Wednesday, July 3, 2024

अभिनेत्री स्वाती सतीशचा चुकीच्या सर्जरीचा आरोप, पण डॉक्टर तर म्हणाले…

कन्नड अभिनेत्री आणि टीव्ही अँकर स्वाती सतीश (Swati Sathish) सध्या शस्त्रक्रियेच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. अलीकडेच तिचा एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तिचा चेहरा पूर्णपणे सुजला होता आणि त्या फोटोमध्ये तिला ओळखणेही कठीण होत होते. खरं तर स्वातीने २९ मे रोजी रूट कॅनल सर्जरी केली होती. चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे चेहरा खराब झाल्याचा आरोप तिने केला. स्वातीने ओरिक्स डेंटल मल्टीस्पेशालिटी डेंटल सेंटरमधून रूट कॅनल शस्त्रक्रिया केली होती. शस्त्रक्रियेनंतर ती चेहऱ्यावर सूज आणि वेदनांनी त्रस्त आहे. सध्या तिच्यावर इतर डॉक्टरांकडून उपचार सुरू असून, ती बरी होत आहे.

स्वातीने प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितले की, “माझी तब्येत बरी होत असली, तरी माझ्या ओठांवर अजूनही खूप सूज आहे. मला नीट हसताही येत नाही. २३ दिवस झाले, पण माझे ओठ बरे झाले नाहीत. माझे डॉक्टर म्हणतात की, ओठांना त्यांच्या सामान्य आकारात येण्यासाठी दोन आठवडे ते एक महिना लागेल. चुकीच्या उपचारांमुळे माझी रूट कॅनल शस्त्रक्रियाही पूर्ण होऊ शकली नाही.” (swathi satish alleges negligence after root canal surgery dentist speaks up against the claims)

स्वातीने रूट कॅनल सर्जरीच्या चुकीच्या उपचाराबाबत विचारले असता, तिने सांगितले की डॉ. धनंजय यांच्या पत्नी डॉ. मयुरी यांनी तिच्या चुकीचे उपचार केले. ती म्हणाली की, “मी उपचारासाठी दुसऱ्या डॉक्टरकडे गेल्यावर मला याची माहिती मिळाली. रूट कॅनल शस्त्रक्रियेदरम्यान मला प्रथम सोडियम हायपोक्लोराईटचे इंजेक्शन देण्यात आले. यानंतर भूल देण्याचे इंजेक्शन देण्यात आले. इतर डॉक्टरांच्या मते, आधी भूल दिली जाते आणि नंतर सोडियम हायपोक्लोराईट.”

दुसरीकडे डेंटल क्लिनिकचे मालक डॉ.धनंजय संजय यांनी दावा केला आहे की, “माझ्याकडे क्लिनिकचे सीसीटीव्ही फुटेज आहे. शस्त्रक्रिया योग्य प्रकारे झाली आणि सोडियम हायपोक्लोराइटच्या आधी भूल देण्यात आली, याचा पुरावा आहे. सोडियम हायपोक्लोराईटचे इंजेक्शन तिच्या त्वचेवर पसरले असून, त्यामुळे सूज येण्याची शक्यता आहे. हा प्रकार अगदी सामान्य आहे. यासाठी आम्ही योग्य औषधे आणि काही एंटी-बायोटिक्स देतो. आम्ही समजतो की, अशा परिस्थितीत रुग्ण खूप तणावाखाली असतात. परंतु आम्ही त्यांना मदत करू शकत नाही, कारण ते आमची मदत घेण्यास तयार नाहीत.”

स्वातीच्या आरोपानंतर घटले क्लिनिकचे रेटिंग
डॉक्टर संजय सांगतात की, “स्वाती सतीश यांनी जाहीरपणे लोकांना माझ्या क्लिनिकमध्ये न येण्याचा सल्ला दिला होता. यामुळे मलाही खूप त्रास सहन करावा लागला. १ तासात माझे फाइव्ह स्टार रेटिंग एकवर पोहचले. मला वेबसाइटवरून माझ्या क्लिनिकचा पत्ता देखील काढावा लागला. हा मोठा वाद होऊ नये, असे मला स्वतःला वाटते. पण जर तिला (स्वाती) कायदेशीर मार्ग स्वीकारायचा असेल, तर मीही त्यासाठी तयार आहे. कारण माझ्याकडे सर्व पुरावे आहेत जे असायला हवेत.”

कायदेशीर कारवाईवर स्वाती काय म्हणाली?
दुसरीकडे, स्वाती सतीशचा दावा आहे की, डॉक्टरांच्या चुकीमुळे तिचेही मोठे नुकसान झाले आहे. तिला घराबाहेर पडता येत नाही. तसेच चेहरा खराब झाल्याने अनेक प्रकल्पही हाताबाहेर गेल्याचे स्वाती म्हणाली. मात्र स्वातीला क्लिनिकवर कारवाई करण्याबाबत विचारले असता, तिने याबाबत लवकरच सांगेन, असे उत्तर दिले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा