कुणी फळविक्री केली तर कुणी केली आत्महत्या… कोरोना काळात या कलाकारांना करावा लागला आर्थिक संकटांचा सामना!


मंडळी, अखेर २०२० हे वर्ष आता सरणार आहे. आपल्या सर्वांचं निम्मं वर्ष हे लॉकडाऊनमध्येच गेलं. काहींना तर मार्च नंतरच संपूर्ण वर्षच लॉकडाऊनमुळे घरातच घालवावं लागलं. पण अखेर हे वर्ष आता सरत आहे. या वर्षात अनेक गोष्टी घडल्या, वाईटच जास्त घडल्या म्हणा! अनेक क्षेत्रातील अनेक लोकांना याचा फटका बसला परंतु आज आपण कलाक्षेत्रातील आशा व्यक्तींबाबत जाणून घेणार आहोत ज्याचं लॉकडाऊनपूर्वी सिनेसृष्टीत उत्तम काम सुरू होतं परंतु लॉकडाऊनच्या या काळात त्यांना चित्रीकरण बंद असल्याने उदरनिर्वाहासाठी भाज्या, फळे विकावी लागली. काहींना तर इतक्या अडचणी आल्या ज्या न पेलवल्याने त्यांनी स्वतःचं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.

मनमित ग्रेवाल

मनमीत ग्रेवाल या ३२ वर्षीय अभिनेत्याने १५ मे रोजी आत्महत्या केली. त्याच्या मागील कामाचं अखेरचं पेमेंट न झाल्यामुळे त्याच्या समोर आर्थिक संकट उभं राहिलं होतं. त्याचा मित्र मनजित सिंह याने माध्यमांना सांगितलं होतं की काही दिवसांपूर्वी मनमीतच्या मित्रानेही पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली होती. तोदेखील आर्थिक संकटात सापडला होता. दोघांनी परदेशी सहलीसाठी कर्ज काढलं होतं आणि ते देण्यास हे दोघेही असमर्थ ठरले होते यामुळे दोघांनीही आपापलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.

आशिष रॉय

‘ससुराल सिमर का’ सारख्या टीव्ही मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारलेले अभिनेते आशिष रॉय यांचं २४ नोव्हेंबर रोजी मुंबईत निधन झालं. ५५ वर्षीय आशिष यांचं मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे निधन झालं. आशिष हे गेल्या काही वर्षांपासून किडनीच्या आजाराने ग्रासले होते आणि त्यांच्याकडे उपचारासाठी देखील पैसे नव्हते. गेल्या एका वर्षात त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अपील करून अनेकदा लोकांकडून उपचाराकरिता आर्थिक मदत घेतली होती.

रामवृक्ष गौर

बर्‍याच टीव्ही मलिकांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक केलेल्या रामवृक्ष गौर यांना काम नसल्यामुळे आजमगढमध्ये उदरनिर्वाहासाठी भाजीविक्री करणं भाग पडलं होतं. परंतु, आता त्यांनी हे काम बंद केलं आहे. राम यांच्या म्हणण्यानुसार, आता त्यांना भोजपुरी चित्रपटात काम मिळाले असून त्यात ते सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनच काम करत आहेत.

सोलंकी दिवाकर

दिवाकर हे आयुषमान खुरानाच्या ‘ड्रीमगर्ल’ आणि सुशांतसिंग राजपूतच्या ‘सोनचिडीया’ मध्ये दिसले होते. लॉकडाउन लागण्यापूर्वी दिवाकर, ऋषी कपूर यांच्यासमवेत ‘शर्मा जी नमकीन’ चित्रपटाचे शूटिंग करत होते पण चित्रपटाचे शूटिंग थांबले आणि दिवाकर यांना काहीच काम उरलं नाही. अशा परिस्थितीत त्यांनी दिल्लीत फळांची विक्री सुरू केली होती.

राजेश करीर

अलीकडे ‘बेगूसराय’ आणि ‘सीआयडी’ सारख्या टीव्ही शोमध्ये काम करणारे अभिनेते राजेश करीर यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी भावुक होऊन आर्थिक संकटांचा संदर्भ देऊन लोकांना मदतीचं आवाहन केलं होतं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की बर्‍याच लोकांनी राजेश करीर यांना आर्थिक मदत केली. गरजेपेक्षा जास्त मदत मिळू लागल्याने त्यांना पैसे पाठवणं बंद करा, माझ्या गरजेपुरते पैसे मला मिळाले आहेत हे सांगण्यासाठी दुसरा व्हिडीओ बनवावा लागला होता.

नुपूर अलंकार

‘स्वरागिनी’, ‘इस प्यार को क्या नाम दूं’, ‘दिया और बाती हम’, ‘अगले जनम मोहे बीटीया ही कीजो’ आणि ‘घर की लक्ष्मी बेटिया’ यासारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री नुपूर अलंकार यांनाही लॉकडाऊनमध्ये आर्थिक संकटांना सामोरं जावं लागलं होतं. त्यांच्या मैत्रीण सुप्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी एका फेसबुक पोस्टमध्ये याचा उल्लेख करून लोकांना नुपूरला आर्थिक मदत करण्याचं आवाहन केलं होतं. त्यांचे बरेच पैसे पीएमसी बँक मध्ये देखील अडकले असल्याचे समोर आले होते. रेणुका यांनी सांगितलं होतं की नुपूरकडे त्यांच्या आईवर उपचार करण्यासाठी देखील पैसे नाहीत, त्यानंतर अक्षय कुमार नुपूर यांच्या मदतीला धावून आला होता. याबद्दल नुपूर यांनी अक्षयचा मनापासून आभार देखील मानले होते.


Leave A Reply

Your email address will not be published.