सध्या दिल्लीमध्ये केंद्राच्या कृषीकायद्याविरोधात पंजाब, हरियाणा सोबत संपूर्ण देशातील शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला अनेक राजकीय पक्ष, नेते आणि कलाकारांनी देखील पाठिंबा दिला आहे. यात आता मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता हेमंत ढोमेने देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. हेमंत सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असतो. तो नेहमी आपली मत, विचार सोशल मीडियावर लिहून मांडत असतो. यावेळी देखील हेमंतने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारे ट्विट केले आहे.
हेमंतने त्याच्या ट्विटर हँडलवरून ट्विट करत शेतकऱ्यांना आपला पाठिंबा असल्याचे सांगितले. हेमंतने त्याच्या ट्विट मध्ये म्हटले आहे की, ” बळीराजा उद्वीग्न झालाय, तो ज्याने समाधानी होईल ते व्हायला हवं! पोशिंद्याच्या लढ्यात पक्ष, राजकारण या पलिकडे सारासार विचार होणं गरजेचं आहे! त्याला वारंवार रस्त्यावर उतरावं लागणार नाही यासाठी योजना हव्यात! माझ्या बापाला माझा पाठींबा असणारच!” यावेळी त्याने #Isupportfarmerprotest असा हॅशटॅग देखील वापरला.
हेमंत त्याच्या अभिनयासोबतच, लेखक आणि दिग्दर्शक सुद्धा करत असतो. हेमंतने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. ऑनलाइन बिनलाइन, बघतोस काय मुजरा कर, क्षणभर विश्रांती, पोश्टर गर्ल, आंधळी कोशिंबीर, बसस्टॉप आदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. हेमंतने टीव्ही वरील लोकप्रिय ‘फु बाई फु’ या कार्यक्रमात देखील स्पर्धक म्हणून भाग घेतला होता.
हेमंतच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो सध्या त्याच्या कलर्स मराठी वरील ‘चंद्र आहे साक्षीला’ मालिकेत दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी तो प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित चोरीचा मामला या सिनेमात झळकला होता. हेमंत लवकरच लोकेश गुप्ते यांच्या दिग्दर्शनात तयार होणाऱ्या सिनेमात दिसणार आहे. त्याचे लंडनमधील शूटिंग संपवून तो नुकताच परतला आहे. या सिनेमात त्याच्या सोबत सोनाली कुलकर्णी दिसणार आहे.