Friday, December 27, 2024
[aioseo_breadcrumbs]

अमेरिकेत ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’चे शंभर शोज ‘हाऊसफुल्ल’

‘गीतरामायणा’ला स्वरसाज देणारे संगीतकार, गायक सुधीर फडके म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबूजी यांची जीवनगाथा सांगणारा ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रेक्षकांची पसंती मिळवण्यात हा चित्रपट यशस्वीही झाला. केवळ प्रेक्षकच नाही तर श्रीधर फडके, आशा भोसले यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले. समीक्षकांनीही ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ला आपली पसंती दर्शवली. चोहोबाजुंनी असा कौतुकाचा वर्षाव होत असतानाच परदेशातही या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अमेरिकेत या चित्रपटाचे १०० शोज ‘हाऊसफुल’च्या दिशेने वाटचाल करत आहेत तर चित्रपटाला अनेकांनी ५ स्टार्स दिले आहेत. त्यामुळे हा चित्रपट ग्लोबलीही ‘सुपरहिट’चे बिरुद मिरवत आहे. इतकेच नाही तर हा चित्रपट दुबई, लंडन आणि जर्मनीमध्येही प्रदर्शित होणार आहे.

या यशाबद्दल दिग्दर्शक योगेश देशपांडे म्हणतात, ” परदेशात चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच काही शोज हाऊसफुल्ल झाले होते. महाराष्ट्रात उत्तम प्रतिसाद मिळत असतानाच परदेशातील प्रेक्षकही इतके प्रेम या चित्रपटावर करत आहेत, हे खरंच भारावणारे आहे. बाबूजी हे नावच इतके मोठे आहे की, त्यांची ख्याती जगभरात आहे. आजही त्यांची गाणी अजरामर आहेत. तरुणाईही त्यांची गाणी तितक्याच आत्मीयतेने ऐकते. चित्रपटाबद्दल अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. सगळ्याच कलाकारांचे कौतुक होत आहे. एका टीमला यापेक्षा जास्त काय हवे. मी सगळ्याच प्रेक्षकांचा मनापासून आभारी आहे.”

सौरभ गाडगीळ प्रस्तुत रिडिफाईन प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे सौरभ गाडगीळ आणि योगेश देशपांडे निर्माते आहेत. तर चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन योगेश देशपांडे यांचे आहे. ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटात सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, आदिश वैद्य, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर, शरद पोंक्षे, उदय सबनीस, चिन्मय पटवर्धन, निखिल राऊत, विभावरी देशपांडे, धीरेश जोशी, परितोष प्रधान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

जगातील सर्वात लहान गायक अब्दू रोजिक करणार लग्न! शारजाहमधील या मुलीशी करणार लग्न
जस्टिन बीबर लवकरच करणार पहिल्या बाळाचे स्वागत, सोशल मीडियावर केली घोषणा

हे देखील वाचा