दिग्गज भारतीय महिला क्रिकेटपटूवर येत असलेल्या ‘या’ चित्रपटासाठी तापसीने सुरु केला क्रिकेटचा सराव


हिंदी सिनेसृष्टीतील दमदार अभिनेत्री म्हणजे तापसी पन्नू. तापसीने तिच्या जिवंत आणि प्रभावी अभिनयाने प्रेक्षांकांसोबतच समीक्षकांचीही मने जिंकली. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी ते हिंदी सिनेसृष्टी असा प्रवास करणाऱ्या ह्या अभिनेत्रीने तिच्या तगड्या अभिनयाने प्रचंड वाहवा मिळवली आहे. खूपच कमी कालावधीत तिने स्वतःला सशक्त अभिनेत्री म्हणून सिद्ध केले आहे. प्रत्येक सिनेमात तिने तिच्या अभिनयाची ताकद अधिक वाढवली. तापसी जितकी बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाली तितकीच ती साऊथमध्ये देखील लोकप्रिय होती.

आगामी काळात तापसी आपल्याला अनेक सिनेमांमध्ये दिसणार आहे. काही सिनेमांची शूटिंग पूर्ण झाली तर काही सिनेमांच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. असाच एक सिनेमा म्हणजे ‘शाबास मिट्टू’.

नवीन वर्ष सुरु झाले आणि चित्रपटांच्या शूटिंगला प्रचंड वेग आला आहे. जवळपास सर्वच चित्रपटांच्या शूटिंग चालू झाल्या आहेत. तापसीने देखील तिच्या ‘शाबास मिट्टू’ चित्रपटाच्या तयारीला सुरुवात केली आहे. तापसीचा हा सिनेमा, भारतीय महिला क्रिकेट टीमची कॅप्टन मिताली राजची बायोपिक असणार आहे. तापसी यात मितालीची भूमिका साकारताना दिसणार आहे.

यासाठी तापसीने क्रिकेटचे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली आहे. तिच्या प्रशिक्षणाचा एक फोटो तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेयर केला आहे. यात ती हातात बॅट घेऊन शॉट मारण्याच्या तयारीत दिसत आहे. हा फोटो शेयर करताना तिने लिहिले, “…आणि बॅट, बॉलसोबत माझा रोमान्स सुरु झाला आहे. प्रवास खूप लांबचा आहे, मात्र जर सुरुवात चांगली झाली तर समजायचे अर्धे काम झाले. हा सिनेमा एक मैलाचा दगड ठरणार आहे.”

तापसीला क्रिकेटचे प्रशिक्षण कोच नूशीन अल खदीर ह्या देत आहे. तापसीने सांगितले की, ” मी क्रिकेटची खूप मोठी फॅन आणि एक चांगली दर्शक आहे. पण यापूर्वी मी कधीही क्रिकेट खेळ खेळाला नाहीये. आता माझ्यासाठी क्रिकेट खेळणे हे एक आव्हान असणार आहे. मात्र मला असे वाटते की, मी दबावामध्ये १०० टक्के देऊ शकते, आणि हीच गोष्ट माझ्यात आणि मितालीमध्ये सारखी आहे.” राहुल ढोलकीच्या यांचे दिग्दर्शन असलेला हा सिनेमा प्रिया अवेन यांनी लिहिला आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.