विवाहित असूनही राज बब्बर पडले होते ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात; पुढे अशाप्रकारे थाटला होता संसार


राज बब्बर हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीचे अभिनेते. त्यांनी ७०/८० चा काळात बॉलिवूडवर राज्य केले. त्यांच्या जिवंत आणि प्रभावी अभिनयाने खूप कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये त्यांनी स्वतःचे स्थान बळकट केले. बब्बर यांनी फक्त हिंदी नाही, तर अनेक पंजाबी सिनेमांमध्ये देखील काम केले. ते एकेवेळी खऱ्या अर्थाने बॉलिवूडमधील एक स्टार अभिनेता म्हणून ओळखले जात होते. बुधवारी (२३ जून) राज आपला ६९ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या जन्मदिनी आपण जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टींबद्दल. चला तर मग सुरुवात करूया… (Tragic Love Triangle of Raj Babbar And Nadira Babbar And Smita Patil Which Affected Many Lives)

दिनांक २३ जून, १९५२ ला राज बब्बर यांचा आग्र्यात जन्म झाला. त्यांनी ‘नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा’मधून अभिनयाचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी त्यांचा मोर्चा मुंबईकडे वळवला. १९७७ साली राज यांनी ‘किस्सा कुर्सी का’ चित्रपटातून त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यानंतर त्यांनी अनेक हिट सिनेमे हिंदी सिनेसृष्टीला दिले.

एकीकडे राज बब्बर यांचे चित्रपटांमधील करिअर गाजत असतानाच दुसरीकडे स्मिता पाटील यांच्यासोबत अफेअरच्या बातम्या येऊ लागल्याने त्यांचे खाजगी आयुष्यदेखील चर्चेत यायला सुरु झाले. कारण राज हे आधीच विवाहित असूनही त्यांचे स्मिता पाटील यांच्यासोबत नाव जोडले जात होते.

राज यांनी अभिनेत्री नादिरा बब्बर यांच्यासोबत १९७५ साली लग्न केले होते. त्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. राज बब्बर हे नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामध्ये शिकत असताना त्यांची भेट नादिरा यांच्यासोबत झाली. नादिरा राज यांना सिनियर होत्या. त्या नाटकांचे लिखाण आणि दिग्दर्शन करायच्या. राज यांना एकदा नादिरा यांच्या एका नाटकात काम करण्याची संधी मिळाली, त्यामुळे हे दोघं हळू हळू जवळ आले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. पुढे त्यांनी १९७५ साली लग्न केले.

लग्नानंतर राज आणि नादिरा दिल्लीमध्ये राहत होते. तेव्हाच त्यांना एक मुलगी झाली, त्यांनी तिचे नाव जुही ठेवले. जुहीच्या जन्मानंतर राज यांची परिवाराप्रती जबाबदारी जास्त वाढली. त्यासाठी त्यांनी अभिनयात काम मिळवण्यासाठी मुंबईला येण्याचे ठरवले. मुंबईला येण्याआधी त्यांनी त्यांची स्कूटर विकून मिळालेले सहा हजार रुपये नादिरा यांना खर्चासाठी देत मुंबई गाठली होती. मुंबईला आल्यानंतर राज यांनी त्यांच्या अभिनयाने सर्वांचे हृदय जिंकले आणि ते या इंडस्ट्रीमध्ये सेट झाले. त्यांचे बस्तान बसल्यावर त्यांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला मुंबईत बोलावून घेतले. त्यानंतर त्यांच्या मुलाचा आर्यचा जन्म झाला. आर्यन हा देखील अभिनय क्षेत्रात काम करत असून छोट्या मोठ्या भूमिकांमध्ये दिसतो.

राज यांना चित्रपटांमध्ये यश मिळत असल्याने, त्यांचे जीवन सुरळीत चालू होते. मात्र अशातच त्यांच्या आयुष्यात एन्ट्री झाली ती स्मिता पाटील यांची. राज आणि स्मिता यांची पहिली भेट १९८२ साली आलेल्या ‘भिगी पलके’ चित्रपटाच्या सेटवर झाली. या सिनेमात हे दोघे मुख्य भूमिका साकारत होते.

राज यांनी त्यांच्या या भेटीबद्दल एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, ‘आम्ही या सिनेमाचे चित्रीकरण उडिसाच्या राउरकेला मध्ये करत होतो. आमच्या पहिल्या भेटीनंतर आम्ही एकमेकांसोबत खूप धमाल मस्त करायचो, मात्र आमच्यात एकदा थोडे भांडण देखील झाले होते.’ पण स्मिता राज यांना आवडायला लागल्या. काही काळाने राज आणि स्मिता यांची प्रेमकहाणी सुरु झाली.

इकडे जेव्हा नादिरा यांना राज आणि स्मिता यांच्या नात्याबद्दल समजले, तेव्हा त्या पूर्णतः कोलमडल्या होत्या. त्यांना विश्वासच बसत नव्हता की, राज असे काही करू शकतात. एका मुलाखतीमध्ये नादिरा यांनी सांगितले होते की, ‘राज यांच्या तोंडून ऐकल्यावरवरही माझा या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. मी आतून पूर्ण तुटली होती. मात्र, आपल्याला दोन मुलं असल्याची जाणीव मला झाली आणि मी स्वतःला सावरले. मग मी माझ्या मुलांमध्ये आणि नाटकांमध्ये व्यस्त झाले. पण मी राज यांना स्वतः पासून वेगळे केले नाही.’

राज आणि नादिरा वेगळे तर झाले. मात्र, स्मिता यांच्याशी लग्न करणे वाटते तितके सोपे नव्हते. राज तर लग्नासाठी पूर्णपणे तयार होते. मात्र, स्मिताच्या घरून या लग्नाला कडाडून विरोध झाला. एका विवाहित आणि दोन मुलं असणाऱ्या व्यक्तीसोबत स्मिताला लग्न करण्यासाठी त्यांच्या घरून खूप नकार आले. पण, स्मिता यांना देखील राज बब्बर यांच्यासोबत लग्न करायचे होते. त्यांनी त्यांच्या घरातल्या लोकांचे देखील काहीच ऐकले नाही आणि राज यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

राज बब्बर यांच्याशी लग्न केल्यानंतर स्मिता यांच्यावर खूप टीकाही झाली. स्मिता यांनी नादिराचा संसार मोडला, असे लोकांचे म्हणणे होते. पण स्मिता यांच्यावर या सर्व गोष्टींचा काही फरक पडला नाही. तसेच राज यांनी देखील आपल्या दोन्ही कुटुंबात योग्य संतुलन ठेवले होते. लग्नानंतर काही काळाने स्मिता गर्भवती राहिल्या. त्यानी १३ डिसेंबर, १९८६ साली मुलाला जन्म दिला. त्या मुलाचे नाव प्रतीक. मात्र, प्रसूतीच्या वेळी काही समस्या निर्माण झाल्या, ज्यामुळे स्मिता यांची तब्येत खालवायला लागली आणि त्यातच त्यांनी वयाच्या ३१ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.

स्मिता पाटील यांच्या निधनानंतर राज खूप एकटे पडले. मात्र, तेव्हा पुन्हा नादिरा यांनी त्यांना साथ देत प्रतीकला सांभाळले. प्रतीकला नादिरा स्वतःच्या मुलाप्रमाणेच सांभाळत होत्या.

मात्र, स्मिताच्या घरच्यांना त्यांच्यावर विश्वास नसल्याने त्यांनी प्रतीकला त्यांच्याकडेच ठेऊन घेत त्याचा सांभाळ केला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-केवळ ५०० रुपये घेऊन मुंबईत आलेल्या मकरंद अनासपुरेंची नाना पाटेकरांनी केली होती मोलाची मदत; वाचा त्यांची संघर्षमय कहाणी

-मानधनाच्या बाबतीत थालापती विजय रजनींकातलाही देतो टक्कर, कुण्या अभिनेत्रीसोबत नाही, तर चक्क फॅनसोबत केलंय लग्न

-अमरीश पुरी स्मृतिदिन: भारदस्त आवाज, दमदार संवाद, नायकावरही भारी पडणारा असा हा खलनायक पुन्हा होणे नाही


Leave A Reply

Your email address will not be published.