Tuesday, July 9, 2024

दुबईवरून कोचीला पोहचला अभिनेता विजय बाबू; म्हणाला, ‘मला न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे’

लैंगिक शोषणाच्या आरोपांदरम्यान मल्याळम अभिनेता आणि निर्माता विजय बाबू (Vijay Babu) दुबईहून कोचीला पोहोचला आहे. त्याचे कोची विमानतळावरील फोटोही समोर आले आहेत. केरळ उच्च न्यायालयाने मंगळवारी त्याला २ जूनपर्यंत अटकेपासून अंतरिम दिलासा देत, या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश दिले होते. कोची विमानतळावर आल्यानंतर अभिनेत्याने प्रसारमाध्यमांना सांगितले की, त्याचा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे आणि तो पोलिसांना पूर्ण सहकार्य करेल आणि सत्य सर्वांसमोर येईल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता-निर्माता विजय बाबूला पोलिसांनी यापूर्वी राज्यात परतण्यास सांगितले होते, ज्याला त्याने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. अटकेवरून तात्पुरती सुनावणी करताना एकल खंडपीठाचे न्यायमूर्ती बेचू कुरियन थॉमस म्हणाले होते की, “जर मी आता अंतरिम जामीन नाकारला, तर तो पुढे परदेशात बेपत्ता होईल. आपल्या देशात असे किती लोक बेपत्ता आहेत? अनेक यंत्रणांकडून प्रयत्न सुरू आहेत, पण त्यांना यश आले नाही? हेच मी इथे टाळण्याचा प्रयत्न करत आहे.” तसेच विजय बाबूच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर २ जून रोजी सुनावणी होणार आहे. (vijay babu assault case he arrives in kochi from dubai)

अभिनेता आणि निर्माता विजय बाबू याच्याविरोधात २२ एप्रिल रोजी लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाच दिवसांनंतर, फेसबुक लाईव्ह दरम्यान पीडितेची ओळख उघड केल्यामुळे अभिनेत्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. अभिनेत्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो दुबईला रवाना झाला होता. त्याचवेळी विजय या प्रकरणाबाबत फेसबुकवर लाइव्ह देखील आला होता आणि त्याने स्वतःला पीडित असल्याचा दावा केला होता.

अभिनेत्याने दिला ‘AMMA’मधून राजीनामा
या आरोपांनंतर विजय बाबूने ‘असोसिएशन ऑफ मल्याळम मूव्ही आर्टिस्ट्स’च्या (AMMA) कार्यकारिणीचा राजीनामा दिला होता. त्याने AMMAच्या कार्यकारिणीतून बाहेर होणार असल्याचे पत्र पाठवले होते. असोसिएशननेही विजय बाबूचा निर्णय मान्य केला होता. तसेच विजयच्या पत्रानंतर AMMAचे सरचिटणीस अडवेला बाबू यांनीही एक निवेदन जारी केले होते.

हेही वाचा

हे देखील वाचा