Friday, April 25, 2025
Home कॅलेंडर अजय देवगण ते विद्या बालन, ‘या’ पाच सेलिब्रिटींनी आहेत दुर्धर आजार! तरीही अखंडपणे करतायत आपलं मनोरंजन!

अजय देवगण ते विद्या बालन, ‘या’ पाच सेलिब्रिटींनी आहेत दुर्धर आजार! तरीही अखंडपणे करतायत आपलं मनोरंजन!

बॉलिवूडच्या मोठ मोठ्या कलाकारांना आपण नेहमीच आनंदात आणि मजेत पाहत असतो. म्हणजे टीव्ही, सिनेमा या सारख्या माध्यमांमधून तरी ते आपल्याला आनंदातच दिसतात. पण आपल्याला दूर दूरपर्यंत याची माहिती नसते की ते किती मोठ्या आजाराशी झुंज देत असतात आणि हे सगळं दुखणं सहन करून ते त्यांचं काम करून आपलं मनोरंजन करत असतात. कोण कोण आहेत असे सेलिब्रिटी पाहुयात.

अजय देवगण
बॉलिवूडचा सिंघम अशी बिरुदावली मिरवणारा अष्टपैलू कलाकार अजय देवगण याला दोन वर्षांपूर्वी टेनिस एलबो या आजारानं ग्रासलं होतं. टोटल धमाल सिनेमाचं चित्रीकरण सुरू असताना अचानकपणे अजय खुर्चीवरून खाली कोसळला आणि होणाऱ्या त्रासामुळे जोरजोरात रडू लागला. त्याला त्यावेळी इतका त्रास होत होता की अजयला साधं कॉफी मग उचलणं देखील जमत नव्हतं. यानंतर अनिल कपूर याने अजयला उपचारांसाठी जर्मनीला जाण्याचा सल्ला दिला कारण अनिल कपूरला देखील काही वर्षांपूर्वी याच आजाराने ग्रासलं होतं. आता अजय या दुखपतीतून सावरला असून तो पुन्हा एकदा त्याच्या चित्रपटांच्या चित्रीकरणांमध्ये व्यस्त आहे.

काजल राघवाणी
काजल राघवाणी हे नाव भोजपुरी इंडस्ट्रीमधील एक मोठं नाव आहे. अनेक सुपरहिट सिनेमे या अभिनेत्रीने भोजपुरी इंडस्ट्रीला दिले आहेत. परंतु गेल्या काही वर्षांपासून काजल एका गंभीर आजाराने त्रस्त आहे. काजलला पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम या आजाराने ग्रासलं आहे ज्यामुळे तिचं वजन हे दिवसेंदिवस वाढतंच चाललं आहे. या आजारात महिलांमध्ये असंतुलित हार्मोन्स निर्मिती होत राहते. मुख्य म्हणजे या आजारामध्ये महिलेच्या अंडाशयामध्ये अनेक गाठींची निर्मिती होत असते. हा आजार मुख्यत्वे महिलांमध्येच जास्त आढळतो.

प्रियांका चोप्रा
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिला वयाच्या पाचव्या वर्षापासून अस्थमा म्हणजेच दम्याचा त्रास आहे. तिला सतत श्वास घ्यायला त्रास होतो. असं असतानाही ती आज बॉलीवूडमध्येच नव्हे तर हॉलिवूडमध्येही एक यशस्वी अभिनेत्री ठरली आहे. ती बऱ्याचदा अस्थमा या आजाराविषयीचे लोकांचे गैरसमज दूर करताना पाहायला मिळते.

सनी देओल
बॉलिवूडचा गदर बॉय सनी देओलला पाठीच्या दुखण्याचा गंभीर आजार आहे. २०१० मध्ये यमला पगला दिवाना चित्रपटाच्या सेटवर अचानक हा त्रास जाणवू लागला. या नंतर सनीने नियमित योगा आणि फिजिओथेरपीच्या माध्यमातून या दुखण्यावर नियंत्रण मिळवलं आहे आणि आता तो पुन्हा आपल्या चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त झाला आहे.

विद्या बालन
बॉलिवूडमध्ये ताकदीच्या स्त्री भूमिका जर आजच्या घडीला कुठली अभिनेत्री साकारत असेल तर ती विद्या बालन आहे. पण आपल्याला ठाऊक आहे का की विद्या बालन एका दुर्धर आजाराने त्रस्त आहे. विद्या ओब्सेसिव्ह कंपलसिव्ह डिसऑर्डरने ग्रस्त आहे. या आजारामध्ये व्यक्तीचं मन सतत त्याला कुठल्या ना कुठल्या गोष्टीकडे खेचत राहतं. इतकं असून सुद्धा आपल्याला विद्या विना तक्रार चित्रपटांमधून मनोरंजन करताना दिसतेय.

हे देखील वाचा