Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड ‘मी हिंदुस्तानी मुलगी…’, म्हणत लंडनच्या थेटरात किस करू पाहणाऱ्या परदेशी अभिनेत्याला सुनावणारी निम्मी

‘मी हिंदुस्तानी मुलगी…’, म्हणत लंडनच्या थेटरात किस करू पाहणाऱ्या परदेशी अभिनेत्याला सुनावणारी निम्मी

असं म्हणतात की, एखाद्याला खूप मान-सन्मान, प्रसिद्धी मिळाली की त्याला भलताच गर्व होतो, त्याचे पाय जमिनीवर राहत नाहीत. पण बॉलिवूडमध्ये एक अभिनेत्री होती, जिच्याकडे या सर्व गोष्टी असूनही ती नेहमीच जमिनीशी जोडलेली असायची. आग्रा सोडून मुंबईत आलेल्या या अभिनेत्रीला १९५० आणि ६०च्या दशकात एक अभिनेत्री म्हणून भरपूर प्रसिद्धी मिळालेली. आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत, ती अभिनेत्री म्हणजे निम्मी. निम्मीला सिनेमात घेण्यासाठी दिग्दर्शक कित्येक दिवस त्यांच्या होकाराची वाट पाहायचे, पण एवढी प्रसिद्धी मिळूनही निम्मी यांच्याकडून एक खूपच मोठी चूक झाली होती, ज्यामुळे त्यांच्या करिअरला उतरती कळा लागली. चला जाणून घेऊया काय होती ती चूक आणि यासोबतच निम्मी यांना ‘द अनकिस्ड गर्ल ऑफ इंडिया’ म्हणून का ओळखले जाऊ लागले.

दिनांक १८ फेब्रुवारी, १९३३ रोजी आग्रामध्ये जन्मलेली अभिनेत्री निम्मी यांचे खरे नाव होते नवाब बानो. परंतु त्यांचे चित्रपटात नाव ठेवण्यात आले होते, निम्मी. हे नाव त्यांना सुपरस्टार राज कपूर यांनी दिले होते. निम्मी यांची आई एक उत्तम गायिका तसेच एक उत्तम अभिनेत्री होत्या. वहिदन हे त्यांचे नाव होतं, तर वडील लष्करात कंत्राटदार होते. निम्मी केवळ ११ वर्षांच्या असताना, त्यांच्या आईचे निधन झाले. त्यानंतर त्यांना अबोटाबादमध्ये पाठवण्यात आलं. त्यांचे आजोबा खूप मोठे जमीनदार होते, पण निम्मी नंतर मुंबईला आल्या.

राज कपूरने त्यांच्या १९४९ सालच्या ‘बरसात’ या सिनेमातनं निम्मी यांना पहिला ब्रेक दिला होता. यानंतर निम्मी यांनी सिनेइंडस्ट्रीत एन्ट्री केली. यानंतर मात्र, तिच्यासमोर सिनेमांच्या ऑफरची लाईनच लागली. निम्मी या एक अशा अभिनेत्री होत्या, ज्या त्यांच्यानुसार सिनेमे निवडायचे. दिग्दर्शक कित्येक दिवस त्यांच्या ‘हो’ची वाट पाहायचे. निम्मी यांनी खूप नाव कमावलं होतं. त्यावेळी वृत्तपत्रांमध्ये ‘द अनकिस्ड गर्ल ऑफ इंडिया’ ही हेडलाईन प्रसिद्ध झाली. ते निम्मी यांच्यासाठीच होतं, आणि त्यामागे एक किस्सा होता.

सन १९५२ मध्ये ‘आन’ हा सिनेमा रिलीझ झाला होता. लंडनमधील रियाल्टो थिएटरमध्ये या सिनेमाच्या प्रीमिअरचं आयोजन केलं होतं. जिथं ‘आन’ सिनेमाला ‘सेवेज प्रिंसेस’ या नावानं प्रदर्शित केलं गेलं होतं. प्रीमियरमध्ये मेहबूब खान, त्यांची पत्नी आणि निम्मी उपस्थित होते. या सिनेमाच्या प्रीमियरमध्ये अनेक परदेशी कलाकार उपस्थित होते. त्या सेलिब्रिटींमध्ये एरल लेजली थॉमसन फ्लिनदेखील होते. एरल यांनी त्यांच्या विदेशी चालीरीतीनुसार पुढे जाताना, निम्मींच्या हाताला किस करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचवेळी अभिनेत्री दोन पावले मागे गेल्या. त्याचक्षणी निम्मी म्हणाल्या, “मी एक हिंदुस्तानी मुलगी आहे, तुम्ही माझ्याबरोबर हे सर्व करू शकत नाहीत.” मग काय दुसर्‍याच दिवशी वृत्तपत्राच्या हेडलाईनमध्ये निम्मीबद्दल लिहिले गेले की, ‘द अनकिस्ड गर्ल ऑफ इंडिया.’

तर असा होता ‘द अनकिस्ड गर्ल ऑफ इंडिया’चा किस्सा. पुढे १९६३ साली ‘मेरे मेहबूब’ सिनेमासाठी मुख्य अभिनेत्री शोधण्याचं काम सुरू होतं. दिग्दर्शन हरनाम सिंग यांना सिनेमातील मुख्य अभिनेत्री म्हणून निम्मी यांना कास्ट करायचं होतं, आणि त्यांनी ही भूमिका निम्मी यांना ऑफर केली होती, पण निम्मी यांनी मुख्य नायिकेची भूमिका घेण्यास नकार दिला होता. निम्मी यांना मुख्य अभिनेत्री आणि बिना रॉय यांना राजींदर कुमारच्या बहिणीच्या पात्रासाठी निवडलं होतं. तिथंच माशी शिंकली. निम्मी यांना वाटलं की, नायिकेच्या व्यक्तिरेखेपेक्षा बहिणीचं पात्र अधिक चांगलं आणि आवश्यक आहे. त्यांना फक्त असा विचार आला, आणि त्या बहिणीचीच भूमिका साकारण्यावर ठाम राहिल्या.

दिग्दर्शक हरनाम सिंग यांनी खूप समजूत काढूनही, निम्मी यांनी आपला हट्ट काही सोडला नाही, तेव्हा नाईलाजाने निम्मी यांना त्यांनी बहिणीचे पात्र दिले. तसेच मुख्य अभिनेत्रीसाठी अभिनेत्री साधना यांची सही घेतली गेली. हा सिनेमा रिलीझ झाला होता, आणि तेव्हा निम्मी यांचा विचार संपूर्ण उलट ठरला. हा सिनेमा हिट झाला, आणि साधना मुख्य अभिनेत्री म्हणून, नावारूपाला आली. ती पुढे आघाडीची नायिका बनली. प्रेक्षकांना साधना यांचे पात्र अधिक आवडले. बहिणीच्या भूमिकेतली निम्मीचं करिअर इथूनच खाली खाली गेलं.

‘मेरे मेहबूब’ हा सिनेमा हिट ठरला, आणि साधना एका रात्रीत स्टार बनल्या, तर त्याचवेळी पुढच्या सिनेमात निम्मी यांनाही या चुकीचा फटका सहन करावा लागला. त्यानंतर निम्मी यांनी अवघ्या ६ सिनेमात काम केलं आणि पुढे २५ मार्च, २०२० रोजी जगाला निरोप दिला.

तर अशाप्रकारे ‘द अनकिस्ड गर्ल ऑफ इंडिया’ निम्मी यांना चूक भलतीच महागात पडली होती. रंजक माहिती अशी की, निम्मी आणि मेहबूब खान यांचं चांगलंच पटायचं. मेहबूब यांचा १९५७ सालचा ‘मदर इंडिया’ हा सिनेमा ऑस्करसाठी पाठवलेला पहिला भारतीय सिनेमा होता. मात्र, या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सिनेमाला जेव्हा ऑस्कर मिळाला नाही, तेव्हा मेहबूब खान इतके दु:खी झाले होते की, त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. हा सिनेमा बनवण्यासाठी सुमारे ४० लाख रुपये खर्च झाले होते. त्यांना पैशांच्या तंगीचा सामना करावा लागला होता. जेव्हा अभिनेत्री निम्मी यांना हे समजले, तेव्हा त्यांनी साडीच्या पदराला नोटांचा बंडल बांधून मेहबूब यांचे ऑफिस गाठले. तसेच पैसे मॅनेजरच्या हातात ठेवून सांगितले की, “सिनेमा नक्की बनायला पाहिजे, पण प्लीज! मेहबूब साहेबांना सांगू नका की, हे पैसे निम्मीने दिलेत.”

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
जगाला वेड लावणाऱ्या ‘हॅरी पॉटर’मधील कलाकार सध्या काय करतात? एका क्लिकवर मिळेल माहिती
रोमान्स एकासोबत अन् लग्न दुसऱ्यासोबत, ‘या’ कलाकारांना काळजावर दगड ठेवत संपवावे लागले नाते
जेव्हा मिथुनदा आणि श्रीदेवीच्या किसींग सीनमुळे झालेला मोठा राडा, अभिनेत्रीने थेट पत्रकारांपुढेच…

हे देखील वाचा