साऊथ इंडस्ट्री तशी मोठीच. इथे साऊथचे कलाकार पैसापाणी वगैरे चांगलाच छापतात. पण बॉलिवूडची गणना जगातल्या सर्वोत्तम सिनेमा इंडस्ट्रींमध्ये होते. त्यामुळे साऊथ इंडस्ट्रीतील कलाकारांनाही बॉलिवूडमध्ये जाऊन आपल्या अभिनयाचा जलवा दाखवण्याची इच्छा ही असतेच असते. तसं पाहिलं, तर टॉलिवूडच्या काही कलाकारांनी बॉलिवूड दणाणून सोडलंय, पण त्यात काही कलाकार मोजकेच सिनेमे देऊन पुन्हा आपल्या साऊथ इंडस्ट्रीत परतलेत, तर आता तुम्हाला आपल्या व्हिडिओचा विषय समजलाच असेल, नाही का?? तर आपला विषय आहे, टॉलिवूडमधील असे कलाकार ज्यांनी बॉलिवूडमध्येही काम केलंय. कोण आहेत ते कलाकार जाणून घेऊया या लेखातून…
रजनीकांत
यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत थलायवा म्हणून ओळखले जाणारे सुपरस्टार रजनीकांत. रजनीकांत यांचाच तर विषय निराळा. साऊथ इंडस्ट्री असो किंवा बॉलिवूड. दोन्हीमध्ये आपल्या अभिनयाचा डंका त्यांनी वाजवलाय. त्यांनी १९८३ मध्ये ‘अंधा कानून’ या सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. या सिनेमात त्यांनी सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलं होतं. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. त्यानंतर रजनीकांत यांनी अमिताभ यांच्यासोबत आणखी दोन सिनेमात काम केलं. त्यापैकी एक म्हणजे १९८५ सालचा ‘गिरफ्तार’ आणि दुसरा म्हणजे १९९१ सालचा मुकुल आनंदचा ‘हम’. याव्यतिरिक्त रजनीकांत यांनी बऱ्याच हिंदी सिनेमात काम केलं होतं. त्यात ‘आतंक ही आतंक’, ‘चालबाज’, ‘उत्तर दक्षिण’, ‘भगवान दादा’, ‘बेवफाई’ यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे. रजनीकांत हे आशियातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहेत.
कमल हासन
पुढचा क्रमांक लागतो ते म्हणजे सुपरस्टार कमल हासन यांचा. साऊथ इंडस्ट्री गाजवणाऱ्या कमल हासन यांनी १९८१ साली आलेल्या ‘एक दुजे के लिए’ या सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. पुढे त्यांनी ‘सदमा’, ‘सागर’ आणि ‘चाची ४२०’ सारख्या हिंदी सिनेमात काम केलंय. विशेष म्हणजे चार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि १९ फिल्मफेअर पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलंय. १९९४ मध्ये एका सिनेमासाठी १ कोटी रुपये मानधन घेणारे कमल हसन हे पहिला भारतीय अभिनेते ठरले होते. १९७०-१९८७ या काळात राजेश खन्ना हे एकटेच सर्वाधिक मानधन घेणारे भारतीय अभिनेते होते. त्यानंतर १९८०- १९८७ दरम्यान राजेश खन्ना यांच्यासोबत अमिताभ बच्चन हे सर्वाधिक मानधन घेणारे भारतीय अभिनेते होते. पुढे १९८८-१९९८ दरम्यान कमल हासन हे सर्वाधिक मानधन घेणारे एकमेव भारतीय अभिनेते बनले होते. त्यानंतर ते १९९९-२०१३ दरम्यान रजनीकांत यांच्यासोबत सर्वाधिक कमाई करणारे भारतीय अभिनेते म्हणून गणले गेले. कमल हासन यांच्या आवडत्या अभिनेत्यांमध्ये सुपरस्टार राजेश खन्ना यांचाही समावेश आहे.
प्रकाश राज
सर्वांच्या लक्षात राहणारा व्हिलन म्हणजे प्रकाश राज. प्रकाश राज यांना त्यांच्या नकारात्मक भूमिकेसाठी ओळखलं जातं. साऊथसोबतच बॉलिवूडमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडलीये. त्यांनी ‘खाकी’, ‘वाँटेड’, ‘सिंघम’, ‘बुड्ढा होगा तेरा बाप’, ‘गोलमाल अगेन’, ‘हीरोपंती’, ‘सिंग साहब द ग्रेट’, आणि ‘दबंग २’ यांसारख्या हिंदी सिनेमात काम केलंय. याव्यतिरिक्त त्यांच्या अभिनय करिअरबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी एकूण ४०० हून अधिक सिनेमात काम केलंय. त्यामुळं ते नेहमी मोठमोठ्या प्रोजेक्ट्समध्ये काम करणेच पसंत करतात. नुकताच प्रदर्शित झालेला अन्नाथे या सुपरहिट सिनेमातही रजनीकांत यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती.
आर माधवन
साऊथ अभिनेता आर माधवनला मॅडी हे नाव ज्या सिनेमानं दिलं तो सिनेमा म्हणजे २००१ साली रिलीझ झालेला ‘रेहना है तेरे दिल मैं’. याच सिनेमातून त्यानं बॉलिवूड पदार्पण केलं होतं. या सिनेमात त्याच्यासोबत दिया मिर्झा मुख्य भूमिकेत होती. सिनेमाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. त्यानंतर माधवन अनेक हिंदी सिनेमात झळकला. त्याने चॉकलेट बॉयपासून ते बॉक्सिंग प्रशिक्षकापर्यंत अनेक भूमिका साकारत आपला अस्सल अभिनय दाखवला. पुढे त्याने ‘रंग दे बसंती’, ‘३ इडियट्स’ आणि ‘तनु वेड्स मनू’ यांसारख्या उल्लेखनीय हिंदी सिनेमातही काम केलं. विशेष म्हणजे त्याचा ‘३ इडियट्स’ हा सिनेमा विशेष गाजला. यामध्ये त्याच्यासोबत आमिर खान, करीना कपूर आणि शर्मन जोशी मुख्य भूमिकेत होते.
धनुष
मारी भाई… हे नाव जरी घेतलं तरी लहान पोरांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत आता सर्वांच्या तोंडात येतं ते म्हणजे धनुषचं नाव. धनुष त्याच्या साऊथच्या सिनेमांसाठीच ओळखला जातो बरं का, पण हळूहळू साऊथचे कलाकार बॉलिवूडकडं वळताना दिसतायत. त्यात धनुषचाही समावेश आहेच. त्यानंं २०१३ साली आलेल्या आनंद एल राय यांच्या हिंदी सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केलं होतं. या सिनेमात त्याच्यासोबत सोनम कपूर होती. हा सिनेमा ३६ कोटींच्या बजेटमध्ये बनला होता. पण बॉक्स ऑफिसवर सिनेमानं धमालच केली. या सिनेमानं तब्बल ९४ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर धनुष दुसऱ्यांदा २०२१ रोजी रिलीझ झालेल्या ‘अतरंगी रे’ या सिनेमात झळकलाय. यामध्ये त्याच्यासोबत सुपरस्टार अक्षय कुमार आणि सारा अली खान हे मुख्य भूमिकेत होते.