Monday, July 1, 2024

अभिनेते नाहीत तरीही यांच्याशिवाय बॉलिवूडचं पानही हालत नाही, पाहा कोण आहेत ‘ते’ दिग्गज

प्रेक्षकांचं कसं असतं ना… एखादा बॉलिवूड सिनेमा आला आणि तो हिट झाला, तर त्याची वाहवा ते करतात. तेव्हा त्यांना सिनेमात झळकणाऱ्या कलाकारांचा अभिनय दिसतो. पण कलाकारांच्या अभिनयासोबतच त्यांचा मेकअप, त्यांची हेअरस्टाईल, त्यांचे कपडे, त्यांनी परिधान केलेली ज्वेलरी या गोष्टीही सिनेमे हिट होण्यास कारणीभूत असतात. यापैकी एक गोष्ट जरी नसली, तरी बॉलिवूड सिनेमांचं आख्खं काम रखडते. पण मग या सर्व गोष्टी बॉलिवूडला कोण पुरवतं…? हे तुम्हाला माहितीये का? माहिती नसेल, तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहे.

यादीत अव्वल क्रमांकावर आहे मेकअप आर्टिस्ट नम्रता सोनी
बॉलिवूड कलाकार रुपेरी पडद्यावर सुंदर दिसतात, त्यामागे असते मेकअप आर्टिस्टची मेहनत. कलाकाराला पडद्यावर इतरांपेक्षा वेगळं दाखवण्याचं कसब त्यांच्यात असतं. ही जबाबदारी पार पाडणारी आघाडीची मेकअप आर्टिस्ट म्हणजे नम्रता सोनी. नम्रताने जगातील आघाडीच्या पब्लिकेशन्ससोबत काम केलंय. त्यात वोग, एल ऑफिशियल, एले, हार्पर बझार, फेमिना यांचा समावेश होतो. त्याचबरोबर तिने ओम शांती ओम, कभी अलविदा ना केहना, मैं हूं ना, सलाम नमस्ते, आयशा आणि अशा बऱ्याच सिनेमात आपल्या मेकअपची कमाल दाखवून दिलीये. विशेष म्हणजे आघाडीची मेकअप आर्टिस्ट असलेल्या नम्रताला लहानपणी पायलट किंवा वकील बनायचं होतं, पण आईच्या ड्रेस आणि मेकअपने तिला भुरळ घातली. त्यामुळे तिचा मेकअपमधील रस वाढत गेला. आज ती करिअरच्या शिखरावर आहे.

आलिम हकीम
बॉलिवूडमधील बड्या बड्या अभिनेत्यांना जेव्हा आपल्या केसांची स्टाईल करायची असते, तेव्हा त्यांना आठवतो आलिम हकीम. आलिम हा प्रसिद्ध हेअर स्टायलिस्टपैकी एक आहे. विशेष म्हणजे आलिमचे वडीलदेखील हेअर स्टायलिस्ट होते. ते उत्तर प्रदेशातील कैराना येथील होते. त्यांनी राजेश खन्ना, अमिताभ बच्चन आणि इतर अनेक कलाकारांची हेअरस्टाईल केली होती. आलिम ९ वर्षांचा असताना, त्यांचे निधन झाले होते. पुढे काळ लोटत गेल्यानंतर आपल्या करिअरबद्दल चिंतेत असलेला आलिम २० वर्षांनंतर या क्षेत्रात आला. त्याला त्याच्या आवडीबद्दल समजलं होतं. म्हणून त्याने लंडन आणि ऑस्ट्रियासारख्या वेगवेगळ्या देशांच्या स्टायलिंग संस्कृतीचा अभ्यास करायला सुरुवात केली. तो दररोज वेगळ्या प्रकारची स्टाईल करायचा. सुरुवातीला त्याने दोन सीटर सलून सुरू केले आणि हळूहळू त्याच्या मेहनतीमुळे तो सेलिब्रिटी स्टायलिस्ट बनला. क्रिकेटर्सपासून ते बॉलिवूड कलाकारांपर्यंत सगळे त्याचे गिऱ्हाईक आहेत. त्याने विराट कोहली, सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, युवराज सिंग, संजय दत्त, बॉबी देओल, फरदीन खान यांसारख्या अनेक सेलिब्रिटींची हेअर स्टाईल केलीय. आज त्याचे सलून वांद्रेसह देशातील मेट्रो सिटीत आणि परदेशातही आहेत.

मनीष मल्होत्रा –
कलाकारांना महागडे कपडे पुरवण्याचं काम करणाऱ्या प्रसिद्ध फॅशन डिझायनरपैकी एक म्हणजे मनीष मल्होत्रा. अभिनेत्यांचा सूट- शेरवानी असो किंवा अभिनेत्रींचा लेहंगा. त्यासाठी कलाकार मनीषचंच दार ठोठावतात. मनीषने पहिल्यांदा १९९८ साली त्याचं पहिलं बूटीक सुरू केलं होतं. तसेच स्वर्ग सिनेमात जुही चावलासाठी कपडे डिझायनिंग करणे हा त्याचा पहिला प्रोजेक्ट होता. तो आता इतका प्रसिद्ध फॅशन डिझायनर बनलाय की, त्याने तयार केलेला लेहंगाच ७-८ लाखांचा असतो. जशी मागणी असेल, त्यानुसार त्याचे महागडे रेट असतात. विशेष म्हणजे मनीषने आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्ससाठी त्यांची जर्सीदेखील डिझाइन केलीये. मनीषला फॅशन डिझायनरसोबतच चित्रपट निर्माताही बनायचंय.

डब्बू रत्नानी –
कलाकारांचं फोटोशूट करायचंय आणि त्यासाठी प्रोफेशनल फोटोग्राफर हवा असेल, तर सर्वांच्या तोंडात एकच नाव येतं. ते म्हणजे डब्बू रत्नानी. डब्बूने आतापर्यंत अनेक बॉलिवूड कलाकारांचे फोटोशूट केले आहे. तेही साधं-सुधं फोटोशूट नाही, तर बॅकलेस, टॉपलेस, आणि असे बरेच काही. त्यांच्या सोशल मीडियावर एक नजर टाकली, तर आपल्याला त्यावर कलाकारांचे फोटोच फोटो पाहायला मिळतील. तो त्याच्या वार्षिक कॅलेंडरसाठी विशेष प्रसिद्ध आहे. मागील काही वर्षांपासून बॉलिवूड कलाकार त्याच्या कॅलेंडरमध्ये दिसतायत. १९९४ पासून स्वतंत्रपणे काम करणारा डब्बू रत्नानी आज आघाडीचा फॅशन फोटोग्राफर आहे.

सब्यासाची मुखर्जी –
सब्यसाची मुखर्जी एक भारतीय फॅशन डिझायनर, ज्वेलरी डिझायनर आहे. १९९९ पासून, त्याने सब्यासाची लेबलखाली वापरून आपण डिझाइन केलेल्या गोष्टी विकल्यात. तो फॅशन डिझाईन काऊन्सिल ऑफ इंडियाच्या असोसिएट डिझायनर सदस्यांपैकी एक आहे. तसेच तो भारतीय सिनेमाच्या राष्ट्रीय संग्रहालय मंडळाचा सर्वात तरुण सदस्य आहेत. त्याने ‘गुजारिश’, ‘बाबुल’, ‘लगा चुनरी में दाग’, ‘रावण’ आणि ‘इंग्लिश विंग्लिश’ यांसारख्या बॉलीवूड सिनेमांसाठी कपडे डिझाइन केले आहेत. याव्यतिरिक्त त्याने विराट कोहली आणि अनुष्काच्या लग्नाचे कपडेही डिझाइन केले होते. नुकत्याच लग्नाच्या बेडीत अडकलेल्या कॅटरिना कैफचे मंगळसूत्र डिझाइन केलं होतं.

हे देखील वाचा