स्मिता पाटील या जितक्या कुशाग्र बुद्धिमतेच्या स्वामी होत्या त्यामुळेच त्या ज्या गोष्टीला स्पर्श करीत तो परिसस्पर्श असे. त्यांनी नकळतपणे अभिनयात पाऊल टाकलं आणि फक्त दहा वर्षांची चित्रपट कारकीर्द परंतु अगदी दैदिप्यमान! कुणालाही हेवा वाटावी अशी… अशा या अभिनेत्रीची कधी काळी पाहिलेली स्वप्ने अपूर्णच राहिली आहेत.
आईला मोठा बंगला गिफ्ट करायचा होता:
स्मिता यांच्या आई विद्याताई पाटील यांची लग्नानंतर फारच फरफट झाली. फारच हालाखीचे दिवस होते. जेव्हा स्मिता यांचा जन्म झाला तेव्हा त्यांना नाईलाजास्तव हॉस्पिटल मध्ये नर्सचं काम करावं लागलं. स्मिता या जेव्हा लहानपणी त्यांच्या आईला इतकी मेहनत करताना पाहत असत तेव्हा त्या म्हणत की,’जेव्हा मी मोठी होईन तेव्हा मी तुला खूप सारे पैसे कमवून देईन.’ इतकंच नाही तर विद्याताईंना वृक्षलागवडीची फार आवड त्यामुळे स्मिता या त्यांच्या मतोश्रींसाठी एक गार्डन असणारा बंगलाच आई विद्याताईंना गिफ्ट करणार होत्या.
दिग्दर्शन करण्याचा त्यांचा मानस होता:
थोर दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या सोबत आपल्या कारकिर्दीची सुरुवात स्मिता पाटील यांनी केली. त्यांच्या अभिनय कौशल्याची स्तुती करताना बेनेगल साहेबांना कधीच शब्द अपुरे पडत नसत. परंतु ते स्मिता यांच्या आणखी एका गुप्त कौशल्याबद्दल देखील बोलत असत. ते नेहमी म्हणायचे की, ‘स्मिताचा अभिनयात तर हातखंडा आहेच परंतु तिच्या कडे दिग्दर्शकाची पारखी नजर देखील आहे. तिला दिग्दर्शन प्रक्रियेची उत्तम जाण आहे.’
स्मिता यांची देखील हीच इच्छा होती. परंतु पुढील काही वर्षे त्या अभिनयात इतक्या रमून गेल्या की त्यांना दिग्दर्शनासाठी वेळच नाही मिळाला. परंतु राज यांच्या सोबत लग्नानंतर आणि प्रतीक बब्बर या त्यांच्या मुलाच्या जन्मानंतर त्या राज बब्बर याना घेऊन एक सिनेमा करणार होत्या आणि त्या सिनेमाचं दिग्दर्शन खुद्द स्मिता पाटील करणार होत्या. पण म्हणतात ना, ‘आले देवाजीच्या मना तेथे कुणाचे काय चालेना!’ अशाप्रकारे त्यांची हीदेखील इच्छा अपूर्णच राहिली.
लहान मुलांचा सहवास फार आवडायचा:
स्मिता यांना लहान मुलं फार आवडायची. त्यामुळेच तर त्यांच्या गरोदरपणात त्या मित्र मैत्रिणींना सर्वांना सांगायच्या की,’मी एका मुलावर थांबणार नाहीये.’ त्यांना मुलांची टोळी हवी होती. परंतु प्रतीक बब्बरच जन्म झाला आणि काही दिवसांनी स्मिता पाटील यांनी या जगाचा अचानक निरोप घेतला. आणि स्मिता यांचं ही देखील इच्छा अपूर्णच राहिली. प्रतीक बब्बर याचं काही वर्षांपूर्वीच लग्न झालं. आणि आईला भरपूर मिस करतो, असंही तो कायम म्हणत असतो.