राम हा शब्द उच्चारला की डोळ्यासमोर येतात ते अरुण गोविल. ९० च्या दशकात दूरदर्शनवर रामानंद सागर यांच्या ‘रामायणात’ त्यांनी ‘राम’ ही भूमिका साकारत प्रसिद्धीचे शिखर गाठले होते. मागच्यावर्षी लॉकडाउनच्या काळात या मालिकेचे पुनः प्रसारण करण्यात आले होते. इतक्या वर्षानी देखील या मालिकेला तितकीच किंबहुना कितीतरी पटीने अधिक लोकप्रियता मिळाली. टीआरपीमध्ये देखील रामायणाने बाजी मारत पाहिले स्थान मिळवले होते.
नुकताच अरुण गोविल म्हणजेच तुमचे, आमचे ‘राम’ यांनी त्यांचा ६३ वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने जाणून घेऊया त्यांचा अभिनयाचा प्रवास.
अरुण गोविल यांचा जन्म १२ जानेवारी १९५८ ला उत्तरप्रदेशमधील मेरठ मध्ये झाला. त्यांचे संपूर्ण बालपण मेरठ मधेच गेले. मेरठ विद्यापीठातून त्यांनी त्यांचे संपूर्ण शिक्षण पूर्ण केले. काही काळाने उद्योगाच्या निमित्ताने त्यांनी मुंबई गाठले. मात्र तेव्हा त्यांच्या मनात अभिनय करण्याचा विचार आला आणि त्यांनी अभिनय करण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
आधीचे काही दिवस त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये साइड हिरो म्हणूनच काम केले. त्यानंतर त्यांना राजश्री प्रोडक्शनने पहिला ब्रेक देत ‘सावन को आने दो’ चित्रपटात मुख्य नायक म्हणून निवडले. हा सिनेमा प्रचंड लोकप्रिय झाला, आणि अरुणजींचा फिल्मी प्रवास सुरु झाला. पण त्यांना खरी लोकप्रियता आणि ओळख दिली ती दूरदर्शनवरील ‘विक्रम आणि वेताळ’ या मालिकेतील ‘महाराजा विक्रमादित्य’ या भूमिकेने.
त्यानंतर त्यांनी रामायणातील काही भूमिकांसाठी स्क्रिन टेस्ट दिल्या. त्या पाहून रामानंद सागर यांनी त्यांना सांगितले की, अरुणजींना ते भरत किंवा लक्ष्मण ही भूमिका करण्यासाठी निवडणार आहे. पण अरुणजींच्या मनात राम ही भूमिका साकारायला मिळावी अशी खूप इच्छा होती. काही दिवसांनी रामानंद सागर आणि त्यांच्या निवड समितीने मला राम या भूमिकेसाठी निवडले होते. मला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा खूप आनंद झाला. या भूमिकेविषयी बोलताना एकदा अरुणजी म्हणाले होते, ” या भूमिकेने मला नाव, प्रसिद्धी, आवश्यक असणारा पैसा आदी सर्व काही दिले. मात्र सर्वात जास्त काय दिले तर जबाबदारी.
“ही व्यक्तिरेखा मिळाल्यावर मला जाणवले की माझी जबाबदारी आता किती वाढली आहे. कोणतीही गोष्ट सार्वजनिकरित्या करताना मला खूप काळजी घ्यावी लागली. एकदा मी दक्षिण भारतात चित्रीकरण करत होतो. मला थोडा ब्रेक मिळाला आणि मी सिगरेट पिण्यासाठी एका कोपऱ्यात गेलो. तेव्हा मला सिगरेट पिण्याची खूप सवय होती. मी सिगरेट पीत असताना काही लोकांचा घोळका माझ्याकडे बघून मोठ्या आवाजात तावातावाने बोलताना मला दिसले. ते मला शिव्या देत असल्याचा अंदाज मला आला. तरी ते नक्की काय बोलत आहे हे जाणून घेण्यासाठी मी आमच्या सेटवरील एका माणसाला बोलवले आणि विचारले की ते काय बोलत आहे , तेव्हा त्याने सांगितले की तुम्ही राम असूनही सिगरेट पीत असल्याने ते तुम्हाला शिव्या देत आहे. हे ऐकल्यानंतर मी त्याक्षणापासून सिगरेट सोडली. त्यानंतर मला काही मासिकांनी भरपूर पैसे देत मासिकाच्या मुखपृष्ठासाठी हातात ग्लास घेऊन फोटोशूट करण्याची ऑफर दिली होती मात्र ती ऑफर मी नाकारली,” असेही ते या अनुभवाबद्दल सांगताना म्हणाले.
“पुढे रामायण एवढे हिट होईल का याबद्दल जास्त काही अंदाज नव्हता. कारण आम्ही याची शूटिंग मुंबईपासून लांब एका गावात करत होतो. तेव्हा मोबाइल फोन देखील नव्हते. त्यामुळे आम्हाला माहीतच नव्हंत की लोकांचा रामायणाला एवढा प्रतिसाद मिळत आहे. मात्र एकदा पंतप्रधान राजीव गांधी यांनी आम्हाला दिल्लीला बोलावले तेव्हा आम्हाला समजले की लोकं किती प्रेम देत आहेत,” रामायणाची लोकप्रियता सांगताना अरुणजी म्हणाले.
या मालिकेच्या निमित्ताने अरुणजी यांना खूप वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आले. अशाच एका अनुभवाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, “रामायणाच्या निमित्ताने मला रील आणि रियल अशा दोन्ही आयुष्यात देवपण जगण्याची संधी मिळाली. रियलमध्ये याच्यासाठी की त्यावेळी लोकांना मी खरंच भगवान राम आहे असे वाटायचे. मला याबाबदल विविध अनुभव आले. एकदा मी परदेशात कुटुंबासोबत गेलो होतो. तेव्हा रस्त्याने चालताना काही लोकं माझ्याकडे जोरात पळत येत होते. ते पाहून माझी बायको खूप घाबरली. ते लोकं जवळ आले आणि रस्त्यावरच त्यांनी मला लोटांगण घातले. माझा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांनी मला बऱ्याचवेळा नमस्कार केला. त्या रस्त्यावरील इतर लोकं आमच्याकडे खूप आश्चर्याने बघत होती.”
“एकदा मी सेटवर शर्ट पँट घालून बसलो होतो तेव्हा अचानक एक स्त्री तिच्या मुलाला घेऊन आली. तिने राम कुठे आहे? असा प्रश्न सेटवरच्या लोकांना विचारला. लोकांनी माझ्याकडे बोट दाखवले पण त्या स्त्रीला विश्वासच बसत नव्हता की मीच राम आहे, काही काळ ती अशीच माझ्याकडे बघत राहिली. तिला विश्वास बसल्यावर तिने तिच्या मुलाला माझ्या पायात ठेवले आणि सांगितले की, ‘तो खूप आजारी आहे तुम्ही त्याला बरे करा.’ मी तिला समजावले की मी देव नाही मी फक्त राम ही भूमिका साकारतो. तेव्हा मी तिला थोडे पैसे देत डॉक्टरकडे जाण्याची विनंती केली. बऱ्याच वेळ तिला समजवल्यानंतर ती तिच्या मुलाला घेऊन दवाखान्यात गेली. काही दिवसांनी ती पुन्हा तिच्या मुलाला घेऊन मला भेटायला आली होती. तेव्हा तिचा मुलगा ठणठणीत बरा झाला होता,” आपल्याला रिल लाईफमुळे रिअल लाईफमध्ये देवपण कसे याबद्दल अरुणजी भरभरुन बोलत होते.
ह्या मालिकेनंतर त्यांना कधीच मसाला चित्रपटांच्या ऑफर आल्या नाही. कारण निर्मात्यांना याबद्दल नेहमीच शंका होती की, लोकं त्यांना अशा भूमिकांमध्ये स्वीकारतील की नाही, असेही ते म्हणाले.