Friday, March 29, 2024

‘शूट आऊट ऍट वडाला’च्या डायरेक्टरने खाल्ली होती विवेक ओबेरॉयसोबत काम न करण्याची शपथ

सलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांच्यातील भांडण तर जगजाहीर आहे. मात्र, खूप कमी लोकांना माहिती असेल की, हिंदी सिनेइंडस्ट्रीतल्या एका मोठ्या दिग्दर्शक आणि निर्मात्यासोबत विवेक ओबेरॉयचं चांगलंच वाजलं होतं. त्यावेळी त्या दिग्दर्शकानं विवेकची मीडियासमोरच पोलखोल केली. तो दिग्दर्शक म्हणाला होता की, विवेक फक्त अनप्रोफेशनल आणि ऍटिट्यूडवाला नाही, तर तो ज्या स्थितीत आहे, त्यासाठी तो स्वत:च जबाबदारंय. या दिग्दर्शकानं विवेकला तेव्हा संधी दिली होती, जेव्हा त्याच्या करिअरचे तीन तेरा वाजले होते.

सुरुवातीला त्याचं करिअर चांगलं चाललं होतं, पण जेव्हा त्याचं सलमानसोबत वाजलं. त्यानंतर त्याच्यासोबत काम करण्यास इंडस्ट्रीतील कुणीही तयार नव्हतं. अशावेळी त्या दिग्दर्शकानं विवेकसोबत काम केलं, पण विवेकनेच त्या दिग्दर्शकाला घाम फोडला. हे दिग्दर्शक इतर कुणी नाही, तर संजय गुप्ता आहेत. चला तर पाहूया असं काय केलं होतं विवेकने, ज्यामुळे संजय गुप्तांनी त्याच्यासोबत काम न करण्याची शपथच खाल्ली होती.

संजय गुप्ता हे गँगस्टर सिनेमांसाठी ओळखले जातात. संजय गुप्तांनी विवेक ओबेरॉयसोबत एक असा सिनेमा बनवला होता, ज्यामुळे विवेकच्या करिअरला ‘चार चाँद’ लागले होते. या सिनेमामुळे विवेकला हवं असलेलं यश मिळालं होतं. २००७ साली आलेल्या त्या सिनेमाचं नाव होतं. ‘शूट आऊट ऍट लोखंडवाला.’ या सिनेमात संजय यांनी विवेकला दमदार गँगस्टरचा रोल दिला. नाव होतं ‘माया भाई.’ या रोलमध्ये विवेक फिट झाला आणि सिनेमा चांगलाच गाजला. विशेष म्हणजे, त्यावेळी तरुणाईमध्ये विवेक चांगलाच फेमस झाला होता. पोरं स्वत:ला माया भाई म्हणवून घेऊ लागले होते.

हा सिनेमा हिट होताच ठरलं होतं की, या सिनेमाचा दुसरा भाग तयार करायचा. तो म्हणजे ‘शूट आऊट ऍट वडाला.’ यावेळी संजय गुप्तांनी गँगस्टरचा रोल वेगळा ठेवून विवेकला साईड रोल दिला. हाच रोल कहाणीत टर्निंग पॉईंट घेऊन आला होता. या सिनेमाची शूटिंग विवेक ओबेरॉयने जॉन अब्राहमसोबत केली होती, पण कुठंतरी माशी शिंकलीच. मीडियात बातम्या येऊ लागल्या की, विवेकने हा सिनेमा सोडला. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे, तो जेव्हा ‘शूट आऊट ऍट वडाला’ हा सिनेमा करत होता, आणि कमिटमेंट देऊनही जेव्हा सिनेमा सोडला, तेव्हाच त्याने गँगस्टरचाच सिनेमा साईन केला, तो म्हणजे डेव्हिड.

‘शूट आऊट ऍट वडाला’ या सिनेमातून विवेक ओबेरॉयचं बाहेर पडण्याचं कारण सांगताना संजय गुप्ता म्हणाले होते की, “विवेक ओबेरॉय कधीच आम्ही निवडलेल्या सिनेमांसाठी नव्हता. मला आणि एकताला या सिनेमासाठी इतर मोठ्या स्टारला घ्यायचं होतं, विवेकला नाही.” पुढं बोलताना त्यांनी सांगितलं की, “विवेकला घेणं ही आमची मोठी चूक होती. कारण त्याचा ऍटिट्यूड खूपच प्रॉब्लेमॅटिक आहे. एकीकडं त्याचा सेक्रेटरी आमच्याशी पैसे आणि तारखांबद्दल चर्चा करतोय, तर दुसरीकडं आम्हाला न सांगताच त्याचवेळी विवेक सेम रोल इतर निर्मात्यासोबत साईन करतो.” त्यावेळी ते म्हणाले होते की, “अशाप्रकारे आम्ही काम करत नाही. मी आणि एकतानं ठरवलंय की, भविष्यात कधीही विवेक ओबेरॉयसोबत काम करणार नाही. कारण, त्याने जे केलं, ते वाईटच केलं.”

त्यानंतर विवेकला ऑफर करण्यात आलेला रोल अभिनेता सोनू सूदला देण्यात आला. दुसरीकडं डेव्हिड सिनेमाबद्दल बोलायचं झालं, तर संजय गुप्तांना धोका देत विवेकने साईन केलेला हा सिनेमाही त्याच्या हातातून निसटला. त्यात त्याच्या जागी अभिनेता नील नितीन मुकेशनं काम केलं. तर अशाप्रकारे दिग्दर्शक संजय गुप्तांनी विवेक ओबेरॉयचा खरा चेहरा सर्वांसमोर आणलेला.

असं असलं, तरीही काही वर्षांनंतर दोघांमधील तापलेलं वातावरण बर्फासारखं शांत झालं. दोघांची भेट एका पार्टीत झाली. त्यानंतर ते एकमेकांना बोलूदेखील लागले. त्यावेळी संजय गुप्ता ‘मुंबई सागा’ या सिनेमावर काम करत होते आणि त्यांनी हा रोल विवेकला दिला, पण पुढं जाऊन या सिनेमाचाही तो हिस्सा बनू शकला नाही. पुन्हा एकदा हा रोल जॉन अब्राहमला मिळाला, पण आता दोघांमधील चांगले संबंध आहेत.

नुकतेच जेव्हा विवेक ओबेरॉयला जेव्हा सोशल मीडियावर नेपोटिझमवरून ट्रोल करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा खुद्द संजय गुप्तांनी या ट्रोलर्सला सडेतोड प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, “मला माहितीये विवेकने कंपनी सिनेमात काम मिळवण्यासाठी किती खस्ता खाल्लाय, आणि त्या रोलसाठी तो किती सीरियस होता.”

हेही पाहा- सलमानमुळे ‘बुरे दिन’ चाललेल्या विवेकला ‘या’ दिग्दर्शकाने दाखवले ‘अच्छे दिन

तर असा आहे विवेक ओबेरॉय आणि संजय गुप्तांमधील भांडणाचा किस्सा. ज्यात संजय गुप्तांनी त्याला अनप्रोफेशनल आणि ऍटिट्यूडवाला म्हटलं होतं.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
मोठी बातमी! कपिल शर्माला मिळाली ७ वर्षांपूर्वी केलेल्या चुकीची शिक्षा, अमेरिकेत झालाय गुन्हा दाखल
‘जबरे पिया’ गाण्यावर बेभान होऊन नाचली रश्मी देसाई, सुंदरता पाहून नजरच हटणार नाही
‘त्या व्यक्तीला जिवंत जाळले गेले, तेव्हा तर…’, उदयपूर हत्याकांडावर स्वरा भास्करने केले मोठे वक्तव्य

हे देखील वाचा