Monday, February 9, 2026
Home मराठी ‘बालभारती’च्या आठवणींना उजाळा देणारं खास गाणं ‘बालभारती गीत’ प्रेक्षकांच्या भेटीला

‘बालभारती’च्या आठवणींना उजाळा देणारं खास गाणं ‘बालभारती गीत’ प्रेक्षकांच्या भेटीला

बालभारतीच्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त ‘बालभारती गीत’ हे खास भावस्पर्शी गीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अनेक पिढ्यांच्या बालपणाचा अविभाज्य भाग असलेल्या बालभारतीच्या पुस्तकांशी जोडलेल्या आठवणी, भावना आणि संस्कार या गीतातून सुंदरपणे उलगडण्यात आले आहेत.

या गाण्याला लोकप्रिय गायिका वैशाली सामंत यांचा आवाज लाभला असून, अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte)यांचं संगीत आणि दासू वैद्य यांचे शब्द या गाण्याला लाभले आहेत. या गीतासाठी बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक यांचे मार्गदर्शन लाभले असून संकल्पना किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांची आहे.

बालभारती नाव उच्चारताच मनात दरवळणारा पुस्तकांचा सुगंध, मुखपृष्ठांवरील बोलकी चित्रं, कवितांच्या ओळींमधून मिळालेली भाषेची पहिली ओळख आणि संस्कारक्षम दृष्टी या सगळ्याच भावना या गीतातून प्रत्ययास येतात. हे गाणं पाहाताना आणि ऐकताना रसिक नकळत आपल्या शाळेच्या दिवसांत, बालपणाच्या आठवणींत हरवून जातील. एकवीरा म्युझिकवर हे ‘बालभारती गीत’ उपलब्ध असून, त्याचं सादरीकरण एकविरा म्युझिक युट्युब चॅनेलवर पाहायलाही तितकंच सुंदर आणि भावनिक ठरत आहे.

बालभारती संचालिका अनुराधा ओक म्हणतात, ‘’‘बालभारती ही केवळ पुस्तकांची मालिका नाही, तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला पहिला संस्कारक्षम स्पर्श आहे. या गीतातून त्या आठवणी, तो कोवळा उजेड आणि बालपणाची निरागस भावना जशीच्या तशी जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. प्रत्येक प्रेक्षकाला हे गीत पाहाताना स्वतःचं बालपण पुन्हा एकदा अनुभवता यावे, हीच इच्छा आहे.”

बालभारतीच्या पुस्तकांनी दिलेल्या संस्कारांचा, कल्पनाशक्तीचा आणि ज्ञानप्रवासाचा हा सांगीतिक उत्सव प्रेक्षकांच्या मनात नक्कीच घर करेल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा  

दीपिका पादुकोणनंतर, एका ज्येष्ठ अभिनेत्याने दिग्दर्शका सोबतच्या वादामळे सोडला ‘स्पिरिट’ चित्रपट ?

हे देखील वाचा