचा प्रवास

तारिख होती 14 जून 2020, अचानक दुपारी बातमी आली 34 वर्षीय अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे निधन झाले, त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे प्राथमिक अहवालात सांगण्यात आले होते. त्यानंतर त्याच्या मृत्यूच्या रहस्यांनी अनेक वळणं घेतली. त्याचा मृत्यू आत्महत्या नाही, तर मर्डर असल्याचेही दावे झाले. त्याच्या चाहत्यांनी त्याला न्याय मिळावा म्हणून मागणीही केली. अनेक बड्या सेलिब्रेटींविरुद्ध आंदोलनं झाली. यादरम्यान त्याची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला अटकही झाली. या सर्व घडामोडी घडत होत्या, पण भारताने एक टॅलेंटेड अभिनेता गमावला होता आणि हे हे सत्य होतं. त्याचे निधन का झाले या विषय जरा बाजूला ठेवू आणि आज सुशांत अनेकांसाठी प्रेरणा का ठरला, काय होती त्याची स्टोरी जाणून घेऊ…

सुशांत, जन्म 21जानेवारी 1986 चा बिहारमध्ये. तो घरात त्याच्या भावंडांमध्ये सर्वात लहान होता. त्याला मोठ्या चार बहिणी. सर्वात लहान असल्याने सर्वांचा लाडकाही होता. त्याचे वडील हँडलूम कार्पोरेशनमध्ये टेक्निकल ऑफिसर होते. तर आईच्या तो खुप जवळ होता. तो 15-16 वर्षांचा असताना त्याच्या आई जग सोडून गेली. याचा सुशांतवर खूप परिणाम झाला. आधीपासूनच शांत असणाऱ्या सुशांतने आईसाठी मोठं होण्याचं स्वप्न पाहिलं. तसा सुशांत लहानपणापासूनच हुशार होता. शाळेत त्याची गणना हुशार मुलांमध्ये होत होती. पुढेही त्याने आपल्यातील शिक्षणाची गोडी कायम ठेवली. त्याने इंजिनिरिंग करण्यासाठी दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमध्ये ऍडमिशन घेतले, तो त्यावेळी एंटरान्स एक्झाममध्ये देशात ७ वा आला होता. इतकंच नाही, तर त्याने फिजिक्समध्ये नॅशनल ऑलिंपियाडही जिंकली होती.

तो दिल्लीत इंजिनियरिंगचे शिक्षण घेत असताना त्याने डान्स क्लासला जाणेही सुरू केले आणि इथेच त्याला ब्रेक मिळायला सुरूवात झाली. त्याला 2005 ध्ये फिल्मफेअर ऍवॉर्डमध्ये आणि 2006 मध्ये ऑस्ट्रेलियात कॉमनवेल्थ गेम्सच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून संधी मिळाली. यादरम्यान तो इंजिनिअरिंगही करत होता. पण एक दिवस त्याला किस देश मै है मेरा दिल मालिकेची ऑफर आली. त्यावेळी त्याच्याकडे दोन पर्याय होते मुंबईला जाऊन अभिनयात करियर करायचे किंवा इंजिनियरिंग करायचे. त्याने तीन वर्षे इंजिनियरिंगची पूर्ण केली होती. पण असे असतानाही त्याने मुंबईला जाणे पसंत केले. मात्र, मुंबईत आल्यानंतर त्याला कळाले की मालिकेच्या शूटींगला अजून काही दिवस लागणार आहे. अशावेळीही त्याने हार न मानता मुंबईत राहत ट्यूशन घेत संघर्ष केला. त्याने मुंबईत त्याने नाटकांमध्ये काम करण्यासही सुरूवात केली.

पुढे किस देश मे है मेरा दिल मालिकेने मोठा ब्रेक दिला. त्यातील त्याच्या अभिनयाने सर्वांवरच छाप पाडली आणि त्याला पवित्र रिश्ता ही मालिका मिळाली. या मालिकेने सुशांतला घराघरात पोहचवलं. त्याने केलेली मानवची भूमिका आजही अनेकांना आठवते. या भूमिकेने त्याला अभिनय क्षेत्रात खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. याच मालिकेवेळी त्याने डान्स रिऍलिटी शोपण केले. पण आहे त्या गोष्टींवर समाधान मानण्याचा स्वभाव सुशांतचा नव्हता. त्याने नेहमीच मोठी स्वप्न पाहिली. एकाच गोष्टीत तो अडकत नव्हता. त्याचमुळे त्याने पुढील प्रगतीसाठी परदेशात फिल्ममेकिंग कोर्स करण्यासाठी पवित्र रिश्ता ही मालिका सोडली. त्याचा हा निर्णय त्याच्यासाठी योग्य ठरला कारण त्याने अभिषेक कपूर यांच्या काय पो छे चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. एक सामान्य घरातील मुलगा ते बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा एक अभिनेता हा प्रवास सुशांतसाठी सोपा नव्हता. एक सेक्यूअर करियर सोडून तो अभिनय क्षेत्रात आला होता. पण त्याच्या कष्टाचे चीज झाले. त्याला एका मागून एक हिट सिनेमे मिळाले.

काय पो छे नंतर त्याने शुद्ध देसी रोमान्स, पीके, डिटेक्टीव्ह व्योमकेश बक्षी असे चित्रपट केले. हे चित्रपट करतानाही त्याने त्याच्या भूमिकांसाठी मेहनत घेतली पण त्याला बॉलिवूडमध्ये खऱ्याअर्थाने मोठे केले ते निरज पांडे यांच्या एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटाने. भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या आयुष्यावर अधारित असलेल्या या चित्रपटात तो मुख्य भुमिकेत दिसला. यासाठी त्याने क्रिकेट शिकले. तो अनेकदा धोनीला भेटला, रांचीला गेला. त्याने बारकाईने धोनीच्या गोष्टी आत्मसात करत भूमिका निभावली. त्याच्या या भूमिकेचे खूप कौतुकही झाले, त्याला या चित्रपटासाठी पहिल्यांदाच फिल्मफेअरचा सर्वोत्तम अभिनेता म्हणून नामांकनही मिळाले. यानंतर त्याने राब्ता, केदारनाथ, सोनचिरय्या छिछोरे, दिल बेचारा हे चित्रपटही केले. 2016 मध्ये त्याने चंदा मामा दू के या चित्रपटाबाबतही घोषणा केली होती. यासाठी तो नासालाही जाऊन आला होता. पण हा चित्रपट अद्याप रिलीज झाला नाही. तसेच या चित्रपटात सुशांत आता दिसणारही नाही, हे दुर्दैव… पण विशेष गोष्ट अशी की सुशांतचे शेवटचे दोन्ही चित्रपट आयुष्य भरभरून जगण्याबद्दल संदेश देऊन. मात्र, त्याच्या आयुष्याबाबत तसं झालं नाही… त्याचा अखेरचा चित्रपट दिल बेचारा तर त्याच्या निधनानंतर रिलीज झाला.

एकीकडे त्याच्या करियरचा ग्राफ वरवर चढत असतानाच त्याची वैयक्तिक लाईफही चर्चेत येऊ लागली. पवित्र रिश्तामध्ये त्याच्याबरोबर प्रमुख भुमिकेत असलेल्या अंकिता लोखंडेबरोबर तो जवळपास 6 वर्षे रिलेशनशिपमध्ये होता. या दोघांनीही त्यांचे नाते कधी लपवले नव्हते. पण काही कारणात्सवर त्यांनी 2016 मध्ये त्यांचा ब्रेकअप झाल्याचे सांगितले. त्यानंतर सुशांतचे नाव राब्ता फेम क्रिती सेननबरोबरही जोडले गेले. तसेच त्याच्या निधनावेळी तो रिया चक्रवर्तीबरोबर रिलेशनशीपमध्ये असल्याचीही चर्चा होती.

आयुष्यात अनेक गोष्टी घडत असतानाही सुशांतने फिझिक्सची, खगोलशास्त्राची आवड जपली होती. त्याच्याकडे या विषयांवरील अनेक पुस्तकं होती. त्याचबरोबर अवकाशाचे निरिक्षण करण्यासाठी त्याने टेलिस्कोपही विकत घेतलेला. त्याला मोठा चाहतावर्ग मिळाला तो त्याच्यातील नम्रतेमुळे. सुशांत अनेकदा त्याच्या चाहत्यांशी नम्रतेने बोलायचा. त्याने कधी आपल्या चाहत्यांशी दुजाभाव केलेला दिसला नव्हता… त्याच्या याच गुणांमुळे तो अनेकांसाठी फेवरेट झाला होता, इतकंच नाही त्याने अनेकदा चॅरिटीवर्कही केले. केरळ, नागालँड अशा ठिकाणी कोट्यावधी रुपयांची मदतनीधीही पाठवली. त्याचे हेच गुण त्याला मोठं करून गेले. जिंदगी लंबी नही बडी होनी चाहिये हे त्याला तंतोतंत लागू झालं. त्याच्या मृत्यूनंतरही तो सर्वांच्या लक्षात राहिला, ते केवळ त्याच्या चित्रपटांमुळे नाही, तर त्याच्यातील याच नम्रतेमुळे, त्याने घेतलेल्या मेहनतीमुळे आणि नेहमीच हसऱ्या चेहऱ्यामुळे.

असं म्हणतात ना जिथे इच्छा असते, तिथे मार्ग असतो… तसंच सुशांतचंही झालं त्याने सुरुवातीपासूनच मोठी स्वप्न पाहिली आणि ती पूर्ण करण्याची धमकही दाखवली. तुम्ही कुठून येता हे महत्त्वाचं नसतं, तर तुम्ही प्रामाणिकपणे कसं यश मिळवता हे महत्त्वाचं असतं, मग त्यासाठी कितीही मेहनत घ्यावी लागली तरी चालेल, हेच सुशांतने त्याच्या आयुष्यातून दाखवून दिलं… म्हणूनच तो अनेकांसाठी प्रेरणा ठरला.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अगदी दृष्ट लागेल असे होते सुशांत आणि रियाचे नाते, वाढदिवशी रियाने केला अनसीन व्हिडिओ शेअर
सौंदर्याची खान! श्रुती हसनचा किलर लूक कतोय चाहत्यांना घायाळ

हे देखील वाचा