Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

The Kashmir Files| केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली चित्रपटावर प्रतिक्रिया, साधला काँग्रेसवर निशाणा

देशभरात प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आलेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाची जादू अजूनही प्रेक्षकांमध्ये कायम आहे. हा चित्रपट पहिल्या दिवसापासून कमाईचे नवनवीन रेकॉर्ड बनवताना दिसत आहे. तर दुसरीकडे अनेक नामवंत मंडळी या चित्रपटावर आपली प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. दरम्यान, आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी शनिवारी (२६ मार्च) या चित्रपटावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अमित शाह म्हणाले की, काँग्रेसच्या राजवटीत काश्मीर खोऱ्यात कसे अत्याचार आणि दहशतवाद पसरला हे जाणून घेण्यासाठी लोकांनी काश्मीर फाईल्स हा चित्रपट पाहावा.

अहमदाबाद महानगरपालिकेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्र्यांनी या चित्रपटावर आपले मत मांडले. यावेळी ते म्हणाले की, “ज्यांनी हा चित्रपट पाहिला नाही, त्यांनी काँग्रेसच्या काळात काश्मीरमध्ये अत्याचार आणि दहशत कशी पसरली हे जाणून घेण्यासाठी हा चित्रपट पाहावा.”

ते पुढे म्हणाले की, “जेव्हा तुम्ही सर्वांनी नरेंद्र मोदींना दुसऱ्यांदा पंतप्रधान केले, तेव्हा त्यांनी ५ ऑगस्ट २०१९ रोजी काश्मीरमधून कलम ३७० हटवले. ज्या क्षणी नरेंद्रभाईंनी असे करण्याचा निर्णय घेतला. त्या क्षणी देशाच्या लक्षात आले की, नरेंद्र मोदींसारखा प्रबळ इच्छाशक्ती असलेला नेता जेव्हा देशाचे नेतृत्व करतो तेव्हा काहीही अशक्य नाही.”

विशेष म्हणजे, हा चित्रपट देशभरातील लोकांना खूप आवडला आहे. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत आतापर्यंत अनेक विक्रम केले आहेत. एवढेच नाही, तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या चित्रपटाचे कौतुक केले आहे. या चित्रपटावर चर्चा करताना पंतप्रधान म्हणाले होते की, या चित्रपटाने अनेक वर्षांपासून जे सत्य दडपण्याचा प्रयत्न केला जात होता, ते दाखवले आहे.

चित्रपटाबद्दल बोलायचे झाले, तर ११ मार्च रोजी प्रदर्शित झालेला विवेक रंजन अग्निहोत्रीचा चित्रपट काश्मिरी पंडितांवर आधारित आहे. १९९० च्या दशकात काश्मीरमध्ये झालेला नरसंहार आणि काश्मिरी पंडितांचे पलायन याभोवती चित्रपटाची कथा फिरते. अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, मृणाल कुलकर्णी यांसारखे कलाकार या चित्रपटात दिसले आहेत. दुसरीकडे, जर आपण कलेक्शनबद्दल बोलायच झाले, तर या चित्रपटाने जगभरात २०० कोटींहून अधिक कमाई केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा